महायुतीचे आंदोलन म्हणजे निव्वळ स्टंटबाजी – दिलीप पुंड 

4 वर्ष प्रशासन असताना गप्प का ? नवीन पदाधिकाऱ्यांनी अजून चार्ज सुद्धा घेतला नाही

संगमनेर प्रतिनिधी —

संगमनेर शहर हे वैभवशाली आहे आणि याचा सर्व नागरिकांना सार्थ अभिमान आहे. मागील चार वर्षापासून संगमनेर शहरांमध्ये प्रशासन राज होते. या काळामध्ये अनेक कामे रखडली आहेत. आता जनतेने सेवा समितीला भरघोस मतांनी कौल दिला आहे. नवीन पदाधिकाऱ्यांनी अजून कार्यभार सुद्धा घेतला नाही तर महायुतीच्या कार्यकर्त्यांनी मुख्याधिकाऱ्यांना मागण्यासाठी निवेदन दिले आहे. हा प्रकार म्हणजे निव्वळ स्टंटबाजी असल्याचे नवनिर्वाचित नगरसेवक तथा माजी नगराध्यक्ष दिलीप पुंड यांनी म्हटले आहे.

पुंड यांनी दिलेल्या प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे की, लोकनेते बाळासाहेब थोरात व माजी आमदार डॉ.सुधीर तांबे यांच्या नेतृत्वाखाली संगमनेर शहराने विकासाची वाटचाल कायम ठेवली. शहराचा महाराष्ट्रात लौकिक निर्माण झाला. मागील चार वर्ष नगरपालिकेत प्रशासन होते त्यामुळे अनेक कामे सत्ताधाऱ्यांनी राजकारणासाठी रखडवली हे सर्वांना माहीत आहे.

आमदार सत्यजित तांबे यांच्या नेतृत्वाखाली संगमनेर सेवा समितीला जनतेने भरघोस मताधिक्य दिले आणि भूलथापा देणाऱ्या व शहरांमध्ये अशांतता निर्माण करणाऱ्या महायुतीला थेट नाकारले. या नैराश्यामधून महायुतीच्या पदाधिकाऱ्यांनी काल मुख्याधिकाऱ्यांना निवेदन दिले खरे तर चार वर्षे सत्ता असताना या लोकांनी एक निवेदन सुद्धा दिले नाही किंवा विकास कामांमध्ये कधी सहयोग दिला नाही.

लोकनेते बाळासाहेब थोरात यांनी संगमनेर मध्ये सुसंस्कृत राजकीय परंपरा निर्माण केली. निवडणूक संपली की मतभेद राजकारण संपले. विकास कामांमध्ये सर्वांना बरोबर घ्यायचे ही आपली परंपरा आहे अजून नवीन पदाधिकाऱ्यांनी कार्यभार सुद्धा स्वीकारला नाही तर जनतेने नाकारलेले लोक आता निवेदन देण्यासाठी पुढे आले आहे.

खरे तर ऐतिहासिक निळवंडे धरण पाईपलाईन योजना ही नामदार बाळासाहेब थोरात यांनी आणली. शहरात विविध विकासाच्या योजना राबवल्या दुर्गाताई तांबे आणि स्वच्छ संगमनेर, सुंदर संगमनेर बनवण्यासाठी सातत्याने काम केले मात्र मागील चार वर्षांमध्ये प्रशासनराज मुळे अनेक ठिकाणी कचरा साचला याबाबत आम्ही अनेक वेळा आंदोलन केली. यावेळी मात्र महायुतीचे पदाधिकारी कुठेही नव्हते. आणि आता मात्र ते निवेदन देण्यासाठी पुढे आले आहे. जनता यांना ओळखून आहे. त्यांची ही स्टंटबाजी हास्यास्पद असून संगमनेर सेवा समितीच्या माध्यमातून नागरिकांना दिलेले आश्वासन पूर्ण करत सर्व नगरसेवक अत्यंत प्रामाणिकपणे आणि कार्यक्षमतेने काम करून शहराचा लौकिक वाढवतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

RRAJA VARAT

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!