वेल्हाळेत ‘प्लांट क्लिनिक’ची सुरुवात ; पिकांच्या रोग-किडींच्या निदानासाठी शेतकऱ्यांना तज्ज्ञ मार्गदर्शन

एसएमबीटी कृषी महाविद्यालयाचा उपक्रम 

संगमनेर प्रतिनिधी –

सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात कृषी महाविद्यालय, संगमनेरच्या चतुर्थ वर्षातील देशमुख यश, ढाकणे शिवम, दिघे युवराज, फरगडे यश, गाडे प्रणव व गोरे आदित्य या विद्यार्थ्यांनी ‘ग्रामीण जागरूकता कार्यानुभव (RAWE)’ कार्यक्रमांतर्गत वेल्हाळे गावात कृषी ज्ञान केंद्र अर्थात ‘प्लांट क्लिनिक’ उभारले आहे.

शेतकऱ्यांना पिकांवरील रोग, किडी, तण, अन्नद्रव्यांची कमतरता तसेच इतर पीक समस्यांबाबत योग्य व तांत्रिक मार्गदर्शन मिळावे, हा या उपक्रमाचा उद्देश आहे.

या प्लांट क्लिनिकच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या शेतातील पिकांची पाहणी करून रोग व किडींचे निदान, अन्नद्रव्यांची कमतरता ओळखणे, तण व्यवस्थापन, कीटकनाशक व बुरशीनाशकांचा योग्य वापर, जैविक उपाय तसेच एकात्मिक पीक व्यवस्थापनाबाबत मार्गदर्शन करण्यात येणार आहे.

पिकांवर कोणतीही समस्या आढळल्यास शेतकऱ्यांनी रोगग्रस्त पाने, फळे, झाडांचे नमुने किंवा छायाचित्रे प्लांट क्लिनिकमध्ये आणावीत. त्यांचे निरीक्षण करून समस्येचे योग्य निदान करण्यात येईल आणि आवश्यक उपाययोजना सुचवण्यात येणार आहेत.

यावेळी ग्रामपंचायतीचे सरपंच, ग्रामपंचायत सदस्य तसेच ग्रामस्थांनी प्लांट क्लिनिकला भेट देऊन पाहणी केली. पिकांवरील विविध रोग-किडी, तण, अन्नद्रव्यांची कमतरता व त्यावरील उपाययोजनांची माहिती जाणून घेत त्यांनी या उपक्रमाचे कौतुक केले.

महाविद्यालयातील विषय तज्ज्ञांनीही क्लिनिकला भेट देऊन विद्यार्थ्यांना योग्य मार्गदर्शन केले. कृषी विस्तारशास्त्राचे डॉ. साजन हिंगोणेकर, मृदा शास्त्राचे डॉ. शैलेश आचार्य, कीटकशास्त्राचे प्रा. संदिप कानवडे व वनस्पतीरोगशास्त्राचे प्रा. अत्तार सर यांचे यावेळी मोलाचे मार्गदर्शन लाभले. तसेच महाविद्यालयाच्या प्राचार्यांनीही वेळोवेळी या कामाची दखल घेतली.

सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात कृषी महाविद्यालयाच्या RAWE उपक्रमांतर्गत विद्यार्थ्यांकडून हा उपक्रम राबविण्यात येत असून, शेतकऱ्यांना आधुनिक व शास्त्रीय कृषी तंत्रज्ञानाची माहिती देण्याचा प्रयत्न या माध्यमातून करण्यात येत आहे.

RAJA VARAT

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!