झेंडूच्या फुलांच्या आड गांजाची शेती ! एलसीबीचा छापा ; २२.२० लाखांचा गांजा जप्त

संगमनेर टाइम्स न्यूज नेटवर्क  

शेतीमध्ये झेंडूच्या फुलांचे पीक आणि त्याच पिकाच्या आड गांजाची लागवड ! अहिल्यानगर तालुक्यातील इमामपूर येथे हा प्रकार उघडकीस आला असून, स्थानिक गुन्हे शाखा आणि एमआयडीसी पोलिसांनी संयुक्त कारवाई करत तब्बल २२ लाख २० हजार ७५० रुपये किमतीची ४४.४१५ किलो वजनाची गांजाची झाडे जप्त केली आहेत. या प्रकरणी देविदास रंगनाथ टिमकरे (वय ६४, रा. इमामपूर, ता. जि. अहिल्यानगर) याला ताब्यात घेण्यात आले आहे.

१० ऑक्टोबर २०२६ रोजी एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीत इमामपूर येथील देविदास टिमकरे याने आपल्या शेतात झेंडूच्या पिकामध्ये गांजाची लागवड केल्याची गोपनीय माहिती पथकाला मिळाली. ही माहिती एमआयडीसी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक हेमंत थोरात यांना लेखी अहवालाद्वारे कळविण्यात आली.

वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या आदेशानुसार स्थानिक गुन्हे शाखा आणि एमआयडीसी पोलिसांचे पथक पंचांसह संबंधित शेतात दाखल झाले. शेताची पाहणी केली असता झेंडूच्या पिकामध्ये गांजाची लहान-मोठी झाडे आढळून आली. पोलिसांनी संबंधित शेतकऱ्याला ताब्यात घेत गांजाची झाडे जप्त केली. जप्त केलेल्या गांजाची एकूण किंमत २२,२०,७५० रुपये, तर वजन ४४.४१५ किलोग्रॅम असल्याचे पोलिसांनी नमूद केले आहे.

या प्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक ९१०/२०२६ अन्वये गुंगीकारक औषधीद्रव्ये आणि मनोव्यापारावर परिणाम करणारे पदार्थ अधिनियम, १९८५ (NDPS Act) मधील संबंधित कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई अहिल्यानगरचे पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन आणि अपर पोलीस अधीक्षक वैभव कलुबर्मे यांच्या सूचना व मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखा आणि एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या अधिकारी व अंमलदारांनी केली.

RAJA VARAT

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!