संगमनेर नगरपालिकेत शास्तीकर माफीसाठी अभय योजना सुरू…
आमदार सत्यजित तांबे यांचे विशेष प्रयत्न
संगमनेर प्रतिनिधी —
नगरपालिकेने नागरिकांच्या सुविधांसाठी सातत्याने विविध योजना राबविल्या असून नगरपालिकेच्या थकीत मालमत्ता करामुळे नागरिकांवर शास्तीचा मोठा बोजा पडत होता. या शास्तीकरा वरील माफी मिळावी याकरता आमदार सत्यजित तांबे यांनी सरकारकडे केलेल्या पाठपुराव्याला यश मिळाले असून सरकारने संगमनेर नगरपालिकेत शास्तीकर अभय योजना सुरू केली आहे अशी माहिती आमदार तांबे यांच्या प्रसिद्धी विभागाकडून देण्यात आली आहे.

आमदार सत्यजित तांबे यांनी नगरपरिषद नगरपालिका कार्यक्षेत्रातील थकीत मालमत्ता करा वरील शास्तीकर माफ करावा यासाठी अभय योजना लागू करावी ही मागणी केली होती. याबाबत विधान परिषदेमध्ये त्यांनी वेळोवेळी आवाज उठवला. संगमनेर नगरपालिकेच्या कार्यक्षेत्रातील नागरिक अनेकदा शास्ती कर भरतात. रक्कम घरपट्टीमध्ये धरली जात नाही. त्यामुळे त्यांच्यावर मोठा अन्याय होतो. त्यामुळे हा अन्यायकारक शास्तीकर तातडीने रद्द करावा अशी मागणी त्यांनी केली होती. याचबरोबर शास्ती कर योजनेला माफी मिळून अभय योजना लागू करावी याकरता मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांची भेट घेतली होती. तसेच या बाबत वेळोवेळी पत्र व्यवहार केला आणि विधान परिषदेत अर्थसंकल्पीय अधिवेशन पावसाळी अधिवेशन मध्ये आवाजही उठवला.

या मागणीनुसार नगरपालिका नगरपरिषद कार्यक्षेत्रातील थकीत मालमत्ता कराबाबत आयडब्ल्यूबीपी योजनेतील त्रुटी दूर करून अभय योजना लागू करण्यात आली आहे. या अंतर्गत संगमनेर नगरपालिकेत सुमारे 2 कोटींपेक्षा जास्त शास्तीकरमाफी केली जाणार असून नागरिकांना त्याचा मोठा लाभ होणार आहे.
नगरपालिका कार्यक्षेत्रातील अनधिकृत बांधकामांवर वर्षानुवर्ष थकीत कर वाढल्याने याचा मोठा भार नागरिकांवर पडत होता. त्यामुळे हा कर कमी करावा याकरता केलेल्या पाठपुराव्याला मोठे यश मिळाले असून तांत्रिक अडचणी दूर करत नगरपालिका कार्यक्षेत्रासाठी अभय योजना लागू झाल्याने अनेक नागरिकांना दिलासा मिळणार आहे.

या योजनेचा संगमनेर शहरातील नागरिकांनी लाभ घ्यावा असे आवाहन त्यांनी केले असून संगमनेर नगर परिषद ही संगमनेर मधील सर्व नागरिकांना चांगल्या सुविधा बरोबर सर्व लाभ देण्यासाठी कटिबद्ध असल्याचे आमदार सत्यजित तांबे यांनी म्हटले आहे.
