दिवाळीची खरेदी स्थानिक व्यापाऱ्यांकडूनच करा – आमदार अमोल खताळ
हिंदुत्ववादी विचारसरणी जपणाऱ्या व्यापाऱ्यांनाही प्राधान्य देण्याचे आवाहन
संगमनेर | प्रतिनिधी
दुष्काळी परिस्थितीमुळे शेतकरी, सर्वसामान्य नागरिक आणि व्यापारी आर्थिक संकटाचा सामना करत आहेत. अशा परिस्थितीत दिवाळीच्या सणानिमित्त नागरिकांनी स्थानिक बाजारपेठेतूनच खरेदी करून व्यापाऱ्यांना आर्थिक बळ द्यावे. विशेषतः हिंदुत्ववादी विचारसरणी जपणाऱ्या व्यापाऱ्यांच्या व्यवसायालाही पाठबळ द्यावे, असे आवाहन संगमनेरचे आमदार अमोल खताळ यांनी केले आहे.

दिवाळीच्या पार्श्वभूमीवर नागरिकांना शुभेच्छा देताना आमदार खताळ यांनी स्थानिक व्यापार आणि अर्थव्यवस्थेला चालना देण्याची गरज अधोरेखित केली.
ते म्हणाले की, दिवाळी हा आनंद, उत्साह आणि समृद्धीचा सण आहे. या काळात कपडे, किराणा, मिठाई, सजावटीच्या वस्तू, विद्युत रोषणाई यांसह विविध वस्तूंच्या खरेदीसाठी बाजारपेठांमध्ये मोठी उलाढाल होते. मात्र, यंदा दुष्काळी परिस्थितीमुळे ग्रामीण अर्थव्यवस्थेवर विपरीत परिणाम झाला आहे. शेतकऱ्यांच्या आर्थिक अडचणींचा परिणाम सर्वसामान्य नागरिकांसह स्थानिक व्यापाऱ्यांवरही होत आहे.

यंदा अपुऱ्या पावसामुळे शेती व्यवसाय अडचणीत सापडला आहे. शेती उत्पादनावर परिणाम झाल्याने ग्रामीण भागातील नागरिकांची क्रयशक्ती कमी झाली आहे. परिणामी, बाजारपेठेतील आर्थिक उलाढालीवरही परिणाम होत आहे. अशा परिस्थितीत दिवाळीसारख्या महत्त्वाच्या सणाच्या काळात स्थानिक व्यापाऱ्यांना ग्राहकांचा आधार मिळणे आवश्यक असल्याचे खताळ यांनी सांगितले.
नागरिकांनी मोठ्या व्यावसायिक आस्थापनांबरोबरच आपल्या परिसरातील छोट्या-मोठ्या दुकानदारांकडूनही खरेदी करावी. स्थानिक बाजारपेठेत खर्च होणारा पैसा परिसरातील अर्थव्यवस्थेला चालना देतो. त्यातून व्यापारी, कामगार आणि अन्य व्यावसायिक घटकांनाही फायदा होतो, असे त्यांनी स्पष्ट केले.

स्थानिक व्यापाऱ्यांना प्राधान्य देण्याबरोबरच हिंदुत्ववादी विचारसरणी जपणाऱ्या व्यापाऱ्यांकडूनही नागरिकांनी खरेदी करावी, असे आवाहन आमदार खताळ यांनी केले. अशा व्यापाऱ्यांना आर्थिक पाठबळ देणे म्हणजे हिंदुत्ववादी विचारांसाठी कार्य करणाऱ्यांनाही एक प्रकारे बळ देण्यासारखे असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले.
दिवाळी हा केवळ रोषणाई, फराळ आणि खरेदीचा सण नाही, तर समाजातील प्रत्येक घटकाला सोबत घेऊन पुढे जाण्याचा सण आहे. सध्याच्या आर्थिक अडचणींच्या काळात स्थानिक व्यापाऱ्यांच्या पाठीशी उभे राहणे ही सामाजिक जबाबदारी असल्याचे खताळ यांनी नमूद केले.

दिवाळीच्या खरेदीत स्थानिक दुकानदारांना प्राधान्य दिल्यास त्यांच्या व्यवसायाला उभारी मिळेल. बाजारपेठेतील आर्थिक उलाढाल वाढेल आणि स्थानिक अर्थव्यवस्थाही मजबूत होईल. त्यामुळे यंदाची दिवाळी स्थानिक व्यापाऱ्यांना आर्थिक बळ देणारी ठरावी, असे आवाहन आमदार अमोल खताळयांनी नागरिकांना केले.




