संगमनेरकर रसिकांसाठी २६ नोव्हेंबरपासून कवी अनंत फंदी व्याख्यानमालेची पर्वणी ! 

संगमनेर (प्रतिनिधी) – 

संगमनेरच्या सांस्कृतिक आणि वैचारिक परंपरेत मानाचे स्थान असलेल्या कवी अनंत फंदी व्याख्यानमालेचे यंदा ४९ वे वर्ष असून, गुरुवार, दि. २६ नोव्हेंबर ते बुधवार, दि. २ डिसेंबर २०२६ या कालावधीत व्याख्यानमालेचे आयोजन करण्यात आले आहे. दिवाळीनंतर संगमनेरकर रसिक श्रोत्यांना दरवर्षी उत्सुकता असलेल्या या व्याख्यानमालेत यंदाही विविध विषयांवरील नामवंत वक्त्यांची व्याख्याने ऐकण्याची संधी मिळणार आहे.

यंदाच्या व्याख्यानमालेची सुरुवात गुरुवार, २६ नोव्हेंबर रोजी प्रसिद्ध अभिनेते व दिग्दर्शक सुबोध भावे यांच्या व्याख्यानाने होणार आहे. ‘मराठी नाट्य-सिनेसृष्टीचे अंतरंग’ या विषयावर ते संवाद साधणार आहेत. २७ नोव्हेंबर रोजी प्रसिद्ध मनोविकारतज्ज्ञ व लेखक डॉ. नंदकुमार मुळमुळे ‘सुख म्हणजे नक्की काय असते?’ या विषयावर मार्गदर्शन करतील.

२८ नोव्हेंबर रोजी भारतीय सैन्यदलातील अधिकारी मेजर मोहिनी गर्ग-कुलकर्णी ‘भारताच्या रणरागिणी – काल, आज आणि उद्या’ या विषयावर विचार मांडणार आहेत. २९ नोव्हेंबर रोजी लोकप्रिय व्याख्यात्या व निवेदिका दीपाली केळकर ‘अष्टनायिका’ या विषयावर बोलणार आहेत.

३० नोव्हेंबर रोजी पर्यावरणतज्ज्ञ, लेखक व विचारवंत डॉ. गुरुदास तुळपुळे ‘जीवनशैली, निसर्गसहवास आणि तापलेली पृथ्वी’ या विषयावर व्याख्यान देणार आहेत. १ डिसेंबर रोजी पर्यावरणप्रेमी अभय भंडारी ‘बदलती जीवनशैली आणि आपण’ या विषयावर संवाद साधतील. तर २ डिसेंबर रोजी संगीततज्ज्ञ, सोशल वर्कर व वक्ते संतोष बोराडे ‘संगीताच्या सुरांमधून शिकवित जगण्याचे गाणे’ या विषयावर व्याख्यान देणार आहेत.

यंदाच्या व्याख्यानमालेचे वैशिष्ट्य म्हणजे संगमनेर नगरपरिषदेच्या अत्यंत सुसज्ज व देखण्या अशा नाट्यगृहात ही व्याख्यानमाला पार पडणार आहे. या नाट्यगृहामुळे संगमनेरच्या रसिकांना नाट्य आणि संगीताच्या कार्यक्रमांचाही लाभ घेता येणार आहे. व्याख्यानमालेचे प्रायोजक असलेल्या संगमनेर नगरपरिषदेने यासाठी वेगाने काम पूर्ण केले आहे.

याशिवाय शहरातील अनेक संस्थांनी आर्थिक सहकार्य केले असून, वर्षानुवर्षे हे सहकार्य सुरू आहे. संगमनेरकर रसिक श्रोत्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद आणि सर्वांच्या सहकार्यामुळे व्याख्यानमालेचे इतक्या प्रदीर्घ काळापासून सातत्यपूर्ण आयोजन शक्य झाले आहे.

या व्याख्यानमालेच्या यशस्वितेसाठी प्रकल्पप्रमुख डॉ. ओमप्रकाश सिकची, अध्यक्ष राजेंद्र भंडारी, सहप्रकल्पप्रमुख ॲड. ज्योती मालपाणी, प्रकल्प समिती सदस्य सीए नारायण कारंजी, जसपाल डंग, प्रा. ओंकार बिहाणी, उपाध्यक्ष सुनील चांडक, सचिव अरुण ताजणे, खजिनदार पापय्या सिरसुल्ला, सहसचिव सिमता गुणे, कार्यकारी सदस्य प्रदीप मालपाणी यांच्यासह प्रतिष्ठानचे सर्व सदस्य परिश्रम घेत आहेत.

संगमनेर शहर व परिसरातील सर्व रसिक श्रोत्यांनी या व्याख्यानमालेचा लाभ घ्यावा, असे आवाहन कवी अनंत फंदी प्रतिष्ठानच्या वतीने करण्यात आले आहे.

RAJA VARAT

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!