नगरपालिकेतील अभूतपूर्व यशाचे श्रेय जनतेला — माजी मंत्री बाळासाहेब थोरात

तालुका दुरुस्ती करण्यासाठी सज्ज व्हा

याला टेकवू त्याला टेकवू असे म्हणणाऱ्यांना जनतेने टेकवले — आमदार सत्यजित तांबे 

संगमनेर टाइम्स न्यूज नेटवर्क —

संगमनेर तालुक्याला सुसंस्कृत राजकारणाची परंपरा आहे. मात्र मागील एक वर्षांमध्ये तालुक्यामध्ये दहशत अमली पदार्थांची तस्करी वाढली आहे. फ्लेक्सबाजीने शहर विद्रूप केले होते. याचा बंदोबस्त करू, त्याचा बंदोबस्त करू अशा धमक्या दिल्या जात होत्या. शहरातील जनतेने दुरुस्ती केली असून आता तालुक्यातील दुरुस्तीसाठी सज्ज व्हा असे आवाहन माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी केले असून हे अभूतपूर्व यश जनतेचे असल्याचे म्हटले आहे.

संगमनेर बस स्थानक येथे संगमनेर सेवा समितीच्या उमेदवारांच्या विजयानंतर झालेल्या भव्य रॅलीच्या समारोप प्रसंगी सभेचे बोलत होते. यावेळी व्यासपीठावर माजी आमदार डॉ. सुधीर तांबे, आमदार सत्यजित तांबे, दुर्गाताई तांबे, नूतन नगराध्यक्षा डॉ. मैथिली तांबे, उत्कर्षा रुपवते, डॉ.जयश्री थोरात यांच्यासह संगमनेर शहरातील विविध पदाधिकारी व कार्यकर्ते आणि संगमनेर सेवा समितीचे सर्व उमेदवार उपस्थित होते.

थोरात म्हणाले की, महाराष्ट्रातील सर्वात मोठा विजय नगराध्यक्ष डॉ. मैथिली तांबे यांनी मिळवला असून सेवा समितीचे 30 पैकी 27 उमेदवार विजयी होणे हा अभूतपूर्व विजय जनतेचा आहे. आपण सातत्याने काम केले याचा अभिमान आहे. निळवंडे धरण पूर्ण केले. शहरासाठी पाईपलाईन आणली. शहरामध्ये पाईपलाईनचे जाळे निर्माण करून दररोज शुद्ध पाणी शहराला मिळत आहे. हायटेक बस स्थानकासह वैभवशाली इमारती निर्माण केल्या. शहर समृद्ध घडवले. शहराचा लौकिक वाढवला.

मागील 30 वर्षांमध्ये नगरपालिकेमध्ये अत्यंत आदर्शवत काम करून शहर स्वच्छ आणि सुंदर बनवले. मात्र मागील एक वर्षांमध्ये संगमनेर शहरांमध्ये अमली पदार्थांची तस्करी वाढली असून गुंडगिरी आणि दहशत वाढली आहे. अमली पदार्थांच्या मागे बेकायदेशीर टोल वसुली असून ही तातडीने बंद करा.

शहरातील जनतेने दुरुस्ती केली आहे. आता तालुक्यातील जनतेने दुरुस्ती करण्यासाठी कटिबद्ध व्हा. निळवंडे धरण हे पुढील पन्नास पिढ्यांसाठी आहे. तालुक्याच्या लगत विमानतळ आले. रेल्वे साठी काम केले. मात्र मागील एक वर्षात रेल्वे कोणी घालवली हे ओळखा. रेल्वे आपल्याला आणायचीच आहे. कुणाच्या बाहेरच्या हातचे बाहुले होऊन संगमनेरच्या विकासावर आघात करणारे नेतृत्व तालुका सहन करणार नाही. त्यांचा बंदोबस्त करण्यासाठी युवकांनी तयार राहावे असे आवाहन केले.

तर आमदार सत्यजित तांबे म्हणाले की, आजचा विजय म्हणजे अपयशाने खचून जायचे नाही आणि यशाने उन्मत्त व्हायचे नाही असा आहे. याला टेकवू त्याला टेकवू असे म्हणणाऱ्यांना जनतेने टेकवले आहे. लोकनेते बाळासाहेब थोरात यांनी शहरासाठी भरभरून दिले आहे. विधानसभेतील पराभव नम्रपणे स्वीकारून चुका दुरुस्त केल्या सर्व जनतेने साथ दिली. सेवा समिती शहरातील जनतेचा भ्रमनिरास करणार नाही. जास्त चांगले काम करून संगमनेर शहर राज्यातील सर्वात आदर्श शहर बनविण्यासाठी काम करू असे ते म्हणाले.

यावेळी माजी आमदार डॉ सुधीर तांबे म्हणाले की, चांगल्या कामाची परंपरा आपल्याला आहे मात्र मागील एक वर्षांमध्ये शहरांमध्ये अमली पदार्थांची तस्करी हप्ते खोरी वाढली आहे जनतेने याविरुद्ध कौल दिले असून हा विजय जनतेला समर्पित आहे.

डॉ.जयश्री थोरात म्हणाल्या की सेवा समितीच्या सिंहाने बिबटे आणि इतरांना गारद केले आहे की वाटचाल आपल्याला कायम ठेवायचे असल्याचे त्या म्हणाल्या.

RRAJA VARAT

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!