थोरात कारखान्याने जाहीर केली ३२०० रुपयांची पहिली उचल ! ऊस उत्पादकांना मोठा दिलासा

संगमनेर (प्रतिनिधी) : 

सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखान्याने सन २०२६-२७ च्या गळीत हंगामासाठी ऊस उत्पादक शेतकऱ्यांना प्रतिटन ३२०० रुपये पहिली उचल जाहीर केली आहे. माजी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली कारखान्याने हा निर्णय घेतला असल्याची माहिती कारखान्याचे व्हाईस चेअरमन पांडुरंग पाटील घुले यांनी दिली.

याबाबत माहिती देताना घुले म्हणाले की, लोकनेते बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखाली सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखान्याने कायमच सभासद, शेतकरी आणि ऊस उत्पादकांच्या हिताला प्राधान्य दिले आहे. शिस्त, काटकसर, दूरदृष्टी आणि पारदर्शक कारभाराच्या जोरावर कारखान्याने कार्यक्षेत्रातील तसेच कार्यक्षेत्राबाहेरील ऊस उत्पादकांचा विश्वास संपादन केला आहे.

यंदा दुष्काळी परिस्थिती असतानाही कारखान्याने ऊस उत्पादकांना दिवाळीमध्ये प्रतिटन २०० रुपये अनुदान दिले. तसेच कामगारांना २० टक्के बोनस आणि ३० दिवसांचे सानुग्रह अनुदान जाहीर केले. दिवाळीच्या पार्श्वभूमीवर सुमारे २२ कोटी ११ लाख रुपये शेतकऱ्यांच्या बँक खात्यांवर वर्ग करण्यात आले. त्यामुळे संगमनेरच्या बाजारपेठेतही मोठी आर्थिक उलाढाल झाली.

यंदा अलनिनोच्या प्रभावामुळे पावसाचे प्रमाण कमी राहिले असून, प्रतिकूल हवामानाचा परिणाम शेती आणि ऊस उत्पादनावर होत आहे. अशा आव्हानात्मक परिस्थितीत ऊस उत्पादक शेतकऱ्यांना आर्थिक आधार मिळावा, या उद्देशाने कारखान्याने सन २०२६-२७ च्या गळीत हंगामासाठी प्रतिटन ३२०० रुपये पहिली उचल देण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे ऊस उत्पादक शेतकऱ्यांना आर्थिक दिलासा मिळणार आहे.

RAJA VARAT

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!