आमदार खताळांनी कृषिमंत्र्यांसमोर मांडल्या शेतकऱ्यांच्या व्यथा
संगमनेर तालुका दुष्काळी जाहीर करून तातडीने मदत देण्याची मागणी
संगमनेर : प्रतिनिधी
संगमनेर तालुक्यात पावसाने ओढ दिल्याने खरीप पिकांचे मोठे नुकसान झाले असून, संपूर्ण तालुका दुष्काळी जाहीर करून शेतकऱ्यांना तातडीने शासकीय मदत द्यावी, अशी मागणी आमदार अमोल खताळ यांनी कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांच्याकडे केली.
कृषिमंत्री भरणे यांनी गुरुवारी (दि. २४) पिंपळे येथे शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन पावसाअभावी नुकसान झालेल्या सोयाबीन पिकाची पाहणी केली. यावेळी आमदार खताळ यांनी तालुक्यातील पावसाची स्थिती आणि पिकांच्या नुकसानीची माहिती देत शेतकऱ्यांच्या अडचणी मांडल्या.
तालुक्यातील अनेक भागांत पावसाचे प्रमाण अत्यल्प राहिल्याने सोयाबीन, मका, बाजरी, कडधान्यांसह विविध पिकांवर परिणाम झाला आहे. अनेक ठिकाणी पिके करपून गेल्याने शेतकऱ्यांसमोर आर्थिक संकट निर्माण झाले आहे.

नुकसानीचे केवळ कागदी अहवाल न घेता प्रत्यक्ष शेतातील परिस्थितीची पाहणी करून निर्णय घ्यावा, अशी मागणी आमदार खताळ यांनी केली. पावसाचे प्रमाण, पिकांचे नुकसान आणि शेतकऱ्यांची आर्थिक परिस्थिती लक्षात घेऊन संपूर्ण संगमनेर तालुका दुष्काळी जाहीर करावा तसेच नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने शासकीय मदत द्यावी, अशी मागणी त्यांनी केली.
