पंडित नेहरूंनी आधुनिक भारताची पायाभरणी केली : माजी मंत्री बाळासाहेब थोरात

‘जवाहरलाल हाजीर हो’ पुस्तकाचे प्रकाशन

संगमनेर (प्रतिनिधी) : 

महात्मा गांधी यांच्या नेतृत्वाखाली पंडित जवाहरलाल नेहरू यांच्यासह राष्ट्रपुरुषांनी स्वातंत्र्याच्या लढ्यात मोठे योगदान दिले. नेहरू यांनी ३२५९ दिवस तुरुंगवास भोगत देशसेवा केली. आधुनिकता, विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या माध्यमातून त्यांनी आधुनिक भारताची पायाभरणी केली, असे प्रतिपादन बाळासाहेब थोरात यांनी केले.

जयहिंद लोकचळवळ आणि प्रॉमिथीयस प्रकाशन यांच्या संयुक्त विद्यमाने सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात महाविद्यालयातील के. बी. दादा सभागृहात ‘जवाहरलाल हाजीर हो’ या पुस्तकाचे प्रकाशन झाले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ साहित्यिक प्रा. रंगनाथ पठारे होते.

थोरात म्हणाले, महात्मा गांधी आणि लालबहादूर शास्त्री यांच्या जयंतीनिमित्त गांधी-नेहरू विचारांची चर्चा होणे ही आनंदाची बाब आहे. गांधीजींच्या नेतृत्वाखाली नेहरू स्वातंत्र्य चळवळीत सहभागी झाले. दीर्घकाळ तुरुंगवास भोगताना त्यांनी अहिल्यानगरच्या भुईकोट किल्ल्यात ‘डिस्कव्हरी ऑफ इंडिया’ हा अनमोल ग्रंथ लिहिला. गांधीजींच्या विचारातून घडलेल्या नेहरूंनी आधुनिकता आणि तंत्रज्ञानाचा स्वीकार करून देशाच्या विकासाला दिशा दिली.

देशाकडे समाजसुधारक, देशभक्त, राष्ट्रपुरुष आणि संत-महात्म्यांच्या विचारांचे मोठे भांडवल आहे. मात्र हे विचार नव्या पिढीपर्यंत प्रभावीपणे पोहोचविण्याची गरज आहे. ऑडिओ, व्हिडिओ आणि रिल्सच्या माध्यमातून झेन झी पिढीपर्यंत हे विचार पोहोचवावेत, असे आवाहन त्यांनी केले.

संजय आवटे यांनी गांधी, नेहरू आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे भारताला लाभलेले अनमोल विचारधन असल्याचे सांगितले. नेहरू हे आधुनिक दृष्टिकोन असलेले नेते होते. नव्या भारताची उभारणी करण्यासाठी त्यांनी महत्त्वपूर्ण योगदान दिले. आजही नेहरूंच्या नावाभोवती राजकीय चर्चा होत असल्याने त्यांच्या विचारांचा आणि कार्याचा अभ्यास करून तो पुढील पिढीपर्यंत पोहोचविण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले.

प्रा. रंगनाथ पठारे यांनी नेहरूंच्या कार्याचे मूल्यमापन करताना तत्कालीन सामाजिक, राजकीय आणि आंतरराष्ट्रीय परिस्थितीचा विचार करणे आवश्यक असल्याचे सांगितले. फाळणी, काश्मीर यांसह विविध प्रश्नांवरील निर्णय त्या काळाच्या परिस्थितीच्या संदर्भात समजून घेतले पाहिजेत.

परंपरेचे भान ठेवून आधुनिकतेचा विचार पुढे नेणाऱ्या नेहरूंच्या काळात संगीत नाटक अकादमी, अणुशक्ती क्षेत्र, आयआयटी आणि विविध धरणांसह अनेक संस्थांच्या उभारणीला चालना मिळाली, असे त्यांनी नमूद केले.

डॉ. सुधीर तांबे यांनी गांधी आणि नेहरू यांच्या विचारांनी देशाच्या वाटचालीला दिशा दिल्याचे सांगितले. विज्ञान, तंत्रज्ञान आणि आधुनिक शिक्षणाला महत्त्व देणारे नेहरू हे विज्ञानवादी नेतृत्व होते. आधुनिक भारताच्या उभारणीत त्यांचे योगदान महत्त्वाचे असल्याचे त्यांनी नमूद केले.

यावेळी प्रकाशक प्रमिला माया नारायण, अनुवादक डॉ. राहुल कोसंबी यांनीही मनोगत व्यक्त केले.

कार्यक्रमास दुर्गाताई तांबे, नगराध्यक्ष डॉ. मैथिली तांबे, श्रीरंजन आवटे, प्राचार्य डॉ. बाळासाहेब वाघ, संदीप वाकचौरे, राजाभाऊ आवसक, डॉ. नामदेव गुंजाळ यांच्यासह साहित्य, शिक्षण व सामाजिक क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.

RAJA VARAT

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!