संगमनेरमध्ये कत्तलीसाठी डांबून ठेवलेल्या २५ गोवंशीय जनावरांची सुटका !
स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई ; दोघे ताब्यात, तीन जण फरार
संगमनेर टाइम्स न्यूज नेटवर्क –
संगमनेर शहरातील जमजम कॉलनी परिसरातील मोना प्लॉट येथे कत्तलीच्या उद्देशाने डांबून ठेवलेल्या २५ गोवंशीय जनावरांची स्थानिक गुन्हे शाखेने सुटका केली. या कारवाईत पोलिसांनी दोघांना ताब्यात घेतले असून, जनावरांच्या मालकीशी संबंधित तीन जण फरार असल्याची माहिती पोलिसांनी दिली. या कारवाईत पोलिसांनी ५ लाख ३० हजार रुपये किमतीची जनावरे ताब्यात घेतली आहेत.
स्थानिक गुन्हे शाखेचे पथक संगमनेर शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीत अवैध धंद्यांची माहिती घेत असताना, जमजम कॉलनी येथील पाण्याच्या टाकीजवळ मोना प्लॉट येथे गोवंशीय जनावरे कत्तलीसाठी बांधून ठेवल्याची गोपनीय माहिती मिळाली. पथकाने पंचांसमक्ष संबंधित ठिकाणी जाऊन खात्री केली असता तेथे गोवंशीय जनावरे बांधून ठेवल्याचे आढळले.

पोलिसांनी छापा टाकून नदीम रेहमान कुरेशी (वय ३९, रा. मदीनानगर, गल्ली क्रमांक ५, संगमनेर) आणि राजमोहम्मद आरिफ सय्यद (वय ४०, रा. मदीनानगर, गल्ली क्रमांक १, संगमनेर) यांना ताब्यात घेतले. जनावरांच्या मालकीबाबत विचारणा केली असता, ही जनावरे लाला रफीक कुरेशी, जहीर अन्वर कुरेशी आणि शमसू कुरेशी (पूर्ण नाव माहीत नाही) यांच्या मालकीची असल्याचे त्यांनी सांगितल्याचे पोलिसांनी नमूद केले. हे तिघे फरार असल्याची माहिती पोलिसांनी दिली.
या कारवाईत पोलिसांनी गायी, गोऱ्हे आणि कालवडी अशा लहान-मोठ्या एकूण २५ गोवंशीय जनावरांची सुटका करून त्यांना ताब्यात घेतले. या जनावरांची किंमत ५ लाख ३० हजार रुपये असल्याचे पोलिसांनी सांगितले.

याप्रकरणी संगमनेर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक १०१४/२०२६ अन्वये महाराष्ट्र पशुसंरक्षण अधिनियम १९९५ (सुधारित २०१५) मधील कलम ५(अ), ५(ब), ९ तसेच प्राण्यांना निर्दयतेने वागविण्यास प्रतिबंध करणाऱ्या कायद्यातील कलम ३ व ११ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास संगमनेर शहर पोलीस ठाण्याचे पोलीस करीत आहेत.

