शेतकऱ्यांच्या बांधावरच योजनांचा लाभ द्या – कृषिमंत्री
संगमनेर तालुक्यात नुकसानग्रस्त सोयाबीनची पाहणी
शेतकऱ्यांना सर्वतोपरी मदतीची ग्वाही ; पीक विम्याच्या अडचणी तातडीने सोडविण्याचे निर्देश
संगमनेर टाइम्स न्यूज नेटवर्क –
दुष्काळसदृश परिस्थितीमुळे नुकसान झालेल्या पिकांची पाहणी करण्यासाठी कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांनी गुरुवारी संगमनेर तालुक्यातील पिंपळे गावाला भेट देत शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन परिस्थितीची पाहणी केली. यावेळी नुकसानग्रस्त सोयाबीन पिकाची पाहणी करून शेतकऱ्यांना शासनाकडून सर्वतोपरी मदत करण्याची ग्वाही त्यांनी दिली.
शेतकऱ्यांना उभे करण्यासाठी शासनाच्या विविध योजनांचा लाभ, पीक विमा तसेच कर्जमुक्ती योजनांचा लाभ प्राधान्याने मिळवून देण्यात येईल. शासन शेतकऱ्यांच्या खंबीरपणे पाठीशी असल्याचे कृषिमंत्री भरणे यांनी स्पष्ट केले.
पिंपळे येथील शेतकरी सोपान चकोर यांच्या शेताच्या बांधावर जाऊन कृषिमंत्र्यांनी सोयाबीन पिकाची पाहणी केली. पावसाच्या खंडामुळे सोयाबीन पिकाचे मोठे नुकसान झाल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. परिस्थिती पाहून त्यांनी शेतकरी बांधवांशी संवाद साधत त्यांना धीर दिला.

यावेळी संगमनेरचे आमदार अमोल खताळ, राज्याचे कृषी आयुक्त सूरज मांढरे, जिल्हाधिकारी पंकज आशिया, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आनंद भंडारी, कृषी संचालक विनयकुमार आवटे, विभागीय कृषी सहसंचालक बाबासाहेब जेजूरकर, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी सुधाकर बोराळे, संगमनेरचे तहसीलदार धीरज मांजरे, तालुका कृषी अधिकारी श्रीमती बोडखे यांच्यासह महावितरण, ग्रामविकास व महसूल विभागाचे अधिकारी तसेच पिंपळे गावातील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
पीक विम्याच्या अडचणी तातडीने सोडविण्याचे निर्देश
पिंपळे गावातील काही शेतकऱ्यांना पीक विमा मिळविताना येत असलेल्या अडचणींची कृषिमंत्र्यांनी तातडीने दखल घेतली. कृषी व महसूल विभागाने चालू खरीप हंगामात या प्रकरणी तातडीने कार्यवाही करावी, असे स्पष्ट निर्देश त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले.
शेतकऱ्यांच्या बांधावरच योजनांचा लाभ द्या
दुष्काळसदृश परिस्थितीमुळे शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावला जात असल्याची परिस्थिती आहे. अशा कठीण प्रसंगी शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणे हे प्रशासनाचे कर्तव्य आहे. त्यामुळे प्रशासनाने शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन त्यांना शासनाच्या विविध योजनांचा लाभ मिळवून द्यावा, असे निर्देश कृषिमंत्र्यांनी जिल्हा प्रशासनाला दिले.
शेतकरी हिताला सर्वोच्च प्राधान्य देत शेती, पशुपालन, चारा आणि पाणीटंचाईच्या प्रश्नांवर तातडीने उपाययोजना करण्याच्या सूचनाही त्यांनी केल्या.

केंद्र शासनाच्या आपत्ती व्यवस्थापन विभाग आणि राज्य शासनाच्या मदत व पुनर्वसन विभागांतर्गत नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत करण्यासाठीची परिपूर्ण अधिसूचना शासन स्तरावरून लवकरच निर्गमित केली जाणार आहे. या अधिसूचनेत सर्वसमावेशक मदतीचा समावेश असेल, असे कृषिमंत्र्यांनी सांगितले.
‘मी स्वतः शेतकरी; शेतकऱ्यांच्या वेदना जाणतो’
सोयाबीन पिकाची पाहणी करताना पावसाअभावी पिकाचे मोठे नुकसान झाल्याचे स्पष्ट झाल्यानंतर कृषिमंत्री भरणे यांनी शेतकऱ्यांना धीर दिला. ‘मी स्वतः शेतकरी असल्याने शेतकऱ्यांच्या वेदना आणि अडचणी मला माहिती आहेत. या संकटात शासन शेतकऱ्यांच्या दुःखात सहभागी असून त्यांना आवश्यक ती सर्व मदत मिळवून देण्यासाठी खंबीरपणे उभे राहील,’ अशी ग्वाही त्यांनी दिली.
दरम्यान, वीजपुरवठा वेळेत न झाल्यामुळे शेतकऱ्यांना पाणीपुरवठ्यात अडचणी येऊ नयेत यासाठी महावितरणने आवश्यक डीपी व ट्रान्सफॉर्मर वेळेत उपलब्ध करून द्यावेत, असे निर्देशही कृषिमंत्र्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले.

जिल्ह्यात सोयाबीनची ११३ टक्के पेरणी
अहिल्यानगर जिल्ह्यात पावसाच्या खंडामुळे खरीप पिकांवर परिणाम झाला आहे. जिल्ह्यात मुगाची ४७.८३ टक्के, उडदाची ६१.४५ टक्के, कपाशीची ९१.६६ टक्के, सोयाबीनची ११३.०३ टक्के, मक्याची १६३.३४ टक्के, तुरीची १३४.३२ टक्के आणि खरीप बाजरीची ६३.८३ टक्के पेरणी झाली आहे.
कपाशीची पिके सध्या पाती, फुलोरा व बोंडे धरण्याच्या अवस्थेत आहेत. मात्र पावसाअभावी वाढ खुंटली असून पाती व फुलांची गळ होत आहे. काही भागांत रसशोषक किडीचा तसेच गुलाबी बोंडअळीचा प्रादुर्भाव दिसून येत आहे.
सोयाबीन पीक शेंगा भरण्याच्या संवेदनशील अवस्थेत असून पाण्याच्या ताणामुळे शेंगा चपटी राहणे, दाणे बारीक होणे तसेच हलक्या जमिनीवरील पीक सुकण्याची शक्यता आहे. मक्याचे पीक कणसे भरण्याच्या अवस्थेत असून अपुऱ्या पावसामुळे वाढ खुंटून उत्पादनात मोठी घट होण्याची शक्यता आहे. तुरीच्या वाढीवरही पाण्याच्या ताणाचा परिणाम झाला आहे. खरीप बाजरीची वाढ खुंटून अनेक ठिकाणी पीक सुकल्याचे चित्र आहे.
जिल्ह्यातील पेरणीची स्थिती आणि विविध पिकांवरील पावसाच्या खंडाचा परिणाम याबाबतचा सविस्तर आढावा जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी सुधाकर बोराळे यांनी कृषिमंत्र्यांसमोर सादर केला.
