जिल्ह्याच्या विकासात जिल्हा सहकारी बँकेचे मोठे योगदान — माजी मंत्री बाळासाहेब थोरात

संगमनेर शाखेच्या नूतनीकरणाचा उद्घाटन समारंभ

संगमनेर | प्रतिनिधी —

सहकारी साखर कारखान्याच्या माध्यमातून सहकार चळवळ बळकट करण्याबरोबर पीक कर्जाच्या माध्यमातून जिल्हा बँकेने शेतकरी उभा केला. ११ हजार कोटींच्या ठेवी हे जनतेच्या विश्वासाचे मोठे प्रतीक असून जिल्ह्याच्या विकासात मातृसंस्था म्हणून बँक कायम पाठीशी उभी राहिली असल्याचे गौरवोद्गार काँग्रेसच्या राष्ट्रीय कमिटीचे सदस्य तथा माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी काढले आहेत.

अहिल्यानगर जिल्हा सहकारी बँकेच्या संगमनेर शाखेच्या तालुका विकास अधिकारी कार्यालयाचा नूतनीकरण उद्घाटन समारंभ कार्यक्रमात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी जिल्हा बँकेचे चेअरमन चंद्रशेखर घुले हे होते तर व्यासपीठावर व्हा. चेअरमन ॲड. माधवराव कानवडे, दुर्गाताई तांबे, रणजीतसिंह देशमुख, पांडुरंग पाटील घुले, बँकेचे संचालक गणपतराव सांगळे, बाळासाहेब साळुंखे, शेतकी संघाचे चेअरमन संपतराव डोंगरे, आर बी राहणे, अजय फटांगरे, सुरेश थोरात, दीपक भोसले, ॲड. नानासाहेब शिंदे, मुख्य कार्यकारी अधिकारी रावसाहेब वर्पे, तालुका विकास अधिकारी अशोक थोरात, कार्यालयीन अधीक्षक चेतन देशमुख यांच्यासह विविध पदाधिकारी उपस्थित होते.

थोरात म्हणाले की, जिल्हा सहकारी बँकेने जिल्ह्याच्या विकासात मोठे योगदान दिले असून जिल्ह्यातील विकासातून झालेल्या बदलाच्या पाठीशी जिल्हा बँक कायम मातृ संस्था म्हणून उभी राहिली आहे. या बँकेमध्ये सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात यांनी 44 वर्ष संचालक म्हणून काम करताना व्हा चेअरमन व चेअरमन या पदावर 18 वर्ष काम केले. शिस्त पारदर्शकता सहकारात रुजवली. गाव पातळीवरील सेवा सोसायटी सक्षम करण्याबरोबर सचिवांबाबत तीर्थरूप भाऊसाहेब थोरात कायम काळजी करायचे. सचिवाबाबत त्यांची मोठी तळमळ असायची.

 संगमनेर शाखेच्या या इमारतीचे भूमिपूजन माझे आजोबा संतोजी थोरात यांच्या हस्ते 29 जुलै 1976 रोजी झाले. पन्नास वर्षाच्या या कार्यकालमध्ये मोठा बदल झाला असून बँकेने शेतकऱ्यांचा मोठा विश्वास संपादन केला आहे. आणि त्यामुळे जिल्हा बँकेत 11000 कोटींच्या ठेवी बँकेमध्ये आहेत. संगमनेर तालुक्यामध्ये कर्ज वसुली देण्याची वसुलीची चांगली संस्कृती कायम राहिली असल्याचे ते म्हणाले.

तर चंद्रशेखर घुले म्हणाले की, सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात व स्वर्गीय मारुतराव घुले यांचा स्नेहबंध कायम राहिला. लोकनेते बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली संगमनेर तालुक्याने कायम राज्याला दिशा दिली आहे. संगमनेरचे दिशादर्शक काम हे सर्वांसाठी प्रेरणादायी आहे. सहकाराची ही परंपरा आपण पुढे घेऊन जात आहोत. 75 वर्षांमध्ये बँकेने अत्यंत चांगले काम केले असून काळानुरूप बदल करावे लागणार आहेत. पीक कर्ज, शेती कर्ज , ऊस कर्ज यापुढे जाऊन अधिकाऱ्यांनी कार्पोरेट बँकिंग प्रणाली राबवण्यासाठी अधिक काम करावे. याचबरोबर बँकेने नव्याने 8 टक्के व्याजाने सोनेतारण कर्ज सुरू केले असून आगामी काळामध्ये जिल्ह्याच्या सर्व सोसायट्यांच्या माध्यमातून किंवा आर कोड राबवण्यात येणार असल्याचे ते म्हणाले.

या कार्यक्रमाचे प्रास्ताविक जिल्हा बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रावसाहेब वर्पे यांनी केले. सूत्रसंचालन नामदेव कहांडळ यांनी केले. तर तालुका विकास अधिकारी अशोक थोरात यांनी आभार मानले. यावेळी संगमनेर तालुक्यातील विविध संस्थांचे पदाधिकारी, सेवा सोसायटीचे चेअरमन,bसेक्रेटरी, बँकेचे अधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

जिल्हा बँकेने अभ्यास गट करावा

शेतकऱ्यांची अवस्था, यापुढील पीक पद्धती, ऊस पीक याबाबत बँकेकडून एक अभ्यास कट करावा. याचबरोबर अमेरिका आणि भारत यांच्यात नव्यान होत असलेल्या कराराबाबतही अभ्यास झाला पाहिजे. अमेरिकेमधून भारतामध्ये येणाऱ्या शेतीमाल व वस्तूंवर कोणताही कर नाही मात्र भारतातून निर्यात होणाऱ्या वस्तूंवर कर असणार आहे. या नवीन धोरणाबाबत बँकेने अभ्यास करावा असेही माजी मंत्री बाळासाहेब थोरात म्हणाले.

 

RRAJA VARAT

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!