दिवाळीनंतर डावपेच दाखवू – आमदार खताळ यांचा थोरात – तांबेंना इशारा
संगमनेरमध्ये शिव वाहतूक सेनेचे उद्घाटन
संगमनेर प्रतिनिधी:
“मला राजकारण कळत नाही, असा काहींचा समज असेल तर त्यांनी तो मनातून काढून टाकावा. दिवाळीनंतर राजकारणाचे डावपेच कसे खेळायचे असतात, हे मी दाखवून देईन. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, स्व. अजित पवार आणि पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्यासोबत काम करण्याची संधी मला मिळाली आहे. त्यामुळे मला राजकारण शिकवण्याच्या फंदात कोणीही पडू नये,” असा इशारा आमदार अमोल खताळ यांनी दिला.
माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात आणि आमदार सत्यजित तांबे यांचे नाव न घेता त्यांनी विरोधकांवर जोरदार निशाणा साधला.

संगमनेर शहरातील अकोले नाका परिसरात शिवसेनेच्या ‘शिव वाहतूक सेनेचे’ उद्घाटन आमदार अमोल खताळ यांच्या हस्ते पार पडले. या प्रसंगी आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.
यावेळी व्यासपीठावर शिवसेनेचे शहरप्रमुख विनोद सूर्यवंशी, नगरसेविका साक्षी सूर्यवंशी, विभागप्रमुख बाळासाहेब जगदाळे, आरपीआयचे शहरप्रमुख कैलास कासार, उपजिल्हाप्रमुख सौरभ देशमुख, तालुकाप्रमुख सुशील शेवाळे, शाखाप्रमुख भैया रंगरेज, उपशाखाप्रमुख सागर अभंग, सचिव प्रकाश खंडागळे, कार्याध्यक्ष नितीन पानसरे यांच्यासह शिवसैनिक आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

विरोधकांच्या ‘टक्केवारी’वर प्रहार
आपल्या भाषणात आमदार खताळ पुढे म्हणाले, “संगमनेर नगरपालिका निवडणुकीत यश मिळाले म्हणून विरोधकांनी हुरळून जाऊ नये. तुमचे नगरसेवक टक्केवारी वसूल करण्याचे काम करतात. मात्र आमचे कार्यकर्ते नगरसेवक नसले तरी जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी रस्त्यावर उतरून जनसेवक म्हणून काम करत आहेत. शहरातील सामान्य नागरिक, व्यापारी आणि व्यावसायिकांना धमकावण्याचा प्रयत्न झाल्यास तो खपवून घेतला जाणार नाही.”
तसेच, विरोधकांच्या नातेवाईकांचे खासगी दवाखाने सुरू राहावेत म्हणून नगरपालिकेचे कॉटेज रुग्णालय बंद पाडल्याचा गंभीर आरोप त्यांनी केला. यावर तोडगा म्हणून घुलेवाडी ग्रामीण रुग्णालयात १०० खाटांचे केवळ महिला व लहान मुलांसाठी स्वतंत्र रुग्णालय सुरू करण्यात येणार आहे. लवकरच राज्याचे आरोग्यमंत्री संगमनेरमध्ये येऊन येथील आरोग्य व्यवस्था सक्षम करण्यासाठी पावले उचलतील, अशी माहिती त्यांनी दिली.

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसैनिकांचा स्वाभिमान जिवंत ठेवण्यासाठी धाडसी भूमिका घेतली. महायुती सरकार शेतकरी, कामगार, महिला आणि तरुणांच्या प्रश्नांना प्राधान्य देत आहे. आगामी काळात महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी बचत गटांच्या माध्यमातून उपक्रम राबवून गरजू महिलांना शिलाई यंत्रे दिली जातील. शिव वाहतूक सेनेच्या माध्यमातून रिक्षाचालकांचे प्रश्न सोडवले जातील, असेही त्यांनी स्पष्ट केले.
‘गाव तेथे शाखा, घर तेथे शिवसैनिक!’
संगमनेर शहरासह तालुक्यातील प्रत्येक गावात आणि उपनगरात ‘गाव तेथे शाखा आणि घर तेथे शिवसैनिक’ हा उपक्रम राबवून शिवसेनेचा विस्तार करण्याचा निर्धार आमदार अमोल खताळ यांनी व्यक्त केला. आगामी निवडणुका लोकशाही मार्गाने लढवल्या जातील आणि शिवसेनेचा सामान्य कार्यकर्ता निवडणुकीच्या मैदानात उतरेल. यापुढे संगमनेर तालुक्यात कोणाचीही दादागिरी खपवून घेतली जाणार नाही, असा थेट इशारा त्यांनी दिला.


![]()



