जादूटोणा – आमिष दाखवून लाखो रुपयांना लुटले : जोडप्यावर गुन्हा दाखल
पैसे, सोने आणि बकरू देखील लुबाडले
संगमनेर टाइम्स न्यूज नेटवर्क —
संगमनेर तालुक्यातील पठार भागात असणाऱ्या घारगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत जांबुत बुद्रुक या गावातील एका कुटुंबातील महिलेला आणि तिच्या घरच्यांना जादूटोणा आणि इतर आमिष दाखवून संबंधितांकडून पैसा सोने आणि बकरू घेऊन लाखो रुपयाला लुटण्याचा धक्कादायक प्रकार समोर आला असून यासंदर्भात घारगाव पोलीस ठाण्यात एका जोडप्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
बाळासाहेब पोटे आणि सिंधू बाळासाहेब पोटे या जोडप्यावर हा गुन्हा दाखल करण्यात आला असल्याची माहिती घारगाव पोलीस स्टेशन कडून मिळाली आहे.

सदर गुन्ह्याची सुरुवात सन 2014 सालापासून झाली आहे. फिर्यादीच्या घरी दोन अनोळखी माणसे आले होते. त्यापैकी एक बाळासाहेब पोटे आणि त्याच्यासोबत असलेली व्यक्ती ही (नाव माहित नाही) तुमचं सर्व काही चांगलं करून देऊ तुम्ही पैसे बकरू आणि सोने द्या अशी मागणी करून घरातील फिर्यादीच्या आई-वडिलांना गोड बोलून आणि वेगवेगळी आमिष दाखवून त्यांच्याकडून त्यावेळी पाच हजार रुपये रोख, घरातील एक बकरू घेऊन ते दोघे जण निघून गेले.

सन 2015 साली पुन्हा बाळासाहेब पोटे एका अनोळखी व्यक्तीला घेऊन आला आणि फिर्यादीच्या आईला संमोहित करून तिच्याकडून 1 लाख 50 हजार रुपये घेऊन गेला. तसेच जुलै 2025 रोजी बाळासाहेब पोटे याने फिर्यादीच्या घरी दोन व्यक्ती पाठवून आश्रम शाळेला (बोटा) येथील धान्य पाहिजे म्हणून घरातून एक गोणी बाजरी आणि सहाशे रुपये रोख घेऊन गेले.

त्यानंतर घरातील आईचे दागिने आणि फिर्यादीची भावजयीचे दागिने असे सुमारे पाच लाख रुपयांचे दागिने देखील गायब झालेले आढळून आले. फिर्यादीने आईस विचारले असता आईने यासंदर्भात राग येऊन घरातील लोकांना मारहाण केली. तसेच स्वतः देखील आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. आणि खाण्यापिने सोडून बाळासाहेब पोटे महाराजांना दीड लाख रुपये देऊन द्या असा कायम घोषा लावला.

या सर्व प्रकारामुळे फिर्यादीच्या आईची मानसिकता बिघडली होती. फिर्यादीच्या आईने विषारी औषध पिऊन आत्महत्या करण्याचा देखील प्रयत्न केला होता. जादूटोणा करणाऱ्या बाळासाहेब पोटने तिला संमोहित करून तिच्याकडून सोने पैसा बकरू धान्य असा ऐवज लुटून नेल्याबद्दल फिर्यादी याने संगमनेर तालुक्यातील घारगाव पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. या फिर्यादीवरून बाळासाहेब पोटे आणि सिंधू बाळासाहेब पोटे या दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
