संगमनेरमध्ये कत्तलीसाठी डांबून ठेवलेल्या ५७ गोवंशीय जनावरांची सुटका !
स्थानिक गुन्हे शाखेचे दोन ठिकाणी छापे
संगमनेर | प्रतिनिधी
संगमनेर तालुक्यात गोवंशीय जनावरांच्या अवैध कत्तलीचा संशयास्पद प्रकार पुन्हा एकदा समोर आला आहे. कत्तलीच्या उद्देशाने दोन वेगवेगळ्या ठिकाणी डांबून ठेवलेल्या तब्बल ५७ गोवंशीय जनावरांची स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने सुटका केली आहे. या कारवाईत १९ लाख ६० हजार रुपये किमतीची जनावरे जप्त करण्यात आली असून, याप्रकरणी दोन स्वतंत्र गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. पोलिसांच्या या कारवाईने गोवंशीय जनावरांच्या अवैध व्यापाराचे प्रकरण पुन्हा चर्चेत आले आहे.
२ नोव्हेंबर २०२६ रोजी संगमनेर शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीत दोन वेगवेगळ्या ठिकाणी छापे टाकण्यात आले. या छाप्यांमध्ये कत्तलीच्या उद्देशाने डांबून ठेवल्याचा संशय असलेली ५७ लहान-मोठी गोवंशीय जनावरे आढळून आली. पोलिसांनी सर्व जनावरांची सुटका करून ती जप्त केली.

पहिल्या प्रकरणात १६ लाख रुपये किमतीची ४८ गोवंशीय जनावरे जप्त करण्यात आली. याप्रकरणी सोहेल समीर शेख (वय २७, रा. कुरण, ता. संगमनेर) याच्याविरुद्ध संगमनेर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक १०३७/२०२६ अन्वये महाराष्ट्र पशुसंरक्षण कायद्याच्या कलम ५ (अ), ५ (ब), ९ इत्यादी तरतुदींनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दुसऱ्या ठिकाणी पोलिसांनी ३ लाख ६० हजार रुपये किमतीची ९ गोवंशीय जनावरे जप्त केली. याप्रकरणी वसीम शेख (पूर्ण नाव माहीत नाही) आणि सद्दाम कुरेशी (पूर्ण नाव माहीत नाही), दोघेही रा. कुरण, संगमनेर, यांच्याविरुद्ध गुन्हा रजिस्टर क्रमांक १०३८/२०२६ दाखल करण्यात आला आहे. मात्र, दोन्ही संशयित आरोपी फरार असल्याचे पोलिसांनी नमूद केले आहे.

एकाच दिवशी दोन ठिकाणी छापे टाकून ५७ जनावरांची सुटका करण्यात आल्याने संगमनेर परिसरातील गोवंशीय जनावरांच्या अवैध व्यापाराचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. या जनावरांना नेमके कुठून आणण्यात आले होते, त्यांची विक्री कोणाला होणार होती आणि या व्यवहारामागे आणखी कोणाचे जाळे कार्यरत आहे, याचा तपास होणे महत्त्वाचे ठरणार आहे.
ही कारवाई पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी केली. या पथकात पोलीस उपनिरीक्षक विकास जाधव यांच्यासह गणेश लोंढे, राहुल द्वारके, विजय पवार, राहुल डोके, सतीष भवर, अमृत आढाव, योगेश कर्डीले, रिचर्ड गायकवाड, भगवान थोरात, सुनील मालणकर, बाळासाहेब गुंजाळ आणि जालींदर साखरे यांचा समावेश होता.
आता या प्रकरणाच्या तपासातून गोवंशीय जनावरांच्या अवैध व्यापारामागील संपूर्ण साखळी उघड होणार का, याकडे संगमनेरकरांचे लक्ष लागले आहे.

