कोठे खुर्दमध्ये जुना वहिवाटीचा रस्ता बंद केल्याचा आरोप ; तहसीलदारांकडे रस्ता प्रकरणी दावा दाखल !

नऊ जणांना नोटीस

संगमनेर : प्रतिनिधी

संगमनेर तालुक्यातील कोठे खुर्द येथे जुन्या वहिवाटीच्या रस्त्यावर अडथळे निर्माण करून रस्ता बंद केल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे. या प्रकरणी गावातील तीन शेतकऱ्यांनी संगमनेरच्या तहसीलदार तथा मामलेदार न्यायालयात धाव घेतली असून, अर्ज दाखल केला आहे. या अर्जाच्या अनुषंगाने तहसील कार्यालयाकडून संबंधित नऊ जणांना नोटीस बजावण्यात आली आहे.

अर्जदारांच्या म्हणण्यानुसार, मौजे कोठे खुर्द येथील गट क्रमांक २२२/२ पासून गट क्रमांक १६४ मध्ये जाणारा जुना वहिवाटीचा रस्ता असून, या रस्त्याचा वापर अनेक वर्षांपासून शेतात ये-जा करण्यासाठी केला जात आहे. मात्र, गैरअर्जदार यांनी २१ ऑक्टोबर २०२६ रोजी या रस्त्यावर पाणी सोडून चिखल केला, रस्त्यावर माती व लाकडे टाकली तसेच ट्रॅक्टर व ट्रॉली आडवी करून रस्ता पूर्णपणे बंद केल्याचा आरोप अर्जात करण्यात आला आहे.

यामुळे अर्जदारांचा शेताकडे जाण्याचा मार्ग बंद झाला असून, शेतीची कामे आणि शेतमालाची वाहतूक करण्यात अडचणी निर्माण झाल्याचे अर्जदारांचे म्हणणे आहे.

तीन अर्जदार, नऊ गैरअर्जदार

या प्रकरणातील अर्जदारांची नावे पुढीलप्रमाणे :

* विश्वनाथ संभा ढोकरे

* बाळासाहेब रामदास ढोकरे

* भाऊसाहेब देवराम वाकळे.

तर गैरअर्जदार म्हणून पुढील नऊ जणांची नावे नमूद आहेत :

* बाळासाहेब संपत ढोकरे

* दत्तात्रय देवराम वाकळे

* अंकुश संपत ढोकरे

* जनार्दन दगडू ढोकरे

* सुखदेव दगडू ढोकरे

* भाऊसाहेब शिवराम ढोकरे

* सुनीता अनिल ढोकरे

* दीक्षा अनिल ढोकरे

एक गैर अर्जदार अल्पवयीन आहे

सर्व संबंधित व्यक्ती कोठे खुर्द, ता. संगमनेर येथील रहिवासी आहेत.

महसूल विभागाकडून पाहणी व अहवालाचे निर्देश

या प्रकरणाची दखल घेत तहसीलदार तथा कार्यकारी दंडाधिकारी, संगमनेर यांनी मंडळ अधिकारी, घारगाव यांना संबंधित रस्त्याची प्रत्यक्ष पाहणी करण्याचे निर्देश दिले आहेत. अर्जदार व गैरअर्जदार यांचे म्हणणे नोंदवून घटनास्थळाचा पंचनामा, कच्चा नकाशा तयार करावा आणि रस्त्याच्या वापराबाबत वस्तुस्थितीदर्शक सविस्तर चौकशी अहवाल तहसील कार्यालयात सादर करावा, असे पत्रात नमूद आहे.

तहसील कार्यालय संगमनेर यांच्याकडून बजावण्यात आलेल्या नोटिशीनुसार, संबंधित अर्जदार व गैरअर्जदार यांनी सोमवार, दिनांक १ डिसेंबर २०२६ रोजी दुपारी ३ वाजता तहसील कार्यालय, संगमनेर येथे आवश्यक कागदपत्रांसह उपस्थित राहण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. अनुपस्थित राहिल्यास आपले काहीही म्हणणे नाही, असे गृहीत धरून गुणदोषांवर निर्णय दिला जाईल, असा इशाराही नोटिशीत देण्यात आला आहे.

दरम्यान, हा रस्ता नेमका कोणत्या स्वरूपाचा आहे, त्यावर पूर्वापार वहिवाट आहे का आणि रस्त्यावरील कथित अडथळे दूर करण्याबाबत कायदेशीरदृष्ट्या कोणता निर्णय होतो, याकडे कोठे खुर्दमधील ग्रामस्थांचे लक्ष लागले आहे.

RAJA VARAT

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed

error: Content is protected !!