संगमनेर 2.0 : पहिल्या शंभर दिवसांत कोणती कामे होणार… रोडमॅप निश्चित !
संगमनेरच्या पहिल्या शंभर दिवसांचा विकास आराखडा ठरला
“2.0’च्या अंमलबजावणीसाठी नगरपरिषदेत व्यापक आढावा बैठक
संगमनेर | प्रतिनिधी —
संगमनेर नगरपरिषदेतील सर्व विभाग प्रमुखांची महत्त्वपूर्ण बैठक नगरपरिषद कार्यालयात पार पडली. या बैठकीत संगमनेरकरांसमोर मांडण्यात आलेल्या ‘संगमनेर 2.0’ जाहीरनाम्याची प्रत्यक्ष अंमलबजावणी कशी करता येईल, यावर सखोल आणि सविस्तर चर्चा करण्यात आली.

नगरपरिषदेच्या प्रत्येक विभागाने आपल्या जबाबदारीच्या क्षेत्रात कोणती कामे प्राधान्याने हाती घ्यावीत त्या कामांची ठरावीक कालमर्यादेत अंमलबजावणी कशी करावी तसेच गुणवत्ता, पारदर्शकता आणि वेळेचे पालन कसे राखावे याबाबत स्पष्ट आणि ठोस सूचना नगराध्यक्ष डॉ. मैथिली तांबे यांनी दिल्या.

यावेळी पुढील 100 दिवसांत पूर्ण करावयाच्या विकासकामांचा टप्प्याटप्प्याने आढावा घेऊन सविस्तर नियोजन करण्यात आले. सर्व नगरसेवकांच्या उपस्थितीत पहिल्या शंभर दिवसांचा स्पष्ट रोडमॅप निश्चित करण्यात आला. तसेच या कालावधीत संगमनेर नगरपालिका कोणती कामे करणार आहे, याचे सविस्तर प्रेझेंटेशन सादर करण्यात आले.

या महत्त्वपूर्ण बैठकीस आमदार सत्यजीत तांबे, माजी नगराध्यक्षा दुर्गाताई तांबे, मुख्याधिकारी दयानंद गोरे यांच्यासह सर्व अधिकारी व खातेप्रमुख मोठ्या संख्येने उपस्थित होते.
‘संगमनेर 2.0’च्या माध्यमातून शहराच्या सर्वांगीण विकासाला गती देत नागरिकांना अधिक सक्षम, पारदर्शक आणि लोकाभिमुख प्रशासन देण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला.
