अवैध जुगार, दारू अड्ड्यांवर एलसीबीची कारवाई !
तीन ठिकाणी छापे ; चौघांवर गुन्हे दाखल, एक आरोपी फरार
संगमनेर टाइम्स न्यूज नेटवर्क –
जिल्ह्यातील अवैध दारू विक्री आणि जुगाराच्या धंद्यांविरोधात स्थानिक गुन्हे शाखेने एकाच दिवशी तीन ठिकाणी छापे टाकून कारवाई केली आहे. या कारवाईत एकूण १ लाख २४ हजार ९६० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून, चौघांविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. यातील एक आरोपी फरार आहे.
स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संतोष मुटकुळे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक हरिष भोये यांच्यासह पोलीस अंमलदार अशोक लिपणे, अजिनाथ पाखरे, किशोर शिरसाठ, रमीजराजा आत्तार, विशाल तनपुरे, गणेश धोत्रे, गणेश लबडे, श्यामसुंदर जाधव, दिपक जाधव, मनोज साखरे, रोहित मिसाळ, रोहित येमुल आणि प्रताप देवकाते यांची दोन पथके तयार केली. या पथकाने सदर कारवाई केली.

श्रीरामपूरमध्ये जुगार अड्ड्यावर छापा ; ८० हजारांचा मुद्देमाल जप्त
दि. ३० ऑक्टोबर २०२६ रोजी श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीत जुगार अड्ड्यावर छापा टाकण्यात आला. या कारवाईत अजिज मिरन शेख (वय २६) आणि अभिजीत उत्तम गिरी (वय ३६, दोघेही रा. वॉर्ड नं. ४, श्रीरामपूर) यांना ताब्यात घेण्यात आले. तर रविंद्र बाळासाहेब चव्हाण (रा. वॉर्ड नं. ४, श्रीरामपूर) हा आरोपी फरार झाला आहे. या प्रकरणी श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर नंबर १०६९/२०२६ अन्वये महाराष्ट्र जुगार अधिनियम कलम १२ (अ) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून, ८० हजार ६०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
माळवडगावात अवैध दारूविक्रीवर कारवाई
श्रीरामपूर तालुक्यातील माळवडगाव येथे अवैध दारूविक्रीविरोधात कारवाई करण्यात आली. यामध्ये संजय बाबासाहेब खताळ (वय ४२, रा. माळवडगाव, ता. श्रीरामपूर) याच्याविरुद्ध श्रीरामपूर तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर नंबर ४४८/२०२६ अन्वये महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम कलम ६५ (ई) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला. या कारवाईत ८ हजार ८० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

श्रीगोंद्यातही अवैध दारू धंद्यावर छापा
दरम्यान, श्रीगोंदा पोलीस ठाण्याच्या हद्दीतही स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने छापा टाकून अवैध दारूविक्रीवर कारवाई केली. या प्रकरणी कृष्णा बाळासाहेब मुंढेकर (वय ३९, रा. मुंढेकरवाडी, ता. श्रीगोंदा) याच्याविरुद्ध श्रीगोंदा पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर नंबर ४४४/२०२६ अन्वये महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम कलम ६५ (अ), (ई) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला. या कारवाईत ३६ हजार २८० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
