भाकरीच्या भुकेतून जन्मलेले सुर्वे यांचे साहित्य जगण्याची हिम्मत देते : उत्तम कांबळे
साहित्य जत्रेत नारायण सुर्वे यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त विचारांचा जागर
संगमनेर | वार्ताहर
“माणसाला आयुष्याच्या प्रवासात भाकरीची किंमत कळते. त्या भाकरीच्या भुकेतून निर्माण झालेल्या साहित्यातून जगण्याच्या वेदना व्यक्त झाल्या. त्यामुळे कवी नारायण सुर्वे यांचे साहित्य आजही माणसाला जगण्याची हिम्मत आणि शक्ती देते,” असे प्रतिपादन ज्येष्ठ साहित्यिक उत्तम कांबळे यांनी केले.
साहित्य कला व सांस्कृतिक संघ आणि सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात वरिष्ठ महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने संगमनेर येथे आयोजित ‘साहित्य जत्रा’ कार्यक्रमात ते संमेलनाध्यक्ष म्हणून बोलत होते.

कार्यक्रमाचे उद्घाटन माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या हस्ते झाले, तर ग्रंथदिंडीचे उद्घाटन माजी आमदार डॉ. सुधीर तांबे व माजी नगराध्यक्ष दुर्गाताई तांबे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी व्यासपीठावर सिनेगीतकार बाबासाहेब सौदागर, पद्मश्री रघुवीर खेडकर, लेखक संदीप वाकचौरे, प्राचार्य डॉ. बाळासाहेब वाघ आदी उपस्थित होते.
उत्तम कांबळे म्हणाले, “हे वर्ष कवी नारायण सुर्वे यांचे जन्मशताब्दी वर्ष असले तरी शासनाला त्याचा विसर पडल्याचे दिसते. मात्र संगमनेरकरांनी त्यांची आठवण ठेवून केलेले नियोजन कौतुकास्पद आहे. बहुजनांनी साहित्यलेखनाचे प्रस्थापित नियम मोडले. आईचा शोध घेण्याची लढाई सुर्वे यांनी आयुष्यभर लढली. त्यांचा जन्मच कवी म्हणून झाला आणि कविता हेच त्यांच्या जगण्याचे कारण होते.”

ते पुढे म्हणाले, “जगण्याशी आणि शब्दांशी बेईमानी करणाऱ्याची कविता चांगली होऊ शकत नाही. सुर्वे कोणत्याही चौकटीत बसणारे कवी नव्हते. समाजाला चांगले बनविण्यासाठी साहित्य आणि कलावंतांची गरज असते. जिथे धर्म आणि अध्यात्माचा विचार थांबतो, तिथे कवितेचा जन्म होतो. अशा साहित्य संमेलनांतून सुर्वे यांच्या विचारांचा जागर होत आहे, ही समाजासाठी आनंदाची बाब आहे.”
उद्घाटनपर भाषणात बाळासाहेब थोरात म्हणाले, “नारायण सुर्वे यांनी श्रमिकांचे जीवन साहित्यात आणले. श्रमिकांच्या वेदना आणि संघर्ष समाजासमोर मांडण्याचे महत्त्वपूर्ण कार्य त्यांनी केले. जगभरातील विविध सामाजिक चळवळींना साहित्याने ताकद दिली आहे. श्रमिक वर्ग लिहिता झाला आणि त्यांचे जीवन साहित्यामध्ये प्रतिबिंबित झाले. त्यामुळे त्यांच्या वेदना समाजापर्यंत पोहोचल्या. राजकारण्यांनी साहित्यिकांना सातत्याने जवळ केले, त्यामुळे राजकारण अधिक सुसंस्कृत होण्यास मदत झाली.”

यावेळी बाबासाहेब सौदागर म्हणाले, “टाळ आणि चाळ हे महाराष्ट्राचे आकर्षण आहे. आज पुरस्कार देणारे कमी आणि तिरस्कार करणारे अधिक झाले आहेत. मात्र प्रहार सहन केले तरच हार गळ्यात पडतात.” पद्मश्री रघुवीर खेडकर यांनी आपल्या साहित्य आणि जीवनप्रवासातील अनुभव उपस्थितांसमोर मांडले.
कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी राजाभाऊ भांडगे, नितीन कोळफकर, डॉ. निलीमा निघुते, वंदना बाचकर, प्रकाश पारखे, विजय पाटील, अशोक वरुडे, अनुराधा आहेर, आसावरी रत्नपारखी, दीपक टाक, अशोक शेटे, पुष्पाताई निऱ्हाळी, जयश्री शिंदे यांच्यासह अनेकांनी परिश्रम घेतले.
