केंद्र सरकारने इथेनॉलला रास्त भाव ठरवून द्यावा — माजी मंत्री बाळासाहेब थोरात
थोरात कारखान्यातून 1 कोटी 40 लाख लिटर इथेनॉल निर्मिती
संगमनेर प्रतिनिधी —
थोरात सह. साखर कारखान्यातून दारू न बनवता इंडस्ट्रियल अल्कोहोल निर्माण केले जात आहे. इथेनॉलचे महत्त्व जगाला कळाले असून सध्या युद्धामुळे जागतिक पातळीवर इंधनाचा मोठा तुटवडा निर्माण झाला आहे. वाढत्या इंधन समस्येला इथेनॉल हा मोठा पर्याय असल्याचे प्रतिपादन माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी केले आहे. थोरात कारखान्यातून 1 कोटी 40 लाख लिटर इथेनॉल निर्मिती करण्यात आली आहे. मात्र केंद्राने इथेनॉलला रास्त भाव ठरवून द्यावा.

सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखान्याच्या इथेनॉल निर्मिती प्रकल्पातून चालू हंगामातून 1 कोटी 40 लाख लिटर इथेनॉल निर्मिती झाल्याच्या प्रसंगी आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी माजी नगराध्यक्ष दुर्गाताई तांबे, व्हा चेअरमन पांडुरंग घुले ,युवक काँग्रेसच्या अध्यक्ष डॉक्टर जयश्री थोरात, संचालक संपत गोडगे, सतीश वर्पे, विलास शिंदे, रामनाथ कुटे, विजय राहणे, गुलाबराव देशमुख, अरुण वाकचौरे, अंकुश ताजणे, मदन आंबरे, लता गायकर, सुंदराबाई डुबे, हौशीराम सोनवणे, कार्यकारी संचालक जगन्नाथ घुगरकर, सेक्रेटरी किरण कानवडे, कृष्णा दिघे, भारत देशमुख, अशोक मुटकुळे, नवनाथ गडाख, संजय पाटील आदींसह सर्व विभाग प्रमुख उपस्थित होते.

थोरात म्हणाले की, राज्यभरात अनेक सहकारी कारखान्यांमधून दारू ची निर्मिती केली जाते. मात्र सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात यांच्या आदर्श शिस्तीत आणि विचारांवर या कारखान्याचे कामकाज सुरू असून थोरात सहकारी साखर कारखान्यात दारू न बनवता इंडस्ट्रियल अल्कोहोल निर्माण केले जाते. तरीही कारखान्याची वाटचाल चांगली असून कायम उच्चांकी भाव दिला आहे.
वीज निर्मिती आणि इथेनॉल प्रकल्प हे कारखान्याला मोठी मदत करत आहेत. युद्धामुळे जागतिक पातळीवरच इंधनाचा मोठा तुटवडा निर्माण झाला आहे. आता इथेनॉल चे महत्व जगाला कळाले आहे. आपल्या देशामध्येही पेट्रोल डिझेलसह इंधनाचा तुटवडा भासत आहे. याला इथेनॉल हा महत्त्वाचा पर्याय आहे. इथेनॉल निर्मिती करणाऱ्या सहकारी साखर कारखान्यांसाठी केंद्रसरकारने रास्त भाव ठरवून दिला पाहिजे अशी मागणी करताना सांघिक यशातून कारखान्याची यशस्वी वाटचाल सुरू असल्याचे ते म्हणाले.
प्रास्ताविक कार्यकारी संचालक जगन्नाथ घुगरकर यांनी केले. तर व्हा. चेअरमन पांडुरंग घुले यांनी आभार मानले.
