जागतिक साहित्याच्या पटलावर मनीषा खटाटे यांचे ‘मरुस्थल’ खंडकाव्य चर्चेत
तत्त्वज्ञानात्मक लेखनशैलीमुळे साहित्यकृतीला वेगळे स्थान ; विविध देशांतील भाषांमध्ये अनुवाद, आंतरराष्ट्रीय स्तरावर दखल

जागतिक साहित्याच्या पटलावर भारतीय साहित्याची वेगळी ओळख निर्माण करणारे मनीषा खटाटे यांचे ‘मरुस्थल’ हे खंडकाव्य सध्या साहित्यविश्वात चर्चेचा विषय ठरत आहे. तत्त्वज्ञानात्मक लेखनशैली, आत्मज्ञानाचा शोध आणि अंतर्मनातील चेतनेची अभिव्यक्ती ही या खंडकाव्याची प्रमुख वैशिष्ट्ये आहेत. पारंपरिक खंडकाव्य लेखनशैलीपेक्षा वेगळ्या मांडणीमुळे ‘मरुस्थल’ या साहित्यकृतीने स्वतंत्र ओळख निर्माण केली आहे.
हिंदीचे शेक्सपिअर म्हणून ओळखले जाणारे रांगेय राघव यांनी ‘मेधावी’ हे खंडकाव्य याच तत्त्वज्ञानात्मक शैलीत लिहिले होते. त्यानंतर जवळपास शंभर वर्षांनी मनीषा खटाटे यांनी याच शैलीत ‘मरुस्थल’ची निर्मिती केली आहे. हिंदी साहित्यात तत्त्वज्ञानात्मक संदर्भांत अशा प्रकारचे खंडकाव्य निर्माण करण्याचा हा एक महत्त्वपूर्ण प्रयत्न असल्याचे खटाटे यांनी नमूद केले.

या खंडकाव्याच्या प्रस्तावनेसाठी पद्मश्री विष्णू पंड्या, महाकवी देवेंद्र देव आणि भारतीय तत्त्वज्ञान व अध्यात्माचे अभ्यासक अजय शुक्ला यांनी आपले विचार मांडले आहेत. विशेष म्हणजे, पुस्तक प्रकाशित होण्यापूर्वीच त्यातील काही अंश इंग्रजी, चिनी, तुर्की आणि नेपाळी भाषांमध्ये अनुवादित झाले होते. अमेरिका, चीन, तैवान, तुर्की आणि नेपाळमध्येही या साहित्यकृतीला वाचकांचा प्रतिसाद मिळाल्याचे खटाटे यांनी सांगितले.
या खंडकाव्यातील एका गीताला हॉलिवूडमधील संगीतकार व गायक लारी यांनी इंग्रजी स्वरूपात स्वरबद्ध केले आहे. तसेच २०२३ मध्ये नेपाळमध्ये ‘मरुस्थल’च्या मुखपृष्ठाचे अनावरण आणि समीक्षात्मक कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमात नेपाळमधील ज्येष्ठ साहित्यिक सनत रेग्मी, नेपाळी भाषा परिषदेचे अध्यक्ष डॉ. अमर गिरी, कथाकार व अनुवादक गोपाल अश्क आणि भेरी साहित्य समाजाचे माजी अध्यक्ष हरि तिमिल्सिना यांनी खंडकाव्याचे समीक्षण केले.

या साहित्यकृतीच्या निमित्ताने नेपाळमधील रेडिओ कृष्णासार, रेडिओ कोहलपूर आणि नेपाळ झी टीव्हीवर विशेष मुलाखती प्रसारित झाल्या. तसेच युक्रेन विद्यापीठाच्या भाषा विभागाचे प्रमुख युरी बोत्विंकिन, माउंट अबू येथील रेडिओ मधुबन आणि नाशिक येथील रेडिओ विश्वास यांनीही ‘मरुस्थल’च्या प्रकाशनाला एक वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त विशेष मुलाखती घेतल्या होत्या.
‘मरुस्थल’ या साहित्यकृतीसाठी मनीषा खटाटे यांना सर रतन टाटा लिटरेरी अवॉर्ड आणि महात्मा जोतिबा फुले जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.

दरम्यान, या खंडकाव्याच्या प्रकाशनाला दोन वर्षे पूर्ण झाली आहेत. दोन वर्षांनंतरही वाचकांकडून या साहित्यकृतीचा शोध घेतला जात असून, अंतर्मनातील आत्मरूपांतरणाची प्रक्रिया जागृत करून जीवनप्रवासात आत्मबोधाची प्रेरणा देण्याचे कार्य ‘मरुस्थल’ करत असल्याची भावना मनीषा खटाटे यांनी व्यक्त केली आहे.





