बिबट्यांच्या वाढत्या हल्ल्याबाबत डॉ. जयश्री थोरात यांनी घेतली वन मंत्री गणेश नाईक यांची भेट
ग्रामीण भागात प्रकाश योजनेसह सुरक्षिततेसाठी प्रभावी उपाययोजना करण्याची मागणी
संगमनेर टाइम्स न्यूज नेटवर्क —
संगमनेर तालुक्यामध्ये मागील काही दिवसांपासून बिबट्यांच्या हल्ल्यांचे प्रमाण वाढले असून यामध्ये अनेक नागरिकांचा जीव गेला आहे. या पार्श्वभूमीवर युवक काँग्रेसच्या अध्यक्षा डॉ जयश्री थोरात यांनी राज्याचे वनमंत्री नामदार गणेश नाईक यांची मुंबई मंत्रालय येथे भेट घेऊन ग्रामीण भागात प्रकाश योजनेसह सुरक्षिततेच्या प्रभावी उपाययोजना कराव्या अशी मागणी केली.

मुंबई मंत्रालय येथील वनमंत्री गणेश नाईक यांच्या दालनामध्ये डॉ जयश्री थोरात यांनी त्यांची भेट घेऊन सविस्तर चर्चा केली. यावेळी त्यांनी म्हटले आहे की, संगमनेर तालुका हा कृषी आणि दूध व्यवसायामध्ये प्रगतशील आहे. दूध व्यवसायामुळे पशुपालन तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणात आहे. यामुळे महिलांचा व नागरिकांचा जनावरांचा चारा काढण्यासाठी शेतामध्ये सातत्याने वावर असतो. संगमनेर तालुक्यामध्ये मागील काही दिवसांपासून बिबट्यांचे हल्ल्यांचे प्रमाण वाढले आहे .यामध्ये काही नागरिकांचा जीव गेला आहे. मागील आठवड्यामध्ये अल्पवयीन सिद्धेश सुरज कडलग याचा बिबट्याच्या हल्ल्यामध्ये दुर्दैवी मृत्यू झाला. ग्रामीण भागातील नागरिकांमध्ये बिबट्या बाबत मोठी दहशत निर्माण झाली आहे .

याकरता ग्रामीण भागातील रस्त्यांवर प्रकाश व्यवस्था वाढविण्याबरोबर वन विभागाच्या वतीने विशेष टास्क फोर्स स्थापन करून प्रभावी व ठोस उपाययोजना करावी .तसेच वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी स्थानिक नागरिकांशी सातत्याने संवाद साधून विश्वास निर्माण करावा. बिबट्याच्या हल्ल्यातील गंभीर इजा व मृत झालेल्या व्यक्तींच्या नातेवाईकांना तात्काळ मदत मिळावी अशा मागण्या त्यांनी केल्या.

वनमंत्री नामदार गणेश नाईक यांनी तात्काळ वन विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना फोन लावून डॉ थोरात यांच्या मागण्यांवर कार्यवाही करण्यासाठी आदेश दिले. मानवतेचे संरक्षण करणे हे सर्वप्रथम गरजेचे असून त्या अनुषंगाने वनविभागाला नियोजन करण्याचे सांगितले आहे. सिद्धेश कडलग वरील बिबट्याच्या हल्ल्याबाबत बोलताना ते म्हणाले की, घटना झाल्यानंतर मला तातडीने माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांचा फोन आला त्यानंतर मी वन विभागाच्या अधिकाऱ्यांना फोन करून सूचना दिल्या. यापुढील काळामध्ये बिबट्यांपासून संरक्षण करण्याकरता आपल्या सर्वांच्या सूचनांचे पालन करून जास्तीत जास्त प्रभावी उपाययोजना करण्यात येतील असे ते म्हणाले.

याप्रसंगी डॉ. जयश्री थोरात यांनी वन विभाग, पर्यावरण संवर्धन, ग्रामीण भागातील आरोग्य याचबरोबर विविध विषयांवर वनमंत्री नामदार गणेश नाईक यांच्याबरोबर चर्चा केली. या बैठकीसाठी मंत्रालयातील वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
