खताची कृत्रिम टंचाई व जादा दराने विक्री केल्यास कठोर कारवाई : आमदार अमोल खताळ यांचा इशारा

संगमनेर तालुक्यासाठी ७०० मेट्रिक टन युरिया उपलब्ध  : ३५० मेट्रिक टन विक्रीसाठी सज्ज

संगमनेर | प्रतिनिधी

खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर संगमनेर तालुक्यातील शेतकऱ्यांना युरिया खताचा पुरेसा व वेळेवर पुरवठा उपलब्ध व्हावा, यासाठी कृषी विभागाने आवश्यक नियोजन केले असून तालुक्यासाठी सुमारे ७०० मेट्रिक टन युरिया उपलब्ध करण्यात आला आहे. त्यापैकी ३५० मेट्रिक टन युरिया तातडीने विक्रीसाठी सज्ज करण्यात आला आहे. खताची कृत्रिम टंचाई निर्माण करणे, साठेबाजी करणे किंवा जादा दराने विक्री करणाऱ्यांविरुद्ध कोणतीही तडजोड न करता कठोर कारवाई करण्यात येईल, असा इशारा आमदार अमोल खताळ यांनी दिला.

सोमवारी (दि. १३ जुलै) आमदार अमोल खताळ यांच्या संपर्क कार्यालयात कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांची बैठक आयोजित करण्यात आली. खरीप हंगामात वाढलेल्या युरिया खताच्या मागणीच्या पार्श्वभूमीवर तालुक्यातील खतसाठा, वितरण व्यवस्था, उपलब्धता आणि पुढील नियोजनाचा बैठकीत सविस्तर आढावा घेण्यात आला.

बैठकीस उपविभागीय कृषी अधिकारी अक्षय गोसावी, तालुका कृषी अधिकारी रेजा बोडखे, पंचायत समिती कृषी अधिकारी उघडे यांच्यासह कृषी विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

यावेळी आमदार खताळ यांनी प्रशासनाला शेतकऱ्यांना युरिया खतासाठी हेलपाटे मारावे लागू नयेत, यासाठी प्रभावी नियोजन करण्याच्या सूचना दिल्या. अधिकृत दरानेच खताची विक्री होऊन वितरण प्रक्रियेत पूर्ण पारदर्शकता राखावी, तसेच कृत्रिम टंचाई, साठेबाजी किंवा जादा दराने विक्री करणाऱ्या विक्रेत्यांवर कठोर कारवाई करावी, असे निर्देश त्यांनी दिले.

कृषी विभाग सातत्याने परिस्थितीवर लक्ष ठेवून असून आवश्यकतेनुसार अतिरिक्त खतसाठा उपलब्ध करून देण्यासाठी नियोजन सुरू असल्याचेही बैठकीत स्पष्ट करण्यात आले. त्यामुळे शेतकऱ्यांनी अफवांवर विश्वास न ठेवता गरजेनुसारच खताची खरेदी करावी, असे आवाहनही आमदार खताळ यांनी केले.

“तालुक्यासाठी आवश्यक असलेला युरिया खतसाठा टप्प्याटप्प्याने उपलब्ध करून दिला जाणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी घाई किंवा घबराट न करता गरजेनुसारच खताची खरेदी करावी. कृषी विभाग परिस्थितीवर सातत्याने लक्ष ठेवून असून अतिरिक्त खतसाठ्यासाठी शासन स्तरावर पाठपुरावा सुरू आहे. कोणत्याही शेतकऱ्याला खतापासून वंचित राहू दिले जाणार नाही. कृत्रिम टंचाई, साठेबाजी किंवा जादा दराने खत विक्री करणाऱ्यांविरुद्ध कठोर कारवाई केली जाईल.” — अमोल खताळ, आमदार

RRAJA VARAT

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!