महावितरणच्या ढिसाळ कारभारावर आमदार अमोल खताळ संतप्त ;
“कामकाज सुधारा, अन्यथा कठोर कारवाईचा इशारा”
संगमनेर / प्रतिनिधी –
महावितरण कंपनीच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या बेफिकीर व हलगर्जीपणामुळे शेतकरी, उद्योजक आणि सर्वसामान्य वीजग्राहकांना नाहक मनस्ताप सहन करावा लागला आहे. यापुढे नागरिकांना कसलाही त्रास होता कामा नये; शेतकरी व ग्राहकांच्या हिताची कामे तातडीने आणि प्राधान्याने मार्गी लावावीत, अशा खणखणीत व स्पष्ट सूचना आमदार अमोल खताळ यांनी महावितरणच्या अधिकाऱ्यांना दिल्या. कामकाजात तत्काळ सुधारणा न झाल्यास संबंधितांवर कठोर कारवाईचा बडगा उगारण्यात येईल, असा थेट इशाराही त्यांनी यावेळी दिला.
संगमनेर शहर आणि तालुक्यातील शेतकरी, उद्योजक तसेच वीजग्राहकांना महावितरणच्या कामकाजामुळे भेडसावणाऱ्या समस्यांवर तोडगा काढण्यासाठी आमदार खताळ यांनी महावितरण कार्यालयात आढावा बैठक घेतली. या बैठकीला कार्यकारी अभियंता, सहाय्यक अभियंता आणि उपअभियंता उपस्थित होते. बैठकीत वीजपुरवठा, नादुरुस्त रोहित्र, वीज उपकेंद्रांची क्षमता, ग्रामीण भागातील धोकादायक वीजवाहिन्या, वीजगळती तसेच मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजनेच्या प्रगतीचा सविस्तर आढावा घेण्यात आला.

बैठकीत बोलताना आमदार खताळ म्हणाले की, महावितरणचे पूर्वी दोन उपविभाग होते; मात्र आता त्यांची संख्या वाढवून तीन करण्यात आली आहे. त्यामुळे वीजविषयक तक्रारींचे निराकरण अधिक वेगवान व प्रभावीपणे होण्यास मदत होईल. वीजपुरवठा व्यवस्था भक्कम करण्यासाठी नवीन उपकेंद्रांची उभारणी, विद्यमान उपकेंद्रांची क्षमता वाढविणे आणि नादुरुस्त रोहित्रांची तातडीने दुरुस्ती करण्यावर विशेष भर देण्यात आला आहे.
तालुक्यातील वीजपुरवठा सुरळीत करण्यासाठी मेंढवण येथील १३२ केव्ही क्षमतेचे नवीन उपकेंद्र लवकरात लवकर कार्यान्वित करण्याचे आदेश अधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत. तसेच पठारभागातील नांदूर खंदरमाळ येथे नवीन वीज उपकेंद्र उभारण्याचा प्रस्ताव सादर करण्यात आला असून, यामुळे या भागातील वीजप्रश्न मार्गी लागण्यास मोठी मदत होणार आहे.

