विजेचा खेळखंडोबा !

२२ सप्टेंबरला संगमनेरात ‘जनआक्रोश मोर्चा’

माजी मंत्री बाळासाहेब थोरात, माजी आमदार डॉ. सुधीर तांबे यांची उपस्थिती 

संगमनेर प्रतिनिधी –

संगमनेर तालुक्याला हक्काचे पाणी आणि पूर्ण दाबाने अखंडित वीजपुरवठा मिळावा, या प्रमुख मागण्यांसाठी मंगळवारी, २२ सप्टेंबर २०२६ रोजी सकाळी ९ वाजता यशोधन कार्यालय प्रांगण येथून प्रांताधिकारी कार्यालयावर ‘जनआक्रोश मोर्चा’ काढण्यात येणार आहे. काँग्रेस पक्षाचे नेते व माजी मंत्री बाळासाहेब थोरात, माजी आमदार डॉ. सुधीर तांबे आणि आमदार सत्यजित तांबे यांच्या प्रमुख उपस्थितीत हा मोर्चा निघणार असल्याची माहिती संगमनेर तालुका युवक काँग्रेसच्या अध्यक्षा डॉ. जयश्री थोरात यांनी दिली.

कृषी उत्पन्न बाजार समितीच्या वडगाव पान येथील शेतकरी मेळाव्यात बोलताना डॉ. थोरात यांनी प्रशासकीय धोरणांवर कडाडून टीका केली. त्या म्हणाल्या, “संगमनेर तालुका हा नागरिकांच्या व शेतकऱ्यांच्या मोठ्या कष्टातून उभा राहिला आहे. लोकनेते बाळासाहेब थोरात यांनी भंडारदरा धरणातून तालुक्यासाठी हक्काचे ३० टक्के पाणी मिळवून दिले, तसेच निळवंडे धरण व दोन्ही कालवे पूर्ण केले. आता कालव्यांद्वारे पाणी उपलब्ध झाले असताना, विजेचा खेळखंडोबा करून हे पाणी पुढे नेण्याचे कारस्थान सुरू आहे.”

तालुक्यात सध्या रात्री ६ ते ९ या वेळेत लोडशेडिंग सुरू असून, यामुळे शेतकरी व सामान्य नागरिक त्रस्त झाले आहेत. याबाबत प्रशासनाला वेळोवेळी निवेदने देऊनही कोणतीही ठोस कारवाई झालेली नाही. तालुक्यातील शेतकऱ्यांना हक्काची ११ तास पूर्ण दाबाने वीज आणि हक्काचे पाणी मिळालेच पाहिजे, या मागणीसाठी हा एल्गार पुकारण्यात आला आहे.

या मोर्चात काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना, आरपीआय, पुरोगामी व समविचारी पक्ष, विविध सामाजिक संघटना, विद्यार्थी संघटना, संगमनेर तालुका कृती समिती, महिला संघटना व स्वाभिमानी संगमनेर तालुका संघटना यांसह विविध संस्थांचे पदाधिकारी, कार्यकर्ते, युवक, महिला व शेतकरी मोठ्या संख्येने सहभागी होणार आहेत. तालुक्यातील सर्व नागरिक व शेतकऱ्यांनी या जनआक्रोश मोर्चामध्ये बहुसंख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन संयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.

RAJA VARAT

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!