‘खोटं बोल पण रेटून बोल!’
पुणे-नाशिक रेल्वेवरून संगमनेरमध्ये राजकीय वाद ;
आमदार अमोल खताळ यांना स्थानिक नागरिकांचे थेट सवाल
सोशल मीडियावर पण रंगली चर्चा…
संगमनेर प्रतिनिधी —
संगमनेर मार्गे प्रस्तावित पुणे-नाशिक सेमी हायस्पीड रेल्वे प्रकल्प रद्द झाल्याच्या पार्श्वभूमीवर तालुक्यातील राजकारण चांगलेच तापले आहे. प्रकल्प पुन्हा सुरू करण्यासाठी आमदार सत्यजित तांबे यांनी आंदोलनाचा पवित्रा घेतला असताना, आमदार अमोल खताळ यांनी या विषयावर विरोधकांकडून राजकारण होत असल्याचा आरोप केला. मात्र, मालपाणी लॉन्स येथे झालेल्या मेळाव्यात आमदार खताळ यांनी केलेल्या भाषणानंतर संगमनेरमधील स्थानिक नागरिकांनीच त्यांच्या वक्तव्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित करत पत्रकार परिषद घेऊन वस्तुस्थिती स्पष्ट करण्याची मागणी केली आहे.
“खोटं बोल पण रेटून बोल!” असा टोला लगावत नागरिकांनी आमदार खताळ यांनी केलेल्या दाव्यांवर अनेक प्रश्न उपस्थित केले आहेत. सोशल मीडिया मधून अशा पोस्ट देखील व्हायरल झाल्या असून त्यावरही घमासान चर्चा होत आहे.

पुणे-नाशिक रेल्वे प्रकल्पाबाबत नेमकी कोणती कागदपत्रे अपूर्ण होती ? ती आमदार अमोल खताळ आणि पालकमंत्र्यांनी मुख्यमंत्र्यांकडे कोणत्या स्वरूपात सादर केली ? या संदर्भातील सर्व माहिती पत्रकार परिषद घेऊन जनतेसमोर मांडावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.
सुमारे १६ हजार कोटी रुपयांच्या या प्रकल्पात राज्य सरकारचा वाटा केवळ २० टक्के होता. केंद्र सरकारचा २० टक्के हिस्सा आणि उर्वरित ६० टक्के निधी कर्जाच्या माध्यमातून उभारला जाणार होता. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ५० टक्के वाट्याला तयार असल्याचे सांगितले जात असताना, परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी राज्य सरकारने मंजूर केलेले १,००० कोटी रुपये परत का मागवले ? सत्ताधारी आमदार म्हणून याबाबत सरकारला जाब विचारणार का, असा सवालही नागरिकांनी उपस्थित केला आहे.

“हा रेल्वे मार्ग १९८०, १९९५ किंवा २००० सालीच व्हायला हवा होता,” या आमदार खताळ यांच्या विधानावरही नागरिकांनी आक्षेप घेतला आहे. रेल्वे हा केंद्र सरकारच्या अखत्यारीतील विषय असताना, त्या काळात अहमदनगर (अहिल्यानगर) जिल्ह्यातील लोकसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करणारे स्वर्गीय बाळासाहेब विखे पाटील यांच्या कार्यक्षमतेवरच हे विधान प्रश्नचिन्ह निर्माण करणारे नाही का, असा सवाल करण्यात आला आहे.
“सुप्रीम कोर्टाच्या निर्णयानंतर राजकीय थयथयाट समजण्यासारखा आहे ; मात्र भावनेच्या भरात वस्तुस्थितीपासून दूर जाऊन वक्तव्य करणे लोकप्रतिनिधींना शोभणारे नाही. जनतेची दिशाभूल न करता सत्य मांडण्याची जबाबदारी लोकप्रतिनिधींनी पार पाडावी,” असेही नागरिकांनी म्हटले आहे.

या नागरिकांनी उपस्थित केले सवाल
आमदार अमोल खताळ यांच्या वक्तव्याचा निषेध नोंदवत स्पष्टीकरणाची मागणी करणाऱ्यांमध्ये सतीश खताळ, रवींद्र हासे, प्रवीण हासे, रामेश्वर पानसरे, प्रितम साबळे, शिवाजी जगताप, अमोल शेलकर, शिवाजी गुंजाळ, निलेश गुंजाळ, प्रकाश कडलग, ॲड. समीर लामखडे, मोहसीन शेख, अनिल गुंजाळ, संदीप काकड, डॉ. सचिन वाळे, राम अरगडे आणि अरुण चव्हाण या प्रमुख ग्रामस्थ व कार्यकर्त्यांचा समावेश आहे.
या घडामोडींमुळे पुणे-नाशिक सेमी हायस्पीड रेल्वेचा मुद्दा पुन्हा एकदा संगमनेरच्या राजकारणाच्या केंद्रस्थानी आला असून, आता आमदार अमोल खताळ या प्रश्नांना सार्वजनिकरीत्या उत्तर देणार का, याकडे तालुक्याचे लक्ष लागले आहे.
