इंग्रजी शाळा काढणे हा निव्वळ धंदा ; साहित्य संमेलनात फक्त भुईनळे, साहित्य गायब – ज्येष्ठ साहित्यिक प्राध्यापक रंगनाथ पठारे
संगमनेर टाइम्स न्यूज नेटवर्क –
“पहिलीपासून इंग्रजीची सक्ती करणे हे शिक्षणाच्या चिंध्या उडवणारे आणि घातक आहे. इंग्रजी शाळा काढणे हा केवळ एक धंदा बनला असून मराठी माणसाची उघड्या डोळ्यांनी लूट सुरू आहे,” अशा कडक शब्दांत ख्यातनाम लेखक प्रा. रंगनाथ पठारे यांनी शिक्षणव्यवस्थेवर चाबूक चालवला. प्रा. डॉ. हरी नरके स्मृती प्रतिष्ठानतर्फे आयोजित व्याख्यानात बोलताना त्यांनी इंग्रजी सक्तीसोबतच साहित्य संमेलनांच्या ढासळत्या दर्जावर जोरदार हल्लाबोल केला.
दरवर्षी कोट्यवधी रुपये खर्चून आयोजित होणाऱ्या साहित्य संमेलनांच्या पुरत्या फोलपणावर बोट ठेवताना प्रा. पठारे म्हणाले, “दरवर्षी थाटामाटात साहित्य संमेलने भरवली जातात; पण त्यात मूळ ‘साहित्य’ कुठे असते? तिथे साहित्यावर चर्चा होण्याऐवजी निव्वळ भुईनळे उडवले जातात आणि आतषबाजी केली जाते.”

“साहित्य संमेलनाच्या अध्यक्षाला एखाद्या कोपऱ्यात नामधारी बसवले जाते. राजकीय नेते मंचावर आले की अध्यक्षाला आणखी मागे ढकलले जाते. नेत्याचे भाषण संपून तो निघून गेला, की श्रोतेही उठून निघून जातात.
“मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला तरी केवळ एका प्रमाणपत्राने काही फरक पडणार नाही. केंद्र सरकारने संस्कृतसाठी भरघोस निधी दिला, परंतु इतर भाषांच्या वाट्याला तो आला नाही. अभिजात दर्जा मिळाल्याने कोट्यवधी रुपये लगेच मिळतील असे नाही. मराठीला खऱ्या अर्थाने ‘ज्ञानभाषा’ बनवण्यासाठी आणि तिच्या समृद्धीसाठी प्रामाणिक प्रयत्नांची गरज आहे.”

“इंग्रजी शिकवणाऱ्या शिक्षकांनाच स्वतःला इंग्रजी येत नाही. अशा शाळांमुळे कागदावर सुशिक्षित, पण प्रत्यक्षात अज्ञानी असणारी पिढी निर्माण होत आहे. या इंग्रजी भूतामुळे आपल्या समृद्ध मराठी शाळा बंद पडत आहेत आणि लोक या नादाला बळी पडत आहेत.”
दिल्लीतील विद्यार्थ्यांच्या आंदोलनाचा संदर्भ देत त्यांनी इशारा दिला की, “हे आंदोलन केवळ एक उदाहरण आहे. संपूर्ण देशात असंतोषाचा ज्वालामुखी खदखदत असून तो कधीही उफाळून येऊ शकतो.”
याच कार्यक्रमात प्रा. डॉ. हरी नरके लिखित ‘पुस्तकप्रेमी असूनही बाबासाहेबांनी मनुस्मृती का जाळली’ या पुस्तकाच्या दुसऱ्या आवृत्तीचे प्रकाशन करण्यात आले. कार्यक्रमाला राजन गवस व संगीता नरके यांची प्रमुख उपस्थिती होती, तर सूत्रसंचालन मृणाल ढोरे पाटील यांनी केले.
