अकोलेतील उघड्या गटारांचा धोका ; सार्वजनिक बांधकाम विभागाची कंत्राटदाराला तंबी

संगमनेर टाइम्स न्यूज नेटवर्क –

अकोले शहरातील कोल्हार–घोटी मार्गावरील सेंट्रल बँक, समृद्धी ऑफिस तसेच महालक्ष्मी कॉलनीसमोरील उघडी गटारे आणि सुरक्षेच्या अभावामुळे होणारे अपघात लक्षात घेऊन सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अकोले उपविभागाने संबंधित कंत्राटदाराला तातडीने आवश्यक उपाययोजना करण्याचे निर्देश दिले आहेत.

सार्वजनिक बांधकाम उपविभाग क्र. १, अकोलेचे उपविभागीय अभियंता यांनी दि. २२ सप्टेंबर २०२६ रोजी संबंधित कंत्राटदाराला पत्र देऊन ही बाब गांभीर्याने घेण्यास सांगितले आहे.

पत्रानुसार, NSK-71(A) जिल्हा हद्द राजूर–अकोले–संगमनेर रस्ता या कामांतर्गत संबंधित रस्त्याचे रुंदीकरण व काँक्रीटीकरण करण्यात आले आहे. या रस्त्याच्या कि.मी. ६६/९०० ते ६९/००० या भागात सेंट्रल बँक व समृद्धी ऑफिससमोरील गटार उघडे असून ते धोकादायक बनले आहे. तसेच या ठिकाणी संरक्षक भिंत, सुरक्षा उपाययोजना आणि दिशादर्शक फलकांची आवश्यकता असल्याचे पत्रात नमूद करण्यात आले आहे.

महालक्ष्मी कॉलनीच्या प्रवेशद्वाराजवळील गटारही उघडे असून या ठिकाणी सुरक्षेची कोणतीही पुरेशी व्यवस्था करण्यात आलेली नसल्याचे सार्वजनिक बांधकाम विभागाने निदर्शनास आणून दिले आहे. गटारावर दिशादर्शक फलक तसेच सुरक्षेच्या उपाययोजना करण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत.

मोटारसायकलस्वार व शालेय विद्यार्थ्याला अपघात

पत्रात नमूद केल्यानुसार, २७ जुलै २०२६ रोजी समृद्धी ऑफिससमोर मोटारसायकलचा अपघात होऊन चालक गटारीत पडल्याने जखमी झाला होता. या घटनेबाबत दि. २८, २९ व ३० जुलै रोजी विविध वर्तमानपत्रांत बातम्या प्रसिद्ध झाल्याचेही पत्रात नमूद करण्यात आले आहे.

त्यानंतर २२ सप्टेंबर २०२६ रोजी महालक्ष्मी कॉलनीसमोरील गटारीमध्ये एका शालेय विद्यार्थ्याचा सायकलसह पडून गंभीर दुखापत झाल्याचा प्रकार घडल्याचे पत्रात नमूद आहे.

रस्त्याच्या देखभाल-दुरुस्तीबाबत वारंवार तोंडी व लेखी तक्रारी प्राप्त होत असूनही दिरंगाई होत असल्याने लोकप्रतिनिधी तसेच स्थानिक नागरिकांच्या रोषाला सार्वजनिक बांधकाम विभागाला सामोरे जावे लागत असल्याचेही पत्रात स्पष्ट करण्यात आले आहे.

सात दिवसांत अहवाल सादर करण्याचे निर्देश

सदर बाबींची गांभीर्याने दखल घेत गटारे सुरक्षित करणे, संरक्षक कठडे/भिंत उभारणे, आवश्यक सी.डी. वर्क करणे, दिशादर्शक फलक लावणे आणि इतर सुरक्षात्मक उपाययोजना तातडीने करण्याचे निर्देश कंत्राटदाराला देण्यात आले आहेत.

तसेच केलेल्या कार्यवाहीचा अहवाल सात दिवसांत सार्वजनिक बांधकाम उपविभागीय अभियंत्यांच्या कार्यालयात सादर करण्याचे निर्देश पत्रातून देण्यात आले आहेत.

अकोले शहरातून जाणाऱ्या या महत्त्वाच्या मार्गावर उघडी गटारे आणि अपुऱ्या सुरक्षाव्यवस्थेमुळे अपघातांचा धोका निर्माण झाल्याने सार्वजनिक बांधकाम विभागाच्या या पत्रानंतर प्रत्यक्षात उपाययोजना कधी सुरू होतात, याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे. संगमनेर-अकोले परिसरातील वाहतूक व रस्ते सुरक्षेच्या प्रश्नांबाबत अलीकडेही नागरिकांकडून तक्रारी होत असल्याचे वृत्त प्रसिद्ध झाले आहे. 

RAJA VARAT

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!