नाट्यरसिकांसाठी आनंदाची तिसरी घंटा !

संगमनेरमध्ये राज्यातील मोठ्या नाट्यगृहांपैकी एकाचे लोकार्पण

संगमनेर टाइम्स | विशेष वृत्त

कला, क्रीडा, साहित्य, सांस्कृतिक आणि वैचारिक चळवळींची समृद्ध परंपरा लाभलेल्या संगमनेरच्या सांस्कृतिक वैभवात आता आणखी एका मानाच्या शिल्पाची भर पडली आहे. संगमनेर नगरपरिषदेच्या वतीने उभारण्यात आलेले तब्बल एक हजार आसनक्षमतेचे अत्याधुनिक ‘कवी अनंत फंदी नाट्यगृह’ रसिकांच्या सेवेत दाखल झाले आहे. तालुकास्तरावरील सर्वात मोठे आणि आधुनिक सुविधांनी सुसज्ज असलेले हे नाट्यगृह संगमनेरच्या सांस्कृतिक क्षेत्राला नवी दिशा देणारे ठरेल, असा विश्वास अखिल भारतीय नाट्य परिषदेचे अध्यक्ष तथा ज्येष्ठ अभिनेते प्रशांत दामले यांनी व्यक्त केला. तर या नाट्यगृहामुळे संगमनेरच्या सांस्कृतिक वैभवात मोलाची भर पडल्याचे प्रतिपादन माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी केले.

कवी अनंत फंदी अद्ययावत नाट्यगृहाचा लोकार्पण सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला. यावेळी माजी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, ज्येष्ठ अभिनेते प्रशांत दामले, आमदार सत्यजित तांबे, माजी आमदार डॉ. सुधीर तांबे, दुर्गाताई तांबे, नगराध्यक्ष डॉ. मैथिली तांबे, डॉ. जयश्री थोरात, उद्योगपती राजेश मालपाणी, उपनगराध्यक्ष नूर मोहम्मद शेख, मुख्याधिकारी डॉ. दयानंद गोरे यांच्यासह विविध क्षेत्रांतील मान्यवर उपस्थित होते.

या लोकार्पण सोहळ्यानिमित्त प्रशांत दामले अभिनीत ‘शिकायला गेलो एक’ या नाटकाचा प्रयोग आयोजित करण्यात आला होता. याच कार्यक्रमात अहिल्यानगर जिल्ह्यासह विविध भागांतील राजकीय, सामाजिक, शैक्षणिक आणि सांस्कृतिक क्षेत्रात योगदान देणाऱ्या महिलांचा सन्मानचिन्ह देऊन गौरव करण्यात आला.

यामध्ये पाथर्डीच्या आमदार मोनिकाताई राजळे, महापौर ज्योतीताई गाडे, धनश्री सुजय विखे पाटील (लोणी), शीतल संग्राम जगताप (नगर), लेखिका शेफाली समीर भुजबळ (नाशिक), प्रियंका अक्षय कर्डिले, राणीताई निलेश लंके (पारनेर), सुनीता शंकरराव गडाख (नेवासा), डॉ. धनिषाताई पानगव्हाणे (नाशिक), गीतांजली शेळके, अनुराधा नागवडे (श्रीगोंदा), संगीता वाघ आदींचा समावेश होता. यावेळी राहुरीचे नगराध्यक्ष भाऊसाहेब मोरे, कोपरगावचे नगराध्यक्ष पराग संधान, नंदुरबारचे मुख्याधिकारी डॉ. राहुल वाघ यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.

प्रशांत दामले म्हणाले की, संगमनेर शहर आणि तालुक्याला मोठी सांस्कृतिक परंपरा लाभली आहे. येथील रसिक प्रेक्षकांनी कायमच नाटकांना उत्तम प्रतिसाद दिला आहे. कवी अनंत फंदी नाट्यगृह अत्याधुनिक सुविधांनी सज्ज असून यापुढील काळात येथे नाटकांसह विविध सांस्कृतिक कार्यक्रमांची मोठी रेलचेल पाहायला मिळेल. एक हजार आसनक्षमता असलेले हे नाट्यगृह राज्यातील मोठ्या नाट्यगृहांपैकी एक असून यामुळे कलाक्षेत्राला निश्चितच नवी दिशा मिळेल.

बाळासाहेब थोरात म्हणाले की, कवी अनंत फंदी यांनी आपल्या फटक्यांच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या सांस्कृतिक वैभवात मोठी भर घातली. संगमनेरमधील अनेक कलाकारांनी साहित्य आणि कला क्षेत्रात मोलाचे योगदान दिले आहे. अनेक दिवसांच्या प्रयत्नांतून आणि पाठपुराव्यातून हे अद्ययावत नाट्यगृह साकार झाले, याचा विशेष अभिमान आहे. हे नाट्यगृह संगमनेरच्या सांस्कृतिक वैभवात भर घालणारे ठरणार आहे. या कामासाठी आमदार सत्यजित तांबे, नगराध्यक्ष आणि नगरपरिषदेच्या संपूर्ण टीमने केलेल्या प्रयत्नांचे त्यांनी अभिनंदन केले.

आमदार सत्यजित तांबे यांनी सांगितले की, कवी अनंत फंदी हे महाराष्ट्राच्या कला आणि साहित्य क्षेत्रातील महत्त्वाचे नाव आहे. तमाशा आणि कीर्तनाच्या माध्यमातून त्यांनी लोकप्रबोधनाचे काम केले. साहित्य क्षेत्राला मोठे योगदान दिले. त्यांच्या नावाने उभारण्यात येणाऱ्या या नाट्यगृहाच्या कामाला सौ. दुर्गाताई तांबे यांच्या कार्यकाळात २०११ मध्ये मंजुरी मिळाली. त्यानंतर सातत्याने पाठपुरावा करून विविध विभागांच्या परवानग्या मिळविण्यात आल्या. अनेक अडचणींवर मात करत आज हे नाट्यगृह रसिकांच्या सेवेत दाखल झाले आहे.

संगमनेरमधील शाहीर विठ्ठल उमप, कांताबाई सातारकर, रघुवीर खेडकर यांच्यासारख्या दिग्गज कलाकारांनी कला क्षेत्रात मोठे योगदान दिले आहे. नाट्यगृहातील कार्पेट, आरामदायी खुर्च्या आणि इतर सुविधा दर्जेदार करण्यात आल्या आहेत. ‘संगमनेर २.०’ मधील एक महत्त्वाचे स्वप्न आज प्रत्यक्षात साकार होत असल्याचे त्यांनी नमूद केले.

यावेळी नगरसेवक किशोर टोकसे, भारत बोराडे, सौरभ कासार, सीमा खटाटे, अर्चना दिघे, शोभा पवार, प्राची काशीद, किशोर पवार, डॉ. अनुराधा सातपुते, वनिता गाडे, अमजद पठाण, विजया गुंजाळ, शकीला बेग, सरोजना पगडाल, शहानवाज खान, शैलेश कलंत्री, नंदा गरुडकर, मुजीब खान पठाण, सोमेश्वर दिवटे यांच्यासह विविध क्षेत्रांतील मान्यवर उपस्थित होते.

कार्यक्रमाचे स्वागत नगराध्यक्ष डॉ. मैथिली तांबे यांनी केले. सूत्रसंचालन स्मिता गुणे व निलेश पर्वत यांनी केले, तर उपनगराध्यक्ष नूर मोहम्मद शेख यांनी आभार मानले. या सोहळ्यास संगमनेरमधील नाट्यप्रेमी, रसिक, महिला आणि युवक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

RAJA VARAT

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!