दोन वर्षे विश्वासाची, दोन वर्षे परिवर्तनाची !

आमदार अमोल खताळ पाटील यांच्या नेतृत्वाखाली संगमनेरच्या विकासाला नवी दिशा

संगमनेर विधानसभा मतदारसंघाचे आमदार अमोल खताळ पाटील यांच्या दोन वर्षांच्या कार्यकाळात विकासकामांना गती देण्याबरोबरच अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेले प्रश्न मार्गी लावण्यासाठी प्रयत्न करण्यात आले. जनतेने दाखवलेल्या विश्वासाला न्याय देत रस्ते, पाणी, सिंचन, आरोग्य, शिक्षण, रोजगार आणि ग्रामीण पायाभूत सुविधांच्या विकासाला प्राधान्य देण्याची भूमिका त्यांनी घेतली आहे.

रस्ते आणि पायाभूत सुविधांना चालना

ग्रामीण भागातील दळणवळण अधिक सक्षम करण्यासाठी विविध रस्ते आणि पुलांच्या कामांना निधी उपलब्ध करून देण्यात आला. मिर्झापूर–धांदरफळ खुर्द रस्त्यासाठी सुमारे ६ कोटी ५९ लाख ६६ हजार रुपये, तर चंदनापुरी–शिरापूर पुलासाठी ३ कोटी २४ लाख ७० हजार रुपयांच्या कामांचा समावेश आहे. यामुळे ग्रामीण भागातील संपर्क व्यवस्था अधिक मजबूत होण्यास मदत होणार आहे.

सिंचन आणि पाणीप्रश्नांवर विशेष लक्ष

पाणीटंचाई आणि अनियमित पावसाच्या पार्श्वभूमीवर सिंचन व पाणीपुरवठा योजनांसाठी पाठपुरावा करण्यात आला. साकूर उपसा सिंचन योजनेसाठी २१७ कोटी रुपये, भोजापूर चारीसाठी ४५ कोटी रुपये आणि घुलेवाडी पाणीपुरवठा योजनेसाठी ४२ कोटी रुपयांच्या कामांना महत्त्व देण्यात आले. खांबा परिसरातील कामधेनू उपसा सिंचन योजना, जलसंधारण, विहीर पुनर्भरण आणि दुष्काळी भागातील पाणीपुरवठ्याच्या प्रश्नांवरही प्रयत्न सुरू आहेत. या योजनांचा प्रत्यक्ष लाभ शेतकऱ्यांपर्यंत पोहोचविण्याचे आव्हान आगामी काळात महत्त्वाचे ठरणार आहे.

शेतकरी आणि ग्रामीण अर्थव्यवस्थेला बळ

शेतकऱ्यांच्या समस्या शासनदरबारी मांडणे, शेतीसाठी पाणी, वीज आणि रस्त्यांच्या सुविधा उपलब्ध करून देणे, कृषी योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी पाठपुरावा करणे यावर भर देण्यात आला आहे. शेतीपूरक व्यवसाय, दुग्धव्यवसाय, शीतगृहे, कृषी प्रक्रिया उद्योग आणि स्थानिक बाजारपेठांच्या विकासातून ग्रामीण अर्थव्यवस्था मजबूत करण्याचे उद्दिष्ट आहे.

आरोग्य आणि रोजगाराच्या संधी

ग्रामीण नागरिकांना दर्जेदार आरोग्यसेवा मिळावी यासाठी १०० खाटांच्या महिला व बाल रुग्णालयासह आरोग्य सुविधांच्या विस्तारासाठी शासनाकडे पाठपुरावा सुरू आहे. प्राथमिक आरोग्य केंद्रांच्या मंजुरीनंतर त्यांची कामेही प्रगतीपथावर आहेत.

युवकांना स्थानिक पातळीवर रोजगार मिळावा, यासाठी औद्योगिक विकासालाही प्राधान्य देण्यात आले आहे. पठार भागातील कौठे मलकापूर येथे औद्योगिक वसाहतीसाठी जागा उपलब्ध करून देण्यात आली असून, पुढील प्रशासकीय प्रक्रिया पूर्ण करून एमआयडीसी उभारणीसाठी प्रयत्न सुरू आहेत.

एसटी सेवा आणि प्रवासी सुविधांमध्ये सुधारणा

ग्रामीण भागातील प्रवाशांच्या सोयीसाठी लोहार, निळवंडे, मांंची फाटा, वडगाव पान, धांदरफळ बुद्रुक-खुर्द आणि वरवंडी फाटा येथे आधुनिक प्रवासी निवारे उभारण्याचे प्रस्ताव देण्यात आले आहेत. संगमनेर आगाराला १५ लालपरी व जिजाऊ एसटी बसेस उपलब्ध झाल्या असून, २५ इलेक्ट्रिक शिवाई बसेस मंजूर झाल्या आहेत. त्यापैकी ११ बसेस प्रवाशांच्या सेवेत दाखल झाल्या आहेत.

पर्यटन आणि धार्मिक स्थळांचा विकास

निजर्णेश्वर, पेमगिरी आणि बाळेश्वर यांसारख्या पर्यटनस्थळांच्या विकासासाठी प्रयत्न करण्यात येत आहेत. धांदरफळ येथील बिरोबा महाराज मंदिर परिसरात रस्त्याचे काँक्रीटीकरण आणि पथदिव्यांसारख्या सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. यातून स्थानिक पर्यटन आणि अर्थव्यवस्थेला चालना मिळण्याची अपेक्षा आहे.

पुढील वाटचालीसमोर मोठी आव्हाने

दोन वर्षांत विविध विकासकामांना चालना देण्याचे प्रयत्न झाले असले, तरी संगमनेरच्या सर्वांगीण विकासासाठी अद्याप मोठा पल्ला गाठायचा आहे. पाणीटंचाईवर कायमस्वरूपी उपाय, दर्जेदार रस्ते, आरोग्यसेवा, स्थानिक रोजगार, शेतीला शाश्वत आधार आणि नागरी समस्यांचे निराकरण ही प्रमुख आव्हाने आहेत. मंजूर कामे वेळेत आणि दर्जेदार पद्धतीने पूर्ण होऊन त्याचा प्रत्यक्ष लाभ नागरिकांना मिळणे हीच विकासकामांच्या यशाची खरी कसोटी ठरणार आहे.

दोन वर्षांचा हा प्रवास म्हणजे जनतेने दिलेल्या विश्वासाची जाणीव आणि पुढील विकासाची नवी दिशा आहे. विकासकामांचा वेग, कामांचा दर्जा आणि सर्वसामान्यांच्या जीवनातील सकारात्मक बदल यांच्या माध्यमातून जनतेच्या अपेक्षा पूर्ण करण्याची जबाबदारी आमदार अमोल खताळ पाटील यांच्यावर आहे. आगामी काळात संगमनेरच्या विकासाला अधिक गती मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

शब्दांकन : गोरक्षनाथ नेहे पाटील, आमदार अमोल खताळ पाटील जनसंपर्क विभाग

RAJA VARAT

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed

error: Content is protected !!