कोठे खुर्दमध्ये रस्ता बंद झाल्याने तीन कुटुंबे लँड लॉक ; ३० गायींचा दूध व्यवसाय अडचणीत !

किमान तात्पुरता रस्ता उपलब्ध करून द्यावा..

संगमनेर प्रतिनिधी :

कोठे खुर्द (ता. संगमनेर) येथे अनेक वर्षांपासून वहिवाटीत असलेला जुना रस्ता बंद करण्यात आल्याने तीन कुटुंबे लँड लॉक झाली आहेत. घराबाहेर पडण्याचा मार्ग बंद झाल्यामुळे वृद्ध रुग्णांचे आरोग्य, शाळकरी मुलांचे शिक्षण, शेतकऱ्यांची शेती आणि दूध व्यवसाय अशा अनेक समस्या निर्माण झाल्या आहेत. या गंभीर प्रकारामुळे संबंधित कुटुंबांचे दैनंदिन जीवन विस्कळीत झाले असून, प्रशासनाने तातडीने रस्ता खुला करून द्यावा, अशी मागणी करण्यात आली आहे.

या प्रकरणी अडचणीत आलेल्या कुटुंबीयांच्या वतीने प्रसिद्धी पत्रक देण्यात आले आहे. त्यावर खालील नावे आहेत. विश्वनाथ संभाजी ढोकरे, गोरक्ष विश्वनाथ ढोकरे, सुनील विश्वनाथ ढोकरे, भाऊसाहेब देवराम वाकळे आणि बाळासाहेब रामदास ढोकरे या प्रकरणात नऊ जणांना नोटिसा बजावण्यात आल्या आहेत.

रस्ता बंद झाल्याने घरापासून पक्क्या रस्त्यापर्यंत पोहोचणे कठीण झाले आहे. कुटुंबातील काही वृद्ध व्यक्तींना हृदयविकारासारखे गंभीर आजार असून, आपत्कालीन परिस्थितीत रुग्णालयात पोहोचणे आणि रुग्णवाहिका घरापर्यंत आणणेही अवघड झाले आहे. शाळकरी मुलांना शाळेत जाण्यासाठी, तर नोकरी करणाऱ्यांना कामावर पोहोचण्यासाठी अडचणी येत आहेत असे प्रेस नोट मध्ये म्हटले आहे.

या कुटुंबांकडे सुमारे ३० गायी असून, रस्ता बंद झाल्यामुळे जनावरांसाठी चारा आणणे, दूध डेअरीपर्यंत पोहोचविणे तसेच पशुवैद्यकीय उपचार मिळविणे कठीण झाले आहे. परिणामी दूध व्यवसायावर आर्थिक संकट ओढवले आहे. दुसरीकडे, शेतात ट्रॅक्टर, बैलजोडी आणि शेतीची अवजारे नेता येत नसल्याने मशागतीची कामेही ठप्प झाली आहेत. वेळेत शेतीची कामे न झाल्यास पीक हंगाम वाया जाण्याची भीती पत्रकात व्यक्त करण्यात आली आहे.

प्रशासनाने प्रत्यक्ष परिस्थितीची पाहणी करून जुना वहिवाटीचा रस्ता तातडीने खुला करावा. कायमस्वरूपी निर्णय होईपर्यंत किमान तात्पुरता रस्ता उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी तक्रारदारांनी केली आहे. रस्त्याचा प्रश्न तातडीने मार्गी न लागल्यास उपोषण अथवा आंदोलन करण्याचा इशाराही त्यांनी दिला आहे.

RAJA VARAT

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!