टंचाई आढावा बैठकीला गैरहजर अधिकाऱ्यांवर आमदार खताळ संतप्त !

तातडीने शो-कॉज नोटीस बजावावी ; टंचाईत हलगर्जीपणा खपवून घेणार नाही.. 

संगमनेर / प्रतिनिधी :

तालुक्यात टंचाईची परिस्थिती गंभीर असताना लोकप्रतिनिधीच्या अध्यक्षतेखाली झालेल्या आढावा बैठकीला काही विभागांचे अधिकारी व कर्मचारी गैरहजर राहिल्याने आमदार अमोल खताळ यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. गैरहजर अधिकारी-कर्मचाऱ्यांना तातडीने कारणे दाखवा नोटीस बजावावी, असे सक्त निर्देश त्यांनी संबंधित विभागप्रमुखांना दिले.

नवीन नगर रोडवरील यशवंतराव चव्हाण प्रशासकीय भवनात गुरुवारी (दि.१७) सकाळी ही बैठक झाली. उपविभागीय अधिकारी प्रवीण उंडे, तहसीलदार धीरज मांजरे, गटविकास अधिकारी प्रवीण सिनारे, महावितरणचे प्रभारी कार्यकारी अभियंता नारायण सोनवणे, उपविभागीय कृषी अधिकारी अक्षय गोसावी, तालुका कृषी अधिकारी रेजा बोडके, पंचायत समिती पशुसंवर्धन अधिकारी प्रदीप खंडेराव यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी-कर्मचारी उपस्थित होते. शिवसेना तालुकाप्रमुख राजेंद्र सोनवणे, भाजप तालुकाप्रमुख गुलाब भोसले, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाप्रमुख कपिल पवार, तालुकाप्रमुख आबासाहेब थोरात व नगरसेविका साक्षी सूर्यवंशी उपस्थित होते.

बैठकीत पाणीपुरवठा, टँकर, चारा, पशुधन आणि विविध विभागांच्या कामकाजाचा आढावा घेण्यात आला. मात्र, काही संबंधित अधिकारी उपस्थित नसल्याचे निदर्शनास आल्यानंतर खताळ यांनी प्रशासनाला खडे बोल सुनावले.

‘टंचाई आढावा बैठक गंमत करण्याचा विषय वाटला का ?’

“तुम्हाला टंचाई आढावा बैठक हा गंमत करण्याचा विषय वाटला का?” असा सवाल करत आमदार खताळ यांनी गैरहजर अधिकाऱ्यांवर नाराजी व्यक्त केली. टंचाईच्या काळात विभागांनी जबाबदारी एकमेकांवर ढकलण्याऐवजी समन्वयाने काम करणे गरजेचे असल्याचे त्यांनी सांगितले.

ज्या गावांमध्ये अथवा वाड्या-वस्त्यांवर पाण्यासाठी टँकरची गरज आहे, तेथे विलंब न करता टँकर सुरू करण्याचे निर्देश त्यांनी दिले. ग्रामसेवक गावात उपलब्ध नसल्याने नागरिकांना पाणीपुरवठ्याच्या मागणीसाठी आमदारांकडे यावे लागत असेल, तर हे स्वीकारले जाणार नाही, असा इशाराही त्यांनी दिला.

कार्यालयात बसून टंचाईचे नियोजन नको

ग्रामसेवक, तलाठी आणि कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी आपल्या कार्यक्षेत्रातील गावांची प्रत्यक्ष पाहणी करून परिस्थितीचा अहवाल प्रशासनाला द्यावा, अशा सूचना करण्यात आल्या.

पाणी, चारा आणि अन्य आवश्यक बाबींची माहिती स्थानिक पातळीवर संकलित करून तातडीने उपाययोजना कराव्यात. केवळ कार्यालयात बसून टंचाईचे नियोजन न करता अधिकारी-कर्मचाऱ्यांनी प्रत्यक्ष गावांमध्ये जाऊन काम करण्याची गरज असल्याचे खताळ यांनी स्पष्ट केले.

पशुसंवर्धन विभागाच्या गैरहजेरीवर तीव्र नाराजी

टंचाईच्या पार्श्वभूमीवर पशुधनाच्या चारा-पाण्याचा प्रश्न महत्त्वाचा असताना पशुसंवर्धन विभागाचा एकही कर्मचारी बैठकीला उपस्थित नसल्याचे समोर आले. यावर खताळ यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली.

दरम्यान, पशुवैद्यकीय डॉक्टरांकडून दूध उत्पादकांकडून पैसे घेतले जात असल्याच्या तक्रारी रवींद्र दातीर, पुंजा डेरे आणि गोरक्ष बागुल यांनी मांडल्या. सावरगाव तळे येथे आजारामुळे तीन गायींचा मृत्यू झाला ; मात्र घटनेनंतर पशुवैद्यकीय डॉक्टर घटनास्थळी आले नसल्याची तक्रार बाळासाहेब शेटे यांनी केली.

या तक्रारींची दखल घेत संबंधित विभागाने तातडीने चौकशी व आवश्यक कार्यवाही करावी, तसेच टंचाईच्या काळात पशुधनासाठी चारा, पाणी आणि पशुवैद्यकीय सेवा उपलब्ध करून द्याव्यात, असे निर्देश खताळ यांनी दिले.

नागरिकांना पाणी आणि पशुपालकांना आवश्यक सुविधा मिळण्यात प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे अडथळा निर्माण होऊ नये, यासाठी सर्व विभागांनी समन्वयाने आणि जबाबदारीने काम करावे, असा स्पष्ट संदेश बैठकीतून देण्यात आला.

RAJA VARAT

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!