संगमनेरात कत्तलखान्यांवर छापा !

11 लाख 45 हजार 700 रुपयांचा मुद्देमाल जप्त 

नगर एलसीबीची कारवाई 

संगमनेर टाइम्स न्यूज नेटवर्क —

संगमनेर शहरातील मदिना नगर भागातील अवैध कत्तलखान्यांमध्ये अहिल्या नगरच्या स्थानिक गुन्हे शाखेने (एलसीबी) छापा टाकून 11 लाख 45 हजार 700 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला असून चार जणांवर गुन्हा दाखल केला आहे. तर 16 गोवंश जनावरांची सुटका करण्यात आली आहे. या कारवाईने शहरातील गोवंश हत्या आणि अवैध कत्तलखान्यांचे उद्योग पुन्हा उघड झाले आहेत.

संगमनेर शहरात अवैध गोवंश हत्या आणि कत्तलखाने सुरू असल्याचे सातत्याने समोर येत आहे. या कत्तलखान्यांमधून राजरोसपणे गोवंश हत्या होत असून मोठ्या प्रमाणावर मांस विक्री केली जाते. तसेच बाहेरील शहरांमध्ये देखील हे मांस विक्रीसाठी पाठविले जाते. बोलबच्चन करणारे सत्ताधारी मात्र आता गप्प बसलेले आहेत. कत्तलखाने अव्याहतपणे सुरूच आहेत. 

दिनांक 26/12/2025 रोजी पहाटेच्या सुमारास संगमनेर शहर परिसरामध्ये कत्तलखान्याची माहिती काढत असतांना गुप्त बातमीदारामार्फत कासिम असद कुरेशी (रा. संगमनेर हा गल्ली नं. 02, मदिनानगर) या ठिकाणी एका पत्र्याच्या शेडमध्ये गोवंशीय जनावरांची कत्तल करत असल्याची पथकास माहिती प्राप्त झाली. पथकाने तात्काळ बातमीतील ठिकाणी छापा टाकला असता. सदर ठिकाणी 3 इसम गोवंशीय जनावरांची कत्तल करत असतांना आढळून आले. त्यावेळी एक इसम पळून गेला.

1) गुलाम फरिद जावेद कुरेशी (वय 30 वर्षे, रा. मोगलपुरा, पुणे रोड, संगमनेर, ता. संगमनेर, जि. अहिल्यानगर) 2) मोहंमद वसीम मुबारक अली (वय – 32 वर्षे, रा. शंकरपुर, बाहरिच, उत्तरप्रदेश, हल्ली रा. मदीनानगर, संगमनेर, ता. संगमनेर जि. अहिल्यानगर) पळून गेलेल्या आरोपीचे नांव 3) कासिफ असद कुरेशी (रा. कादी मस्जिद, पुणे रोड, संगमनेर, ता. संगमनेर जि. अहिल्यानगर) असे आहे.

सदर ठिकाणावरुन 9 लाख 30 हजार रुपये किमतीचे 3 हजार 110 किलो गोमांस, 700/- रुपये किमतीची एक कुऱ्हाड व सुरी असा एकुण 9लाख 30 हजार 700/- रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

त्यानंतर मिळालेल्या माहितीवरुन कोल्हेवाडी रोड, हाजीनगर, संगमनेर येथे मोना प्लॉट मधील काटवनामध्ये खात्री करता सदर ठिकाणी 2 लाख 15 हजार रुपये किमतीचे एकुण 16 लहान मोठे जिवंत गोवंशीय जनावरे विना चाऱ्यापाण्याचे व निर्दयतेने बांधलेल्या स्थितीत मिळुन आल्याने त्यांची सुटका करण्यात आली. सदर गोवंशीय जनावरे ही मुद्दस्सर हाजी कुरेशी (रा. भारतनगर, संगमनेर, ता. संगमनेर जि. अहिल्यानगर (फरार) याने कत्तल करण्याचे उद्देशाने सदर ठिकाणी बांधलेली असल्याची माहिती प्राप्त झाली. 

वरील दोन्ही ठिकाणी करण्यात आलेल्या कारवायामध्ये एकुण 11,75,700/- रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करुन 16 गोवंशीय जनावरांची सुटका करण्यात आली.

सदर कारवाई पोलीस निरीक्षक किरणकुमार कबाडी यांच्या मार्गदर्शनाखालील स्थानिक गुन्हे शाखेतील पोउपनि/महादेव गुट्टे, पोलीस अंमलदार गणेश लोंढे, संतोष खैरे, अमृत आढाव, आमेल आजबे, अरुण मोरे या पथकाने केली आहे.

संगमनेर शहर पोलीस ठाणे गु.र.नं. 1107/2025 भारतीय न्याय संहिता 2023 चे कलम 271, 325, 3(5) सह प्राणी संरक्षण अधिनियम कलम 5 (ब), 5(क), 9, 9(अ) प्रमाणे व संगमनेर शहर पोलीस ठाणे गु.र.नं. 1106/2025 प्राणी संरक्षण अधिनियम कलम 5 (अ), 5(ब), 9 सह प्राण्यांचा छळ अधिनियम कलम 3 व 11 प्रमाणे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

RRAJA VARAT

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!