प्रेरणा दिनानिमित्त गावोगावी सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात यांच्या विचारांचा जागर

संगमनेर | प्रतिनिधी —

अमृत उद्योग समूहाचे संस्थापक थोर स्वातंत्र्य सेनानी सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात यांच्या जयंतीनिमित्त 12 जानेवारी हा संगमनेर तालुका व जिल्ह्यात प्रेरणा दिन म्हणून मोठ्या उत्साहाने साजरा होत असून काल संगमनेर तालुक्यातील सर्व गावांमध्ये विविध उपक्रम राबवून सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात यांच्या रचनात्मक कार्याचा विचारांचा जागर करण्यात आला.

संगमनेर तालुका हा सहकाराची पंढरी म्हणून ओळखला जात असून या सहकाराचा पाया सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात यांनी घातला आहे. शिस्त,काटकसर,पारदर्शकता,आधुनिकता ही चतुसुत्री वापरून सहकारामध्ये नवी दिशा त्यांनी दिली. या तत्त्वांवर लोकनेते बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखाली संगमनेरचा सहकार वाटचाल करत असून देशासाठी हा सहकार मॉडेल ठरला आहे.

वयाच्या अवघ्या अवघ्या 18 व्या वर्षी स्वातंत्र्यसंग्रामात उडी घेतल्यानंतर सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात यांनी दीड वर्ष कारावासही भोगला स्वातंत्र्यप्राप्तीनंतर सहकाराचा मार्ग निवडून तालुक्यामध्ये समृद्धी निर्माण केली. संगमनेरच्या सहकाराच्या उभारणी बरोबर अहिल्यानगर जिल्हा बँकेचे 48 वर्ष संचालक आणि अनेक वर्ष चेअरमन पद भूषविले. याचबरोबर महाराष्ट्र बँकेचे अध्यक्ष पदही त्यांनी भूषवले.

एकनिष्ठता, स्वच्छ राजकारण हे त्यांचे जीवन वैशिष्ट्य राहिले. त्यांना अभिवादन करण्यासाठी 12 जानेवारी हा संगमनेर तालुक्यामध्ये प्रेरणा दिन म्हणून दरवर्षी मोठ्या उत्साहाने साजरा होतो. याचबरोबर अमृत उद्योग समूहाच्या वतीने राज्यस्तरीय पुरस्कार देऊन विविध क्षेत्रातील मान्यवरांचा गौरव केला जातो. तर दिग्गज कलाकारांच्या उपस्थितीमध्ये सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन होत असते.

यावर्षी राजापूर, पाणोडी, कनोली, निमज, तळेगाव, देवकवठे,गुंजाळवाडी, घुलेवाडी, संगमनेर अशा विविध गावांमधून विविध उपक्रमांच्या आयोजन करण्यात आले. स्वच्छता अभियान,वकृत्व स्पर्धा, निबंध स्पर्धा, क्रीडा स्पर्धा, क्रिकेट स्पर्धा, रक्तदान शिबिर अशा उपक्रमांनी प्रेरणा दिन सर्वत्र साजरा झाला.

तर व्याख्यानांमधून सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात यांच्या विचारांचा जागर करण्यात आला. यावेळी बोलताना प्राध्यापक बाबा खरात म्हणाले की, सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात ही व्यक्ती नसून विचार आहे. समाजाच्या विकासासाठी आपले जीवन समर्पित करणारे भाऊसाहेब थोरात हे सहकारातील संत असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

RRAJA VARAT

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!