संगमनेरच्या दुष्काळसदृश स्थितीची मुख्यमंत्र्यांकडे मांडणी ; आमदार खताळांची तातडीच्या मदतीची मागणी
३३ हजार ७९२.५ हेक्टर खरीप क्षेत्र बाधित ; पंचनामे करून शेतकऱ्यांना आर्थिक मदत देण्याची मागणी
संगमनेर / प्रतिनिधी :
अनियमित पाऊस आणि पावसातील दीर्घ खंडामुळे संगमनेर तालुक्यातील खरीप पिकांची अवस्था चिंताजनक झाली आहे. अनेक भागांत पिके कोमेजून उत्पादनात मोठी घट होण्याची शक्यता निर्माण झाली असून, शेतकऱ्यांसमोर आर्थिक संकट उभे राहण्याची परिस्थिती आहे. या पार्श्वभूमीवर आमदार अमोल खताळ पाटील यांनी मुंबई येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन संगमनेरच्या शेतकऱ्यांच्या समस्या मांडल्या. बाधित क्षेत्राची तातडीने प्रत्यक्ष पाहणी करून पंचनामे करावेत आणि शेतकऱ्यांना आर्थिक मदत उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी त्यांनी निवेदनाद्वारे केली असल्याची माहिती प्रसिद्धी विभागाकडून देण्यात आली आहे.
तालुक्यात यंदाच्या खरीप हंगामात मका, सोयाबीन, बाजरी तसेच विविध कडधान्यांची मोठ्या प्रमाणावर पेरणी झाली आहे. पेरणीनंतर सुरुवातीला झालेल्या पावसामुळे पिकांची उगवण समाधानकारक झाली; मात्र त्यानंतर पावसाने दीर्घ खंड दिल्याने पिकांच्या वाढीवर विपरीत परिणाम झाला आहे. सध्या पिकांना पाण्याची गरज असताना पुरेसा पाऊस न झाल्याने अनेक भागांतील पिके कोमेजली आहेत.

या परिस्थितीची दखल घेत आमदार खताळ यांनी कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांचे संयुक्त पथक नियुक्त करून वस्तुनिष्ठ पीक पाहणी करण्याची मागणी मुख्यमंत्र्यांकडे केली. संबंधित विभागाला तातडीने प्रत्यक्ष शेतावर जाऊन पाहणी व पंचनामे करण्याचे आदेश द्यावेत, अशी मागणीही त्यांनी केली. पावसाच्या खंडामुळे झालेल्या नुकसानीचे वस्तुनिष्ठ मूल्यांकन झाल्यानंतर त्याआधारे शेतकऱ्यांना मदत देणे शक्य होईल, असे त्यांनी मुख्यमंत्र्यांच्या निदर्शनास आणून दिले.
पावसाच्या अनिश्चिततेमुळे शेतकऱ्यांचा उत्पादन खर्च वाढला आहे. त्यातच खरीप पिकांचे नुकसान झाल्यास शेतकऱ्यांवरील आर्थिक भार आणखी वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे शासनाने परिस्थितीचा तातडीने आढावा घेऊन आर्थिक मदत, आवश्यक सवलती आणि नुकसानभरपाईच्या योजनांचा लाभ शेतकऱ्यांना मिळवून द्यावा, अशी मागणी आमदार खताळ यांनी केली.

३३ हजार ७९२.५ हेक्टर क्षेत्र बाधित
संगमनेर कृषी विभागाच्या चार कृषी मंडलांत एकूण ८३ हजार ७४१ हेक्टर क्षेत्रावर खरीप पिकांची पेरणी झाली आहे. त्यापैकी ३३ हजार ७९२.५ हेक्टर म्हणजे ४०.३५ टक्के क्षेत्र बाधित झाल्याची माहिती कृषी विभागाने दिली आहे.
कोकणगाव कृषी मंडल : २५ हजार ४८२ हेक्टर पेरणी क्षेत्रापैकी १६ हजार २०० हेक्टर (६३.५७ टक्के) बाधित.
साकूर कृषी मंडल : २२ हजार १४ हेक्टर पेरणी क्षेत्रापैकी १० हजार ३४६ हेक्टर (४७ टक्के) बाधित.
घारगाव कृषी मंडल : १६ हजार ८०७ हेक्टर पेरणी क्षेत्रापैकी ६ हजार १११.५ हेक्टर (३६.३६ टक्के) बाधित.
संगमनेर कृषी मंडल : १९ हजार ४३८ हेक्टर पेरणी क्षेत्रापैकी १ हजार १३५ हेक्टर (५.८४ टक्के) बाधित असल्याचे कृषी विभागाने स्पष्ट केले आहे.
