आधुनिक शेती तंत्रज्ञानाचे धडे आता ओझरच्या शेतकऱ्यांना मिळणार !
सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात कृषी महाविद्यालयाचे सात कृषिदूत दाखल ; पीक व्यवस्थापनापासून पशुसंवर्धनापर्यंत करणार मार्गदर्श
संगमनेर (प्रतिनिधी) :
शेतीसमोरील बदलती आव्हाने, वाढता उत्पादन खर्च, कीड-रोगांचा प्रादुर्भाव आणि हवामानातील बदल लक्षात घेता शेतकऱ्यांना आधुनिक कृषी तंत्रज्ञानाची माहिती मिळणे अत्यंत आवश्यक बनले आहे. याच पार्श्वभूमीवर महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी अंतर्गत सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात कृषी महाविद्यालय, अमृतनगर येथील कृषी पदवीच्या सात विद्यार्थ्यांचे ग्रामीण कृषी जागरूकता कार्यानुभव व कृषी औद्योगिक संलग्नता कार्यक्रमांतर्गत ओझर (ता. संगमनेर) येथे आगमन झाले आहे. या उपक्रमामुळे गावातील शेतकऱ्यांना आधुनिक शेतीचे तंत्रज्ञान प्रत्यक्ष अनुभवातून समजून घेण्याची संधी उपलब्ध होणार आहे.
गावात दाखल झालेल्या कृषिदूतांचे सरपंच, उपसरपंच, ग्रामसेविका, विविध शासकीय विभागांचे अधिकारी आणि ग्रामस्थांच्या उपस्थितीत उत्साहात स्वागत करण्यात आले. अक्षय पाळवे, पार्थ पानसरे, श्रेयस राऊत, वैभव सातपुते, ऋतुराज शिंदे, श्रेयश सोंडकर आणि रुद्राक्ष गाढवे या सात विद्यार्थ्यांचा कृषिदूतांमध्ये समावेश आहे.

यावेळी ओझरच्या सरपंच गिरिजा अण्णासाहेब साबळे, उपसरपंच दगडू काशिनाथ शेपाळ, ग्रामसेविका ज्योती विधाते, पशुधन विकास अधिकारी डॉ. शैलेश बन आणि सहाय्यक कृषी अधिकारी प्रवीण कोळपे यांनी विद्यार्थ्यांचे स्वागत करून त्यांना पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या. गावातील शेतकऱ्यांनीही या उपक्रमाचे स्वागत करत कृषिदूतांना आवश्यक ते सहकार्य करण्याची ग्वाही दिली.
या उपक्रमाच्या माध्यमातून कृषिदूत गावातील शेतकऱ्यांशी थेट संवाद साधणार असून आधुनिक शेती तंत्रज्ञान, सुधारित बियाणे, मृदा आरोग्य, खतांचे संतुलित व्यवस्थापन, पीक संरक्षण, कीड व रोग नियंत्रण तसेच शासनाच्या विविध कृषी योजनांची माहिती देणार आहेत. शेतकऱ्यांच्या प्रत्यक्ष अडचणी समजून घेऊन त्यावर शास्त्रीय पद्धतीने उपाययोजना सुचविणे, कृषी प्रात्यक्षिके आयोजित करणे आणि शेतीविषयक जनजागृती करणे यावर विशेष भर दिला जाणार आहे.

शेतीला पूरक व्यवसाय म्हणून पशुपालनाचे महत्त्व लक्षात घेऊन पशुधनाचे आरोग्य, वेळेवर लसीकरण, रोगप्रतिबंधक उपाययोजना, संतुलित आहार आणि दुग्धव्यवसाय व्यवस्थापन याबाबतही पशुपालकांना मार्गदर्शन करण्यात येणार आहे. गावातील शेती आणि शेतीपूरक व्यवसायांचा अभ्यास करून शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढविण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाची उपयुक्तता पटवून देण्याचा प्रयत्न या माध्यमातून होणार आहे.
हा उपक्रम माजी कृषिमंत्री बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली राबविण्यात येत आहे. अमृतवाहिनी शेती व शिक्षण विकास संस्थेच्या सचिव सौ. शरयूताई देशमुख आणि संस्थेचे मुख्य प्रशासक श्री. निंबाळकर यांचे या उपक्रमाला सहकार्य लाभत आहे.
महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. आर. एस. वाघ, प्रशासन अधिकारी प्रा. जी. बी. बाचकर, शैक्षणिक प्रमुख प्रा. रवींद्र दसपुते, कार्यक्रम समन्वयक डॉ. शैलेश आचार्य आणि कार्यक्रम अधिकारी डॉ. साजन हिंगोणेकर यांच्यासह महाविद्यालयातील प्राध्यापकांचे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन लाभणार आहे.

या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांना ग्रामीण भागातील शेतीचे प्रत्यक्ष स्वरूप, शेतकऱ्यांच्या समस्या आणि शेतीतील आव्हाने समजून घेता येणार आहेत. त्याचबरोबर कृषी शिक्षणातून मिळालेले शास्त्रीय ज्ञान शेतकऱ्यांपर्यंत पोहोचणार आहे. विद्यार्थी आणि शेतकरी यांच्यातील ज्ञानाची देवाणघेवाण, आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर आणि शेतीपूरक व्यवसायांना प्रोत्साहन यामुळे ओझर गावाच्या कृषी विकासाला निश्चितच नवी दिशा मिळेल, असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.
