घारगाव येथे वाळूची अवैध वाहतूक करणाऱ्या तस्करांवर कारवाई !
10 लाख 20 हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त
संगमनेर टाइम्स न्यूज नेटवर्क —
संगमनेर शहरासह संपूर्ण तालुक्यामध्ये अवैध धंद्यांना उधान आले आहे. अवैध कत्तलखाने वाळू तस्करी गौण खनिज तस्करी मटका जुगार अड्ड्यां बरोबरच अमली पदार्थांनी देखील धुमाकूळ घातला आहे. दिवसेंदिवस अवैध धंद्यांमध्ये वाढ होत आहे. संगमनेर तालुक्यात चार पोलीस स्टेशन असून देखील पोलिसांचा कुठलाही वचक राहिला नसल्याचे चित्र दिसत आहे.

अहिल्यानगर स्थानिक गुन्हे शाखेने संगमनेर तालुक्यातील घारगाव येथे अवैध वाळू वाहतूक करणाऱ्या तस्करांना पकडले असून त्यांच्याकडून तब्बल दहा लाख वीस हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे.
दिनांक 26/12/2025 रोजी घारगांव पोलीस ठाणे हद्दीमध्ये वाळूचे अवैध उत्खनन/उपसा सुरू असल्याबाबत पथकास गुप्त बातमीदारा मार्फत माहिती मिळाल्यानंतर तपासणी पथकास बोटा गावाच्या शिवारात कुरकुंडी फाटा, ता. संगमनेर या ठिकाणी एक अशोक लेलँड कंपनीचा 1015 टी. ई मॉडेलचा डंम्पर संशयीत रित्या मिळून आला.

सदर डंम्परची पाहणी केली असता त्यामध्ये मोठ्या प्रमाणावर वाळू भरल्याचे दिसून आले. चालकाकडे वाळू वाहतुकीच्या संदर्भात कुठलाही परवाना आढळून आला नाही. चालक 1) पिलाजी महादु नंदकर (वय 41 वर्षे, रा. शेळकेवाडी, ता. संगमनेर, जि. अहिल्यानगर) सदरचा डंम्पर हा 2) चेतन रामनाथ कजबे (रा. खंदरमाळवाडी, ता. संगमनेर, जि. अहिल्यानगर) याच्या मालकीचा असून त्याच्या सांगण्यावरून सदरची वाळू ही मुळा नदीपात्रातून भरुन आणली असल्याचे सांगितले आहे.

ताब्यातील आरोपीकडून 10 लाख रुपये किमतीचा डंम्पर क्रमांक एम.एच. 14 एल. एक्स. 7297 व 20 हजार रुपये किमतीची 2 ब्रास शासकिय वाळू असा एकुण 10 लाख 20 हजार रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला.
आरोपीविरुध्द पोकॉ/2633 अमृत शिवाजी आढाव नेम – स्थानिक गुन्हे शाखा, अहिल्यानगर यांचे फिर्यादीवरुन घारगांव पोलीस ठाणे गु.र.नं. 389/2025 भारतीय न्याय संहिता 2023 चे कलम 303(2), 3(5) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असुन पुढील तपास घारगांव पोलीस स्टेशन करीत आहे.

स्थानिक गुन्हे शाखेचे पोउपनि/महादेव गुट्टे, पोलीस अंमलदार गणेश लोंढे, संतोष खैरे, अमृत आढाव, अमोल आजबे, अरुण मोरे या पथकाने सदर कारवाई केली आहे.
