सहकाराचा उद्धार की घराणेशाही – सोयऱ्यांचा विस्तार ?
आजी-माजी मंत्र्यांच्या राजकारणाचं घोडं जिल्हा बँकेच्या गंगेत न्हाऊन निघालं !!
विशेष प्रतिनिधी –
अहिल्यानगर जिल्हा सहकारी बँकेचे चेअरमन आणि व्हाईस चेअरमन पद मिळवण्यासाठी जिल्ह्याच्या राजकारणात काही काळापूर्वी मोडलेला संसार पुन्हा चांगलाच जुळून आला आहे. मर्यादित कालावधीसाठी कट्टर विरोधक असलेले जिल्ह्याचे मुरब्बी राजकारणी, माजी मंत्री बाळासाहेब थोरात आणि पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी आपापले घराणेशाही आणि सगे-सोयऱ्यांचे भले करत सहकार व शेतकऱ्यांच्या उद्धाराचा नारा दिला आहे, ज्याची जोरदार चर्चा आता सर्वत्र रंगू लागली आहे.
जिल्हा बँकेच्या अत्यंत महत्त्वाच्या अशा चेअरमन पदी पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचे चिरंजीव, भाजपचे माजी खासदार तथा विद्यमान प्रदेश उपाध्यक्ष डॉ. सुजय विखे पाटील यांची निवड करण्यात आली आहे. तर व्हाईस चेअरमन पदी माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांचे जावई आणि संगमनेर दूध संघाचे चेअरमन रणजीतसिंह देशमुख यांची निवड झाली आहे. या निवडणुकीमुळे “आजी-माजी मंत्र्यांच्या राजकारणाचं घोडं जिल्हा बँकेच्या गंगेत अगदी सुखरूप न्हाऊन निघालं” असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात होत आहे.
एकमेकांचे कट्टर राजकीय शत्रू (?)असलेले थोरात-विखे सहकार आणि शेतकऱ्यांच्या हिताचे कारण पुढे करत जिल्हा बँकेच्या निवडणुकीनिमित्त एकत्र आले. जिल्ह्याच्या राजकारणात त्यांनी पुन्हा एकदा आपला ‘राजकीय संसार’ थाटला आहे. अतिशय गोडव्याने आणि मधुर मिलनाने त्यांनी ही सत्ता संपादन केली असून, संपूर्ण जिल्ह्यातून एकतर्फी यश मिळवले आहे. अर्थात एकत्र येण्यासाठी हे दोन्ही नेते कारण शोधत होते. ते जिल्हा बँक निवडणुकीच्या निमित्ताने मिळाले असल्याचेही बोलले जात आहे.
मात्र, जाणकारांच्या मते, अहिल्यानगर हा सहकाराचा आणि साखर कारखान्यांचा जिल्हा म्हणून ओळखला जातो. या कारखान्यांना भल्या मोठ्या तिजोरीचा आधार असावा आणि ती तिजोरी आपल्याच ताब्यात राहावी, या उद्देशानेच हे एकत्र आले आहेत. आपले वर्चस्व टिकवण्यासाठी त्यांनी सत्तेचे समसमान वाटप केल्याचे स्पष्ट होते. जिल्ह्यातील बऱ्याच कारखान्यांना कोट्यावधी रुपयांचे कर्ज जिल्हा बँकेने दिले आहे. त्यातील थकीत कर्जामुळे काही कारखाने डबघाईला आले आहेत. कर्जाचे व्याज देखील वाढले आहे. या सर्व कर्जबाजारी कारखान्यांना पुन्हा सांभाळून त्याचा समतोल राखण्यासाठी सगळेजण एकत्र आल्याचे देखील सांगितले जाते.
नगर दक्षिणचे विद्यमान खासदार निलेश लंके हे या सत्तेविरोधात एकमेव विरोधक म्हणून उभे ठाकले आहेत. बँकेत सत्ताधाऱ्यांना विरोध करण्यासाठी आपण एकटेच असल्याचे ते सांगत असले, तरी दुसरीकडे ते माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांना मानतात आणि त्यांचे आशीर्वादही घेतात. त्यामुळे भविष्यात खासदार लंके बँकेच्या कारभारात नेमकी काय भूमिका बजावणार, हे महत्त्वाचे ठरणार आहे आणि त्यातूनच त्यांची विश्वासार्हता समोर येणार आहे.
थोरतांची (काँग्रेस) आणि विखेंची (भाजप) ही सहकार युती केवळ जिल्हा बँकेपुरती मर्यादित राहणार नाही, तर याचा आगामी सर्वच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांवर मोठा परिणाम होणार असल्याचे देखील बोलले जाते. पुढे होणाऱ्या जिल्हा परिषद, पंचायत समिती तसेच विधानसभा आणि लोकसभा निवडणुकांमध्ये हे दोन्ही नेते काय राजकीय समीकरणे जुळवणार, याबाबत राजकीय वर्तुळात निरनिराळे अंदाज वर्तवले जात आहेत. त्यामुळे गेल्या अनेक वर्षात या जिल्ह्याच्या राजकारणात जनतेला “टीव्ही” पाहण्यास मिळत होता. आता पुन्हा “टीव्हीचे शो” जनतेला दिसणार आहेत. “विना सहकार, नाही उद्धार ! उद्धार नेमका कुणाचा ?.. याचा शोध जनता घेत आहे.




