संगमनेरच्या जनतेचा कौल विनम्रपणे स्वीकारतो — आमदार अमोल खताळ

स्थानिक पातळीवर धनशक्ती, दादागिरी, मतदारांना धमक्याचा आरोप 

 संगमनेर टाइम्स न्यूज नेटवर्क —

संगमनेर नगरपालिकेच्या निवडणुकीत आमदार अमोल खताळ यांच्या नेतृत्वाखाली लढणाऱ्या शिवसेना महायुतीला मोठ्या पराभवाला सामोरे जावे लागले आहे. नगरसेवकांच्या 30 जागांपैकी अवघी एक जागा शिवसेनेला मिळाली आहे, तर नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार सुवर्ण खताळ यांना देखील मोठ्या फरकाने पराभवाला सामोरे जावे लागले आहे. या संदर्भात आमदार अमोल खताळ यांनी सोशल मीडियातून पोस्ट करूनआम्ही हा पराभव विनम्रपणे स्वीकारत आहोत असे म्हटले आहे.

आमदार खताळ म्हणाले आहेत की, संगमनेरच्या जनतेचा कौल आम्ही विनम्रपणे स्वीकारतोय. नगरपालिका निवडणुकीत शिवसेना – महायुतीच्या वतीने सर्वसामान्य कुटुंबातील उमेदवारांना संधी देऊन, लढणाऱ्या कार्यकर्त्यांना सन्मान देण्याचा प्रामाणिक प्रयत्न आम्ही केला. महायुतीचे उमेदवार चांगल्या पद्धतीने निवडणुकीत लढले. संगमनेरकर जनतेने दिलेला कौल आम्ही मान्य केला आहे. पण निकालाने आमचे मनोबल कमी होणार नाही. माझ्यासारख्या एका सामान्य कार्यकर्त्याला संगमनेरकरांनी आमदार म्हणून सेवा करण्याची संधी दिली, त्या माध्यमातून विकास कामे सुरू आहेत.

राजकारणात चढ-उतार येत असतात. निकालाने हताश न होता उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब व पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील कार्यकर्त्यांना पुन्हा उभारी देतील. निवडणूक कार्यकर्त्यांची होती. जिथे जिथे कार्यकर्त्यांना प्रोत्साहन द्यायचे तिथे पक्षाने संधी दिली. निकालांचे पक्ष स्तरावर नक्कीच आत्मचिंतन केले जाईल.

शिवसेना हा कार्यकर्त्यांचा पक्ष आहे, निवडणुक ही कार्यकर्त्यांची होती, ते लढले. शिवसेना-भाजप पक्ष त्यांच्या पाठीशी उभा राहील. आम्ही प्रचारात कमी पडलो नाही मात्र स्थानिक पातळीवर धनशक्ती, दादागिरी, धमक्या मतदारांना मोठ्या प्रमाणात देण्यात आल्या. शहराच्या विकासाला नेहमी आमची साथ राहील. सर्व मतदार बंधू-भगिनींचे तसेच प्रचारादरम्यान अहोरात्र मेहनत करणारे शिवसेना महायुतीचे सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते, समर्थक यांचे आभार आमदार खताळ यांनी व्यक्त केले आहेत.

RRAJA VARAT

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!