दुष्काळी परिस्थितीत पशुधनाच्या आरोग्याची काळजी ; ओझर-रहिमपूर परिसरात लाळ्या खुरकूत प्रतिबंधक लसीकरण मोहीम
संगमनेर (प्रतिनिधी) –
दुष्काळी परिस्थितीत पशुधनाचे आरोग्य जपण्याबरोबरच जनावरांचे रोगांपासून संरक्षण करण्यासाठी महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी अंतर्गत सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात कृषी महाविद्यालय, अमृतनगर येथील कृषिदूतांनी पशुसंवर्धन विभागाच्या सहकार्याने ओझर-रहिमपूर परिसरात लाळ्या खुरकूत (FMD) रोग प्रतिबंधक लसीकरण मोहीम राबविली. या मोहिमेद्वारे जनावरांचे लसीकरण करण्यासोबतच पशुपालकांना रोगप्रतिबंधक उपाययोजना आणि चारा व्यवस्थापनाबाबत मार्गदर्शन करण्यात आले.
या मोहिमेसाठी पशुधन विकास अधिकारी डॉ. शैलेश बन व व्रणोपचारक कैलास कांबळे यांचे सहकार्य लाभले. त्यांच्या मार्गदर्शनाखाली परिसरातील जनावरांचे लसीकरण करण्यात आले. यावेळी पशुपालकांना लाळ्या खुरकूत रोगाची लक्षणे, रोगाचा प्रसार, प्रतिबंधात्मक उपाय आणि नियमित लसीकरणाचे महत्त्व समजावून सांगण्यात आले. जनावरांचे आरोग्य टिकविण्यासाठी वेळेवर लसीकरण करणे आणि रोगाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी आवश्यक खबरदारी घेण्याचे आवाहनही करण्यात आले.

सध्या निर्माण झालेल्या दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर पशुधनाच्या आहार व्यवस्थापनावरही विशेष भर देण्यात आला. पशुधन विकास अधिकारी डॉ. शैलेश बन यांनी उपलब्ध चाऱ्याचा योग्य वापर करून कमी दर्जाचा चारा सकस व पौष्टिक कसा बनविता येईल, याबाबत पशुपालकांना सविस्तर मार्गदर्शन केले. चाऱ्यावर योग्य प्रक्रिया करून त्यातील पोषणमूल्ये वाढविण्याचे प्रत्यक्ष प्रात्यक्षिकही त्यांनी दाखविले.
दुष्काळात चाऱ्याची उपलब्धता कमी असताना उपलब्ध चाऱ्याचे योग्य नियोजन करणे, जनावरांना संतुलित व सकस आहार देणे आवश्यक आहे. यामुळे दूध उत्पादन टिकवून ठेवण्यासह पशुधनाचे आरोग्य जपण्यास मदत होते, असे त्यांनी स्पष्ट केले.

या मोहिमेत कृषिदूत अक्षय पालवे, पार्थ पानसरे, श्रेयस राऊत, वैभव सातपुते, ऋतुराज शिंदे, श्रेयश सोंडकर व रुद्राक्ष गाढवे यांनी सक्रिय सहभाग घेतला.
सदर उपक्रम माजी कृषिमंत्री बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली राबविण्यात येत आहे. अमृतवाहिनी शेती व शिक्षण विकास संस्थेच्या सचिव शरयूताई देशमुख आणि संस्थेचे मुख्य प्रशासक निंबाळकर सर यांचे या उपक्रमाला मोलाचे सहकार्य लाभत आहे.
महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. आर. एस. वाघ, प्रशासन अधिकारी प्रा. जी. बी. बाचकर, शैक्षणिक प्रमुख प्रा. रवींद्र दसपुते, कार्यक्रम अधिकारी डॉ. साजन हिंगोणेकर तसेच विषय विशेषज्ञ प्रा. शुभम देशमुख यांचे मार्गदर्शन लाभले.

ग्रामीण भागातील पशुधनाचे आरोग्य संवर्धन करणे, पशुपालकांमध्ये रोगप्रतिबंधक लसीकरणाविषयी जागरूकता निर्माण करणे, दुष्काळी परिस्थितीत चारा व्यवस्थापनाचे महत्त्व पटवून देणे आणि पशुसंवर्धन विभाग व कृषी शिक्षण यांच्यात समन्वय वाढविणे हा या मोहिमेचा मुख्य उद्देश होता. या उपक्रमामुळे परिसरातील पशुपालकांना पशुधनाचे आरोग्य आणि आहार व्यवस्थापनाविषयी महत्त्वपूर्ण माहिती मिळाली.
