थोरात कारखान्याकडून दिवाळीनिमित्त २२ कोटी ११ लाख रुपये बँकेत वर्ग
ऊस उत्पादकांना प्रतिटन २०० रुपये अनुदान; कामगारांना २० टक्के बोनस आणि ३० दिवसांचे सानुग्रह अनुदान
![]()
संगमनेर प्रतिनिधी :
सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखान्याने दिवाळीनिमित्त ऊस उत्पादक शेतकरी आणि कामगारांसाठी एकूण २२ कोटी ११ लाख रुपये बँकेत वर्ग केले आहेत. यामुळे संगमनेरच्या बाजारपेठेत मोठी आर्थिक उलाढाल होण्यास मदत होणार असून, शेतकरी, कामगार आणि व्यापाऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. कारखान्याचे उपाध्यक्ष पांडुरंग पाटील घुले यांनी ही माहिती दिली.
माजी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली कारखान्याची वाटचाल सुरू असून, सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात यांच्या आदर्श तत्त्वांनुसार सभासद, शेतकरी, ऊस उत्पादक, कामगार आणि सर्वसामान्य नागरिकांचे हित जपले जात असल्याचे घुले यांनी सांगितले.

दिवाळीनिमित्त कार्यक्षेत्रातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांना प्रतिटन २०० रुपये अनुदान देण्यात आले आहे. तसेच कारखान्याच्या कामगारांना २० टक्के बोनस आणि ३० दिवसांचे सानुग्रह अनुदान देण्यात आले आहे.
शेतकरी आणि कामगारांसाठी २२.११ कोटींचे वितरण
दिवाळीनिमित्त शेतकऱ्यांचे अनुदान, शेअर्स व ठेवींवरील व्याज, दिवाळी साखर आणि पेमेंट अशा विविध माध्यमांतून एकूण १२ कोटी ११ लाख रुपये वर्ग करण्यात आले आहेत. तर कामगारांच्या बोनसपोटी १० कोटी रुपये बँकेत जमा करण्यात आले आहेत. अशा प्रकारे एकूण २२ कोटी ११ लाख रुपये वितरित करण्यात आले आहेत.
अमृत उद्योग समूह, कारखाना आणि विविध सहकारी संस्थांच्या माध्यमातून दिवाळीच्या काळात बाजारपेठेत मोठ्या प्रमाणावर पैसा येतो. तालुक्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होणारी रक्कम पुन्हा बाजारपेठेत खर्च होत असल्याने व्यापाराचे चक्र गतिमान होते आणि आर्थिक उलाढालीला चालना मिळते, असे घुले यांनी स्पष्ट केले.
विश्वसनीय बाजारपेठ म्हणून संगमनेरची ओळख
दरवर्षी दिवाळीच्या काळात इतर शहरांच्या तुलनेत संगमनेरमध्ये खरेदीसाठी नागरिकांची मोठी गर्दी होते. विश्वसनीय बाजारपेठ म्हणून संगमनेरची ओळख असून, सहकारी संस्थांच्या माध्यमातून होणाऱ्या आर्थिक वितरणामुळे स्थानिक व्यापाराला बळ मिळते.
कारखान्याबरोबरच इतर सहकारी संस्थाही दिवाळीनिमित्त पगार आणि अन्य देयके बँकेत वर्ग करणार असल्याने तालुक्यातील शेतकरी, नागरिक, युवक आणि व्यापाऱ्यांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे.

