वनहद्दीत मेंढ्या चारण्यासाठी मेंढपाळांची अडवणूक करू नका

आमदार अमोल खताळ यांच्या वनविभागाला सक्त सूचना

संगमनेर/प्रतिनिधी :

वनविभागाच्या हद्दीत पारंपरिक पद्धतीने मेंढ्या घेऊन जाणाऱ्या मेंढपाळांना शासनाच्या नियमांनुसार चराईसाठी परवानगी देण्यात आली आहे. त्यामुळे वनहद्दीत मेंढ्या चारण्यासाठी जाणाऱ्या मेंढपाळांची अडवणूक करू नये, अशा सक्त सूचना आमदार अमोल खताळ यांनी वनविभागाच्या अधिकाऱ्यांना दिल्या.

ग्रामीण भागातील अनेक कुटुंबांचा पारंपरिक व्यवसाय मेंढीपालनावर अवलंबून आहे. विशेषतः पावसाळ्यानंतर मेंढ्यांना चराईसाठी विविध भागांत घेऊन जाण्याची परंपरा आहे. मात्र, वनहद्दीत मेंढ्या घेऊन जाताना वनविभागाच्या नियमांमुळे राज्यातील मेंढपाळांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत होता.

या पार्श्वभूमीवर संगमनेर तालुक्यातील मेंढपाळांनी आमदार अमोल खताळ यांची भेट घेऊन वनविभागाच्या हद्दीत मेंढ्या चारण्यासाठी परवानगी मिळावी, अशी मागणी निवेदनाद्वारे केली होती. मेंढपाळांच्या या मागणीची दखल घेत आमदार खताळ यांनी वनविभागाच्या अधिकाऱ्यांशी पाठपुरावा केला.

दरम्यान, वनहद्दीत मेंढ्या चारण्यासंदर्भात शासनाने अध्यादेश जारी केला आहे. या अध्यादेशाचे मेंढपाळ समाजाकडून स्वागत करण्यात येत आहे. शासनाच्या नियमांनुसार मेंढपाळांना चराईसाठी आवश्यक ती परवानगी देण्यात यावी. तसेच मेंढपाळांनी स्थानिक वनविभागाच्या अधिकाऱ्यांशी समन्वय ठेवून नियमांचे पालन करावे, अशा सूचना आमदार खताळ यांनी दिल्या.

मेंढपाळ समाजाच्या पारंपरिक व्यवसायाला संरक्षण देऊन त्यांच्या अडचणी दूर करण्याच्या दृष्टीने वनविभागाने सकारात्मक भूमिका घ्यावी, असेही आमदार खताळ यांनी स्पष्ट केले. त्यांच्या पाठपुराव्यामुळे मेंढपाळांच्या चराईचा प्रश्न मार्गी लागण्यास मदत झाली असून, त्यांच्या प्रयत्नांचे तालुक्यातील मेंढपाळ समाजबांधवांकडून स्वागत करण्यात येत आहे.

RAJA VARAT

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!