संगमनेरमध्ये अवैध कत्तलखान्यावर एलसीबीचा छापा ; ८०० किलो गोमांस जप्त !
पाच जण पोलिसांच्या ताब्यात
संगमनेर | प्रतिनिधी
संगमनेर शहरात अवैध गोवंश कत्तलीचा प्रकार उघडकीस आणत अहिल्यानगर स्थानिक गुन्हे शाखेने मोठी कारवाई केली आहे. जमजम कॉलनी येथील पत्र्याच्या शेडमध्ये सुरू असलेल्या अवैध कत्तलखान्यावर पोलिसांनी छापा टाकून तब्बल ८०० किलो गोमांस जप्त केले, तर कत्तलीसाठी आणून बांधून ठेवलेल्या पाच गोवंशीय जनावरांची सुटका केली. या कारवाईत पाच जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले असून एकूण ३ लाख ८० हजार २०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

पथकाला १० नोव्हेंबर रोजी संगमनेर शहरात गस्त घालताना गोपनीय माहिती मिळाली. समीर हसन कुरेशी हा साथीदारांच्या मदतीने गल्ली क्रमांक ९, जमजम कॉलनी येथील पत्र्याच्या शेडमध्ये गोवंशीय जनावरांची कत्तल करत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. तसेच काही जनावरे मदिनानगर येथील गल्ली क्रमांक ४ मधील काटवनात डांबून ठेवल्याचे समोर आले.
मिळालेल्या माहितीची खातरजमा केल्यानंतर पोलिसांनी संबंधित ठिकाणी छापा टाकला. यावेळी काही इसम गोवंशीय जनावरांची कत्तल करताना आढळून आल्याचे पोलिसांनी सांगितले. पोलिसांनी तत्काळ कारवाई करत पाच जणांना ताब्यात घेतले.
![]()
ताब्यात घेतलेले आरोपी :
१. समीर हसन कुरेशी (वय ५५)
२. सोनू उर्फ फैजान शाहीद कुरेशी (वय २०)
३. महमंद अहमद अब्दुलवाहब कुरेशी (वय ३५)
४. शाहीद गणी कुरेशी (वय ४२)
५. मुजम्मील अब्दुलहमीद इनामदार (वय ३३)
असा आहे जप्त मुद्देमाल :
– ८०० किलो गोमांस – २ लाख ४० हजार रुपये
– चाकू व सत्तूर – २०० रुपये
– पाच गोवंशीय जनावरे – १ लाख ४० हजार रुपये
असा एकूण ३ लाख ८० हजार २०० रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे.

या प्रकरणी संगमनेर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक १०६९/२०२६ अन्वये भारतीय न्याय संहिता २०२३ मधील कलम २७१, ३२५, ३(५) तसेच महाराष्ट्र पशुसंरक्षण अधिनियम १९९५ (सुधारित २०१५) मधील संबंधित कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास संगमनेर शहर पोलीस करीत आहेत.
पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने ही कारवाई केली. या कारवाईमुळे संगमनेर शहरातील अवैध गोवंश कत्तलीचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे.





