राजकीय विचार बाजूला ठेवून सोनियाजींचा जीवनप्रवास प्रत्येकाने वाचावा !

माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांचे आवाहन

प्रेम, त्याग, संघर्ष आणि संस्कृतीच्या स्वीकाराची प्रेरणादायी कहाणी

संगमनेर | प्रतिनिधी  

काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या आणि खासदार श्रीमती सोनिया गांधी यांनी लिहिलेल्या ‘Belonging: A Journey of Love’ या पुस्तकातून त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचे, भावविश्वाचे आणि जीवनप्रवासाचे अनेक अनोळखी पैलू उलगडत असल्याचे मत माजी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी व्यक्त केले. राजकीय विचारधारा कोणतीही असली, तरी सोनिया गांधी यांच्या व्यक्तिमत्त्वातील प्रेरणादायी बाजू समजून घेण्यासाठी प्रत्येकाने हे पुस्तक आवर्जून वाचावे, असे आवाहनही त्यांनी केले.

या पुस्तकाविषयी आपली भावना व्यक्त करताना थोरात म्हणाले की, पुस्तक हातात घेतल्यानंतर ते खाली ठेवावेसे वाटत नाही, असा वाचनाचा अनुभव आहे. सोनिया गांधी यांचे व्यक्तिमत्त्व त्यांच्या स्वतःच्या शब्दांतून समजून घेण्याची ही एक सुंदर संधी आहे. त्यांनी आपल्या आयुष्यातील विविध प्रसंग अत्यंत प्रामाणिकपणे आणि मनमोकळेपणाने मांडले आहेत. त्यामुळे त्यांच्या व्यक्तिमत्त्वाकडे पाहण्याचा एक वेगळाच दृष्टिकोन वाचकांना मिळतो.

भारतरत्न स्वर्गीय राजीव गांधी यांच्यावरील त्यांचे प्रेम, त्या नात्यातील भावनिक उत्कटता, परस्परांमधील जिव्हाळा आणि आयुष्यातील विविध प्रसंगांत त्यांच्या मनात निर्माण झालेली घालमेल या पुस्तकातून प्रभावीपणे समोर येते. विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात देशाला नवी दिशा देणाऱ्या राजीव गांधी यांच्याशी विवाह झाल्यानंतर भारतात येण्याचा घेतलेला निर्णय हा सोनिया गांधी यांच्या आयुष्यातील अत्यंत महत्त्वाचा टप्पा होता.

गांधी कुटुंबाची सून म्हणून नव्या आयुष्याची सुरुवात करताना त्यांच्यासमोर वेगळे सामाजिक वातावरण, संस्कृती, परंपरा आणि जीवनपद्धतीशी जुळवून घेण्याचे मोठे आव्हान होते. या सर्व परिस्थितीशी सामना करताना त्यांनी केलेला संघर्ष आणि भारतीय संस्कृतीशी एकरूप होण्याचा प्रवास पुस्तकातून उलगडतो. आजवर सोनिया गांधी यांच्या भारतातील जीवनप्रवासाविषयी अनेक गोष्टी ऐकायला मिळाल्या ; मात्र हे अनुभव घेत असताना त्यांच्या मनात नेमके काय विचार सुरू होते, भावनिक पातळीवर त्या कोणत्या परिस्थितीतून गेल्या आणि त्यांनी नव्या वातावरणाशी कसा समन्वय साधला, हे त्यांच्याच शब्दांत वाचणे हा वेगळाच अनुभव असल्याचे थोरात यांनी नमूद केले.

हे पुस्तक केवळ एका राजकीय व्यक्तिमत्त्वाचे आत्मकथन नाही, तर प्रेम, नातेसंबंध, त्याग, संघर्ष, भावनिक संवेदना आणि नव्या संस्कृतीचा स्वीकार अशा विविध जीवनमूल्यांची ओळख करून देणारा प्रेरणादायी प्रवास आहे. त्यामुळे राजकीय विचार कोणतेही असोत, सोनिया गांधी यांच्या व्यक्तिमत्त्वाची ही वेगळी बाजू समजून घेण्यासाठी प्रत्येकाने हे पुस्तक वाचावे, असे आवाहन बाळासाहेब थोरात यांनी केले. पुस्तकाचे संपूर्ण वाचन झाल्यानंतर त्याविषयी सविस्तर लिहिणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

सोनियाजींच्या जीवनप्रवासातून तरुणांना प्रेरणा – डॉ. जयश्री थोरात

दरम्यान, संगमनेर तालुका युवक काँग्रेसच्या अध्यक्षा डॉ. जयश्री थोरात यांनीही या पुस्तकाचे महत्त्व अधोरेखित केले. त्या म्हणाल्या की, सोनिया गांधी यांनी ‘Belonging: A Journey of Love’ या पुस्तकातून आपला जीवनप्रवास अत्यंत प्रामाणिकपणे आणि मनमोकळेपणाने मांडला आहे. आयुष्यातील अनेक प्रसंग, त्या प्रसंगांत मनात निर्माण झालेली भावनिक घालमेल आणि विविध परिस्थितींशी सामना करताना घेतलेले निर्णय यांचे त्यांनी केलेले वर्णन वाचकांना त्यांच्या व्यक्तिमत्त्वाची वेगळी ओळख करून देते.

हे पुस्तक केवळ राजकीय क्षेत्रातील व्यक्तींनाच नव्हे, तर तरुण पिढीला आणि राजकारणात काम करू इच्छिणाऱ्या युवक-युवतींनाही प्रेरणा देणारे ठरेल. जीवनातील संघर्ष, नात्यांमधील भावनिक गुंतवणूक आणि नव्या परिस्थितीचा स्वीकार यांतून अनेक महत्त्वाचे जीवनधडे मिळतात. त्यामुळे तरुणांनी हे पुस्तक आवर्जून वाचावे, असे मत डॉ. जयश्री थोरात यांनी व्यक्त केले.

RAJA VARAT

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed

error: Content is protected !!