राजापूर जि.प. केंद्र शाळेच्या मुख्याध्यापकांवर कारवाई होणार का ? पालकांचा सवाल

पंचायत समितीच्या शिक्षण विभागाने घेतली गंभीर दखल

संगमनेर प्रतिनिधी :

राजापूर येथील जिल्हा परिषद केंद्र शाळेतील शाळा व्यवस्थापन समिती (SMC) निवड प्रक्रियेत नियमांचे उल्लंघन झाल्याच्या तक्रारींना आता प्रशासकीय पातळीवर गांभीर्य प्राप्त झाले आहे. या तक्रारींची पंचायत समितीच्या शिक्षण विभागाने दखल घेतली असून, अधिकाऱ्यांच्या पथकाने राजापूर येथे प्रत्यक्ष भेट देऊन संबंधित मुख्याध्यापकांचे लेखी म्हणणे घेतल्याची माहिती आहे. यावेळी पालकांनीही अधिकाऱ्यांसमोर आपली बाजू मांडत निवड प्रक्रियेबाबत आक्षेप नोंदवून चौकशी व आवश्यक कारवाईची मागणी केली.

शाळेतील मुख्याध्यापकांच्या कारभाराबाबत यापूर्वीपासूनच पालकांमध्ये नाराजी असल्याचे काही पालकांचे म्हणणे आहे. त्यातच SMC निवड प्रक्रियेत गैरप्रकार झाल्याचा आरोप करण्यात आल्याने या प्रकरणाला अधिक महत्त्व प्राप्त झाले आहे. संबंधित प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करून नियमांचे उल्लंघन आढळल्यास जबाबदार व्यक्तींवर शिस्तभंगाची कारवाई करावी, अशी मागणी पालकांकडून करण्यात येत आहे.

SMC निवड प्रक्रियेबाबत उपस्थित करण्यात आलेल्या आक्षेपांच्या पार्श्वभूमीवर निवडणुकीच्या दिवशीचे प्रोसिडिंग बुक, अजेंडा नोटीस, उपस्थित पालकांची नोंद व स्वाक्षऱ्यांचे पत्रक यांची प्रशासकीय पातळीवर तपासणी केली जाणार का, हा प्रश्न उपस्थित झाला आहे. तसेच पालकांवर दबाव आणल्याचा आरोप करण्यात आला असल्याने संबंधित पालकांचे स्वतंत्र म्हणणे व जबाब नोंदवले जाणार का, याकडेही पालकांचे लक्ष लागले आहे.

शासकीय नियम व शिक्षण विभागाच्या निर्देशांनुसार SMC निवड प्रक्रिया पार पडली की नाही, याची वस्तुनिष्ठ पडताळणी करून अहवाल तयार करण्याची मागणी पालकांनी केली आहे.

‘तक्रारीत तथ्य नसेल तर वस्तुस्थिती स्पष्ट करा’

ग्रामस्थ आणि पालकांनी शिक्षण विभागाच्या अधिकाऱ्यांसमोर आपली भूमिका मांडताना, तक्रारींमध्ये तथ्य आढळल्यास संबंधितांवर नियमानुसार कठोर प्रशासकीय कारवाई करावी, अशी मागणी केली आहे. त्याचवेळी तक्रारी निराधार असल्याचे चौकशीत निष्पन्न झाल्यास प्रशासनाने वस्तुस्थिती स्पष्ट करून पालकांमधील गैरसमज दूर करावेत, अशीही भूमिका काही पालकांनी मांडली.

दरम्यान, या प्रकरणात कोणत्याही प्रकारचा स्थानिक दबाव न येता चौकशी पारदर्शकपणे करण्यात यावी, अशी अपेक्षा पालकांनी व्यक्त केली आहे. चुकीच्या प्रकारांना पाठीशी घातल्याचे आढळल्यास आंदोलन करण्याचा इशाराही काही पालकांनी दिला आहे.

पंचायत समितीच्या शिक्षण विभागाने प्राथमिक स्तरावर दखल घेतल्यानंतर आता पुढील चौकशी आणि प्रशासकीय कार्यवाहीकडे राजापूर परिसराचे लक्ष लागले आहे. चौकशीत नेमकी कोणती वस्तुस्थिती समोर येते, SMC निवड प्रक्रिया नियमांनुसार झाली होती का आणि नियमभंग सिद्ध झाल्यास संबंधितांवर कोणती कारवाई केली जाते, हे चौकशी अहवालानंतर स्पष्ट होणार आहे.

RAJA VARAT

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!