दिवाळीत छोट्या व्यावसायिकांना दुकाने लावण्यासाठी जागा द्या !
नगराध्यक्ष डॉ. मैथिली तांबे यांना शिवसेनेचे निवेदन
संगमनेर प्रतिनिधी –
दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर संगमनेर शहरातील फुलविक्रेते, रांगोळी, पणत्या, दिवे, आकाशकंदील व झाडू विक्रेत्यांसह छोट्या व्यावसायिकांना १ ते १२ नोव्हेंबर २०२६ या कालावधीत रस्त्यालगत योग्य ठिकाणी तात्पुरती दुकाने लावण्यास परवानगी द्यावी, अशी मागणी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे तालुकाप्रमुख अमर कन्हैयालाल कतारी यांनी केली आहे. यासंदर्भात नगराध्यक्ष डॉ. मैथिली तांबे यांना निवेदन देण्यात आले.
दिवाळी हा छोट्या व्यावसायिकांसाठी आर्थिकदृष्ट्या महत्त्वाचा सण असून, या काळातील उत्पन्नावर अनेक गरीब व मध्यमवर्गीय कुटुंबांची दिवाळी अवलंबून असते. त्यामुळे वाहतुकीला अडथळा होणार नाही, पादचाऱ्यांना त्रास होणार नाही आणि नागरिकांच्या सुरक्षिततेला धोका निर्माण होणार नाही, अशा योग्य जागा निश्चित करून नगरपरिषदेने या व्यावसायिकांना व्यवसायाची संधी द्यावी, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे.
यावेळी शिवसेनेचे शहरप्रमुख अमित चव्हाण, उपजिल्हाप्रमुख इम्तियाज शेख, विधानसभा शहरप्रमुख बाळासाहेब घोडके, फैसल सय्यद, आसिफ भाई तांबोळी, कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक विजय भाऊ सातपुते यांच्यासह शिवसेनेचे पदाधिकारी व शिवसैनिक उपस्थित होते.

