संगमनेर दुष्काळग्रस्त घोषित ; 

पिकांचे सरसकट पंचनामे करा – आमदार अमोल खताळ

संगमनेर / प्रतिनिधी : 

पावसाने ओढ दिल्याने खरीप हंगाम संकटात सापडलेल्या संगमनेर तालुक्याचा दुष्काळग्रस्त तालुक्यांमध्ये समावेश करण्यात आला आहे. राज्य शासनाने जाहीर केलेल्या २६५ दुष्काळग्रस्त तालुक्यांमध्ये संगमनेरचा समावेश झाल्याने तालुक्यातील शेतकऱ्यांना आता दुष्काळी सवलतींचा लाभ मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, कृषिमंत्री दत्तात्रय भरणे आणि पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्याकडे केलेल्या पाठपुराव्याला यश आल्याचा दावा आमदार अमोल खताळ यांनी केला.

आमदार खताळ म्हणाले की, यंदा संगमनेर तालुक्यात पावसात मोठा खंड पडल्याने खरीप पिकांची अवस्था गंभीर झाली आहे. अनेक भागांत पावसाअभावी पिके वाळून गेली असून शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. ही परिस्थिती मुख्यमंत्री फडणवीस यांच्या निदर्शनास आणून देत संगमनेर तालुका तातडीने दुष्काळग्रस्त जाहीर करावा आणि शेतकऱ्यांना आर्थिक मदत द्यावी, अशी मागणी केली होती.

कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या संगमनेर दौऱ्यादरम्यान पिंपळे येथे नुकसानग्रस्त सोयाबीन पिकांची त्यांनी पाहणी केली. यावेळी तालुक्यातील दुष्काळी परिस्थितीची माहिती देत दुष्काळग्रस्त जाहीर करण्याची मागणी केल्याचे खताळ यांनी सांगितले. तसेच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्याकडेही शेतकऱ्यांच्या प्रश्नांचा पाठपुरावा केल्याचे त्यांनी नमूद केले.

दुष्काळग्रस्त तालुका जाहीर झाल्यानंतर आता दुष्काळाचे निकष लागू होऊन नुकसानग्रस्त पिकांचे पंचनामे केले जाणार आहेत. मात्र, शेतकऱ्यांना प्रत्यक्ष दिलासा मिळण्यासाठी सरसकट पंचनामे करण्यात यावेत, अशी मागणी मुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडे केल्याचे खताळ यांनी स्पष्ट केले.

दुष्काळी सवलतींमध्ये जमीन महसुलात सूट, शेती कर्जाच्या वसुलीस स्थगिती किंवा कर्ज पुनर्रचना, वीज बिलात सवलत, विद्यार्थ्यांच्या परीक्षा शुल्कात सवलत, रोजगार हमी योजनेच्या कामांमध्ये सवलत, टँकरद्वारे पाणीपुरवठा तसेच पशुधनासाठी चाऱ्याची व्यवस्था यांसारख्या उपाययोजनांचा समावेश असल्याचे त्यांनी सांगितले. साडेसात अश्वशक्तीपर्यंतच्या कृषिपंपांचे वीज बिल यापूर्वीच माफ करण्यात आले असून त्यापुढील वीज वापरासाठीही सवलत देण्यात येणार असल्याचे खताळ यांनी नमूद केले.

अतिवृष्टी असो अथवा दुष्काळ, जलसंधारणाची कामे केल्यास त्याचा दीर्घकालीन फायदा होतो. त्यामुळे दुष्काळ व्यवस्थापनाच्या कक्षेत तालुक्याचा समावेश झाल्यानंतर उपलब्ध सवलतींचा लाभ शेतकऱ्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी प्रयत्न केले जातील, असे खताळ यांनी सांगितले.

मागील वर्षी अतिवृष्टीमुळे शेतकरी संकटात सापडले होते, तर यंदा पावसाअभावी दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे. निसर्गातील बदलांमुळे शेतीसमोर सातत्याने आव्हाने उभी राहत असून, या संकटात शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी पाठपुरावा सुरूच ठेवणार असल्याचेही त्यांनी सांगितले. दरम्यान, दुष्काळग्रस्त भागातील मुलींच्या विवाहाचा प्रश्न निर्माण झाल्यास शिवसेनेच्या वतीने त्यांच्या विवाहाची जबाबदारी घेतली जाईल, असे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितल्याची माहितीही आमदार खताळ यांनी दिली.

“संगमनेर दुष्काळग्रस्त जाहीर झाल्याने शेतकऱ्यांना विविध सवलतींचा लाभ मिळणार आहे. जमीन महसूल, कर्जवसुली, वीज बिल, परीक्षा शुल्क, रोजगार हमी, पाणीपुरवठा आणि पशुधनासाठी चारा याबाबत शासनाच्या उपाययोजनांचा लाभ शेतकऱ्यांना मिळेल. नुकसानग्रस्त पिकांचे सरसकट पंचनामे करून शेतकऱ्यांना तातडीने दिलासा द्यावा, अशी आमची मागणी आहे.” — अमोल खताळ, आमदार

RAJA VARAT

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!