गोकुळमध्ये दूध उत्पादकांच्या कौलाचा अनादर ; लोकशाहीच्या रक्षणासाठी माध्यमांनी आवाज उठवावा – आमदार सतेज उर्फ बंटी पाटील
महायुतीच्या संचालकांच्या गैरहजेरीमुळे अध्यक्ष निवडीची सभा तहकूब ; साडेचार लाख दूध उत्पादकांच्या मताधिकाराचा अवमान होत असल्याचा आरोप

संगमनेर टाइम्स न्यूज नेटवर्क –
कोल्हापूर जिल्ह्यातील साडेचार लाख दूध उत्पादक शेतकऱ्यांची जीवनवाहिनी असलेल्या गोकुळ दूध संघाच्या कारभारात लोकशाही प्रक्रियेचा अनादर होत असल्याचा गंभीर आरोप काँग्रेसचे विधान परिषद गटनेते तथा माजी गृह राज्यमंत्री आमदार सतेज ऊर्फ बंटी डी. पाटील यांनी केला आहे. गोकुळच्या निवडणुकीत दूध उत्पादकांनी दिलेला स्पष्ट कौल मान्य करण्याऐवजी तांत्रिक कारणांचा आधार घेऊन अध्यक्ष निवडीची प्रक्रिया अडवली जात असल्याचा आरोप करत त्यांनी राज्यातील सर्व संपादक आणि पत्रकारांना लोकशाहीच्या रक्षणासाठी आवाज उठविण्याचे आवाहन केले आहे.
यासंदर्भात प्रसिद्धीस दिलेल्या निवेदनात सतेज पाटील यांनी गोकुळमधील सध्याच्या राजकीय घडामोडींवर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.

निवेदनात म्हटले आहे की, कोल्हापूर जिल्ह्यातील साडेचार लाख दूध उत्पादक शेतकऱ्यांनी गोकुळच्या निवडणुकीत २५ पैकी १३ जागांवर समविचारी आघाडीला स्पष्ट बहुमत दिले. मात्र, २९ ऑक्टोबर रोजी झालेल्या अध्यक्ष निवडीच्या सभेला महायुतीचे सर्व १२ संचालक ठरवून गैरहजर राहिले. परिणामी, गणपूर्तीअभावी सभा तहकूब झाली. पराभव मान्य करण्याऐवजी तांत्रिक कारणांचा आधार घेऊन निवडणूक प्रक्रियाच अडवण्याचा हा प्रकार असल्याचे पाटील यांनी म्हटले आहे.
बहुमताचा कौल मान्य नसेल तर मतदानाचा अर्थ काय?
लोकशाहीमध्ये जनतेने दिलेला कौल सर्वोच्च असतो. मात्र, बहुमत मिळवण्यासाठी कायद्यात बदल करणे किंवा शासननियुक्त संचालकांना मतदानाचा अधिकार देऊन संख्याबळ फिरवण्याचे प्रयत्न होत असतील, तर अशा लोकशाही प्रक्रियेचा उपयोग काय, असा सवाल सतेज पाटील यांनी उपस्थित केला आहे.

गोकुळसारख्या सहकारी संस्थांमध्येच नव्हे, तर महानगरपालिका, नगरपालिका आणि जिल्हा परिषदांसारख्या स्थानिक स्वराज्य संस्थांमध्येही अशा प्रकारे लोकशाहीचा गळा घोटला जाऊ शकतो, अशी भीती त्यांनी व्यक्त केली आहे.
शेतकऱ्यांच्या संस्थेवर प्रशासकीय हस्तक्षेप नको!
प्रशासकीय काळात काटकसर आणि पारदर्शक कारभाराचा अभाव असताना दुष्काळ आणि चाऱ्याच्या प्रश्नांसारख्या गंभीर आव्हानांना सामोरे जाणाऱ्या लोकनियुक्त मंडळाचे अस्तित्वच गोकुळमध्ये धोक्यात येत असल्याचे त्यांनी म्हटले आहे. ही बाब महाराष्ट्रासाठी लाजिरवाणी असल्याची टीकाही त्यांनी केली.
यापूर्वी विरोधी संचालकांनाही नम्र आवाहन करून शेतकऱ्यांचा कौल स्वीकारून पुढील सभेला उपस्थित राहण्याची विनंती केल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

‘माध्यमांनी शेतकऱ्यांचा आवाज बनावे’
आम्ही कायद्याच्या आणि लोकशाहीच्या मार्गाने लढत राहणार आहोत. मात्र, आज गोकुळमध्ये जे घडत आहे, ते उद्या कोणत्याही सहकारी संस्थेत घडू शकते. महाराष्ट्रातील सहकाराचा वारसा जपण्यासाठी आणि लोकशाहीचे संरक्षण करण्यासाठी राज्यातील साडेचार लाख दूध उत्पादक शेतकऱ्यांचा आवाज बनून माध्यमांनी जनतेसमोर वास्तव मांडावे, असे कळकळीचे आवाहन आमदार सतेज पाटील यांनी केले आहे.