तालुक्यातील काही भागांत कमी दाबाने वीजपुरवठा होण्याची गंभीर समस्या निर्माण झाली होती. त्यावर प्रभावी उपाययोजना करताना ३० अँपिअरची मर्यादा वाढवून ५० अँपिअर करण्यात आली असून, त्यामुळे तालुक्यातील २०८ ठिकाणी पूर्ण दाबाने वीजपुरवठा सुरू आहे. महावितरणच्या विविध अडचणी सोडविण्यासाठी ऊर्जा राज्यमंत्र्यांची भेट घेऊन सातत्याने पाठपुरावा करण्यात आला आहे. तालुक्यात मध्यंतरी वीज रोहित्र जळण्याचे प्रमाण वाढल्याने शेतकरी व वीजग्राहक हैराण झाले होते. जळालेले रोहित्र दुरुस्त करून पुन्हा उपलब्ध होण्यासाठी तीन ते चार दिवस लागत होते; हा कालावधी कमी करून अवघ्या दोन दिवसांत रोहित्र उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
नादुरुस्त रोहित्र दुरुस्तीसाठी बाभळेश्वर येथे पाठवावे लागत असल्याने मोठा विलंब होत होता. हा वेळ वाचविण्यासाठी संगमनेर आणि अकोले या दोन्ही तालुक्यांसाठी संगमनेर येथेच रोहित्र दुरुस्ती केंद्र सुरू करण्यात येणार आहे. आपल्या दीड ते दोन वर्षांच्या कार्यकाळात जवळपास ४५० ते ५०० नवीन रोहित्र उपलब्ध करून देण्यात आले असून, पुढील काळातही आवश्यकतेनुसार रोहित्र उपलब्ध करून देण्यासाठी पाठपुरावा सुरूच राहील, असे आमदार खताळ यांनी स्पष्ट केले.

संगमनेर शहरातील वाढत्या वीज मागणीमुळे निर्माण होणाऱ्या समस्यांवर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी नगरपालिकेकडे जागेची मागणी करण्यात आली होती; मात्र, दुर्दैवाने ही जागा उपलब्ध होऊ शकली नाही. तरीही कोणतेही राजकारण न करता पद्मानगर येथील वीज उपकेंद्राची क्षमता येत्या एक ते दीड महिन्यात वाढविण्यात येणार आहे. तसेच महावितरण कार्यालयाच्या परिसरातील उपलब्ध जागेत पर्यायी उपकेंद्र सुरू करण्याचाही विचार सुरू असून, या उपाययोजनांमुळे शहरातील वीजपुरवठ्यावरील ताण कमी होऊन ग्राहकांना मोठा दिलासा मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली.
ग्रामीण भागात महावितरणचे काही ठेकेदार मनमानी पद्धतीने काम करत असल्याच्या तक्रारी सातत्याने समोर येत आहेत. तसेच काही ठिकाणी लाइनमनने राजकीय पक्षाच्या कार्यकर्त्याप्रमाणे न वागता निष्पक्ष व जबाबदारीने काम करणे गरजेचे आहे. शेतकरी आणि वीजग्राहकांच्या अडचणी समजून घेऊन कामकाजात तातडीने सुधारणा करावी. कामात हलगर्जीपणा किंवा मनमानी आढळल्यास संबंधितांवर कठोर कारवाई करावी, असा सज्जड इशारा देण्यात आला.

संगमनेर, साकूर, धांदरफळ, निमोण आणि तळेगाव या भागांतील वीजगळती कमी करण्यासाठी विशेष मोहीम राबविण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत. साकूर, कोकणगाव, कर्जुले पठार, रहिमपूर, धांदरफळ, आश्वी आणि हिवरगाव या भागांतील वीज उपकेंद्रांची क्षमता वाढविण्यात आली आहे. दरम्यान, महावितरणच्या थकबाकीदार ग्राहकांना दिलासा मिळावा आणि थकबाकीमुक्त होण्याची संधी मिळावी, यासाठी अभय योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन आमदार अमोल खताळ यांनी केले.
“तालुक्याच्या ग्रामीण भागात अनेक ठिकाणी वीजवाहक तारा खाली लोंबकळत आहेत. काही रोहित्रांमधून तेलगळती होत असून, अनेक वर्षांपासूनचे वीजखांब नादुरुस्त अवस्थेत आहेत. अशा धोकादायक बाबींकडे दुर्लक्ष न करता संबंधित वीजवाहिन्या, खांब आणि रोहित्रांची तातडीने दुरुस्ती करावी. ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना महावितरणच्या कामकाजाचा त्रास होऊ नये, याची संपूर्ण जबाबदारी कार्यकारी अभियंता, सहाय्यक अभियंता, उपअभियंता आणि कनिष्ठ अभियंता यांनी घ्यावी.“
अमोल खताळ (आमदार)

