पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील व आमदार अमोल खताळ यांच्या प्रयत्नातून संगमनेर तालुक्याला २०५ वीज रोहित्रांची उपलब्धता
संगमनेर : प्रतिनिधी
संगमनेर तालुक्यातील शेतकऱ्यांना भेडसावणाऱ्या वीज समस्येच्या पार्श्वभूमीवर महायुती सरकारच्या माध्यमातून २०५ वीज रोहित्रांची उपलब्धता करून देण्यात आली आहे. पालकमंत्री ना. राधाकृष्ण विखे पाटील आणि आमदार अमोल खताळ यांच्या प्रयत्नांतून नादुरुस्त रोहित्र बदलण्याची कार्यवाही करण्यात आली आहे. विशेष म्हणजे ट्रान्सफॉर्मर जळाल्यानंतर कमी कालावधीत शेतकऱ्यांवर कोणताही आर्थिक भार न टाकता रोहित्र उपलब्ध करून देण्यात आल्याचे आमदार खताळ यांच्या कार्यालयातून देण्यात आलेल्या प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे.
मागील काही दिवसांपासून तालुक्यातील शेतकरी वर्गाला विजेच्या भारनियमनाचा त्रास सहन करावा लागत आहे. काही ठिकाणी रोहित्र नादुरुस्त झाल्याने शेतीसह ग्रामीण भागाचा वीजपुरवठा खंडित झाला होता. त्यामुळे अनेक गावांतून नवीन रोहित्र बसवून देण्याची तसेच रोहित्रावरील भार वाढवून देण्याची मागणी करण्यात आली होती.
शेतकऱ्यांची वीज समस्या लक्षात घेऊन पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी संगमनेर तालुक्यासाठी १२५ रोहित्र उपलब्ध करून दिले. तसेच आमदार अमोल खताळ यांच्या पाठपुराव्यामुळे ८० नवीन रोहित्रे बसविण्यात आली असून, त्यामुळे अनेक भागांतील वीज समस्या दूर करण्यास यश आले आहे.

१ ऑगस्ट ते १७ सप्टेंबर २०२६ या कालावधीत मागणीनुसार रोहित्र उपलब्ध करून देण्याचे काम महायुती सरकारच्या माध्यमातून करण्यात आले. आणखी ४० रोहित्रे काही दिवसांत उपलब्ध होणार असल्याची माहिती आमदार अमोल खताळ यांनी दिली.
संगमनेर तालुक्यातील डोळासणे, मेंढवण आणि मेंगाळवाडी या गावांतील काही वाड्या-वस्त्यांना अनेक वर्षांपासून वीजपुरवठा झालेला नव्हता. पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या सहकार्याने आणि आमदार अमोल खताळ यांच्या पाठपुराव्यामुळे या वाड्या-वस्त्यांना प्रथमच वीजपुरवठा उपलब्ध होऊ शकला आहे.
यंदा पाऊस कमी प्रमाणात झाल्याने विजेची उपलब्धता तसेच वितरण व्यवस्थेसमोर मोठे आव्हान निर्माण झाले आहे. या परिस्थितीतून मार्ग काढण्यासाठी आमदार अमोल खताळ यांनी महावितरणच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या वीज समस्या सोडविण्यासाठी विशेष प्रयत्न केले आहेत.

विजेचे भारनियमन कमी व्हावे यासाठी अभियंत्यांशी सातत्याने संपर्कात असून, मागील दोन दिवसांपासून भारनियमन कमी होत असल्याचे आमदार अमोल खताळ यांनी सांगितले. गावठाण फिडरवर एजी फिडर जोडला जात असल्याने सायंकाळी ६ ते ९ या कालावधीत भारनियमन वाढत होते.
गावठाण फिडरवर येणारा एजीचा भार कमी करण्यासाठी हे फिडर स्वतंत्र करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. तसेच गावठाण फिडर सिंगल फेज करण्याबाबत तातडीने सर्वेक्षण करण्याच्या सूचना अधिकाऱ्यांना दिल्या आहेत, अशी माहिती आमदार अमोल खताळ यांनी दिली.
